दिनविशेष

वामन शिवराम आपटे- संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकार, भाषांतरकर व मराठी लेखक
कृष्णाजी लक्ष्मण सोमण तथा किरात–२- एक मराठी ग्रंथकार
गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस- मराठी रंगभूमी वरील एक श्रेष्ठ गायक नट
माधवराव शिंदे- चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संकलक
मधुकर टिल्लू- एकपात्री कलाकार
आशालता वाबगावकर- अभिनेत्री
अरुण गोडबोले- बहुगुणी व्यक्तिमत्व
प्रदीप निफाडकर- मराठी गझलकार
जवाहरलाल दर्डा
……………………………………
आज अज्ञात उडणाऱ्या वस्तू Unidentified Flying Objects (UFO) दिन आहे.
……………………………………
वामन शिवराम आपटे- संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकार, भाषांतरकर व मराठी लेखक (जन्म : २ जुलै १८५८; निधन ९ ऑगस्ट १८९२)
वामन शिवराम आपटे यांनी संपादलेला इंग्लिश-संस्कृत शब्दकोश १८८४ साली प्रकाशित झाला, तर संस्कृत-इंग्लिश शब्दकोश १८९० साली प्रकाशित झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांच्या आईने मुलांना घेऊन कोल्हापूर गाठले व तेथे मुलांना शाळेत घातले. परंतु लवकरच आपट्यांच्या आईचे व थोरल्या भावाचेदेखील निधन झाले. राजाराम हायस्कुलाचे मुख्याध्यापक एम.एम. कुंटे यांनी देऊ केलेल्या मदतीच्या आधारावर आपटे १८७३ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास आले. पुण्यातील डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी.ए. व एम.ए. पदव्या मिळवल्या. शिक्षणानंतर १८८० साली सहाध्यायी असलेल्या बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या पर्यवेक्षकपदावर ते रुजू झाले. पुढे ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्येही शिकवत होते. शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांची भाषांतर त्यांनी केले. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
कृष्णाजी लक्ष्मण सोमण तथा किरात–२- एक मराठी ग्रंथकार (जन्मः २ जुलै १८६५; निधनः २१ फेब्रुवारी १९४५)
जन्म बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे. शिक्षण खानापूर, निपाणी व पुणे येथे. लेखनाची आवड लहानपणापासूनच होती. काही काळ सरकारी नोकरी केल्यानंतर सारे आयुष्य लेखनालाच वाहून घेतले. काव्य, नाटक, टीका, निबंध इ. विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले ते मुख्यतः केसरी, पुणे वैभव, जगद्धितेच्छु, नाट्यकथार्णव आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांपैकी पानिपतचा दुर्दैवी मोहरा (१८९८) आणि पन्हाळगडचा किल्लेदार (१८९९) ही विशेष प्रसिद्ध आहे. भासकवीच्या नव्याने उपलब्ध झालेल्या तेरा नाटकांचे मराठीत भाषांतर भासकवीचा मराठींत अवतार, १९३१) व त्यास जोडलेली विवेचक प्रस्तावना ही त्यांची महत्त्वाची वाङ्मयीन कामगिरी होय. हिंदोल टिळकगीत (१९२९) आणि शिवराज्याभिषेक-राष्ट्रीय कीर्तन (दुसरी आवृ. १९२५) ही त्यांची पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली काव्यरचना. त्यांच्या निबंधांपैकी ‘संभाजीच्या पश्चात मराठ्यांची स्थिती’ हा विशेष उल्लेखनीय होय. अतिलेखन आणि वाचन यांमुळे आयुष्याच्या अखेरीस त्यांना अंधत्व आले होते. (रा. श्री. जोग. मराठी विश्वकोशातून)
……………………………………
गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस- मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट (जन्मः २ जुलै १८८०; निधनः २३ डिसेंबर १९६५)
संपूर्ण नाव गणेश गोविंद बोडस पण गणपतराव याच नावाने ते ओळखले जात. जन्म शेवगाव (जि. अहमदनगर) येथे. वडील गोविंद विनायक बोडस, हेही गावातील पौराणिक नाटकांत कामे करीत. आईचे नाव सगुणाबाई व पत्नीचे अन्नपूर्णाबाई होते. गणपतरावांचे शिक्षण पुणे येथे मराठी सहा व इंग्रजी दोन इयत्तापर्यंत झाले. शाळेत शिकत असताना ते हौशी नाट्यमंडळातून कामे करु लागले. १८९५ साली त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. तेथे त्यांना पहिली काही वर्षे दुय्यम भूमिका विशेषतः स्त्रीभूमिका मिळाल्या पण हळूहळू त्यांना सौभद्र नाटकात कृष्ण, शारदा नाटकात कांचनभट, मूकनायकात विक्रांत व मानापमानात लक्ष्मीधर अशा महत्त्वाच्या भूमिका मिळत गेल्या.
त्यांनी १९१३ साली किर्लोस्कर मंडळी सोडून बालगंधर्व व गोविंद सदाशिव टेंबे यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ ची स्थापना केली. या कंपनीने सौभद्र, मृच्छकटिक, मानापमान, विद्याहरण इ. नाटकांव्यतिरिक्त संशयकल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, द्रौपदी इ. दर्जेदार नाटकेही रंगभूमीवर आणली. सुधाकर (एकच प्याला ), लक्ष्मीधर (मानापमान ), शकार (मृच्छकटिक ), शिष्यवर (विद्याहरण ) आणि फाल्गुनराव (संशयकल्लोळ ) या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या. १९३० सालानंतर मराठी रंगभूमीस उतरती कळा लागली व त्यानंतर अल्पावधीतच गणपतराव नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. पुढे त्यांनी एकदोन चित्रपटात भूमिका केल्या, परंतु चित्रपटसृष्टीत त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी प्रामुख्याने होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचेच काम केले.
गणपतरावांना १९४० साली नासिक येथे भरलेल्या एकतिसाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. पुढे १९५६ साली नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्याच वर्षी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार देण्यात आला. गणपतरावांनी सु. चाळीस वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाट्यसृष्टीतील अनेक बहुमान प्राप्त करून घेतले. ‘माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रथमतः प्रकाशित झाले व त्याची सुधारलेली आवृत्ती १९६४ मध्ये काढण्यात आली. मराठी रंगभूमीच्या इतिहासाच्या दृष्टीने या आत्मचरित्रातील माहिती अत्यंत उपयुक्त आहे. पुणे येथे त्यांचे निधन झाले. (अ. म. जोशी, मराठी विश्वकोशातून)
………………………………………..
माधवराव शिंदे- चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संकलक (जन्म: २ जुलै १९१७; निधनः २० ऑगस्ट १९८८)
भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक, व्ही. शांताराम यांच्यासारख्या निर्माते-दिग्दर्शकांच्या पुढच्या पिढीतील दिग्दर्शक म्हणून माधव शिंदे यांचे नाव घेता येईल. तसेच कोल्हापुरच्या चित्रपट व्यवसायात ‘विशेष योगदान’ देणाऱ्या कर्तृत्ववान चित्रपट तंत्रज्ञामध्ये आवर्जून नाव घेतलं पाहिजे ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संकलक माधवराव शिंदे यांचे. कौटुंबिक विषयाचे व कोमल भावनांचे चित्रण करणारे दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांच्या इतिहासात माधव शिंदे ओळखले जात असत.
कोल्हापुर मधील शिवाजी पेठेतल्या रावजी शिंदेंचं घराणं तसं साधंसुधं मराठमोळं, खाऊन-पिऊन सुखी असं. रावजींच्या थोरल्या मुलाला दिनकरला पहिल्यापासूनच तालमीचा शोक. जवळच्याच बावडेकर आखाड्यात मनस्वी मेहनत करून तो चांगला पैलवान झाला. एकेक कुस्तीचं मैदानं जिंकत त्याने झेप घेतली ती परदेशात ऑलिम्पिक्समध्ये! पण त्याच्या धाकट्या भावाचं, माधवचं मात्र गणितच एकदम निराळं. माधव पहिल्यापासूनच शांत, कमी बोलणारा, हळूवार मनाचा. त्याला वेड होतं ते चित्रपटाचं आणि मग एके दिवशी तो मंगळवार पेठेतल्या प्रभाकर स्टुडिओत आताच्या जयप्रभा स्टुडिओत घुसला ते थेट तिथल्या फिल्म लॅबोरेटरीत.
सोळा वर्षांचा माधव त्या लॅबोरेटरीत रसायनाच्या बादल्या उचलण्यापासून पडेल ती कामे करू लागला. लवकरच तो संकलन खात्यात उमेदवारी करू लागला. र. शं. जुन्नरकर, माधव कांबळे, कोतमिरे, कोगेकर अशा एकेका तज्ज्ञ संकलकांकडून संकलनाचे धडे घेऊ लागला. मा. विनायकरावांच्याकडे दिनकर पाटील, शंकर सावेकर, आप्पासाहेब जाधव असा जो अस्सल कोल्हापुऱ्यांचा जो एक ग्रुप जमला होता त्याचा तो आपोआप मेंबर झाला. पुढे दुर्दैवाने मा. विनायकांचे अकाली निधन झाले तेव्हा त्यांना आधार दिला तो चित्रपट वितरक डी. ए. पाटील, अलुरकर यांनी. १९५० मध्ये स्थापन केलेल्या ‘उदयकला चित्र’ या पहिल्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या ‘राम राम पाव्हणं’ या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर द. पाटील यांच्यावर सोपविली. दिनकर पाटलांना दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली, त्याचबरोबर माधव शिंदेंनाही संकलनाची पहिली संधी मिळाली. माधव शिंदें यांनी आपल्या कार्याची कलात्मक करामत चित्रपट रसिकांनाच नव्हे, तर चित्रपट व्यवसायालाही दाखवून दिली.
संगीतकार सुधीर फडके आणि प्रसिद्ध गादी कारखानदार य. ह. जोशी या दोघांनी मिळून ‘नवभारत चित्रपट लिमिटेड’ ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेने सन १९५० मध्ये ‘वंशाचा दिवा’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्याच्या संकलनाची जबाबदारी माधव शिंदेंच्यावर सोपवली. १९५१ मध्ये ‘उदयकला’ ने ‘राम राम पाव्हणं’ चा सगळा ग्रुप घेऊन ‘पाटलाचा पोरं’ हा आणखी एक ग्रामीण चित्रपट काढला. साहजिकच त्याचे संकलक माधव शिंदेंचे होते. पुढे माधव शिंदे, पी. सावळाराम आणि वसंत प्रभू यांचे त्रिकुट चांगलेच जमले.
याच सुमारास वसंतराव सरमुकादम या निर्मात्याने ‘शारदा’ या लोकप्रिय नाटकावरील ‘शारदा’ याच नावाच्या चित्रपटाची सारी जबाबदारी दिनकर पाटलांच्या या गु्रपवर सोपवली. साहजिकच ‘शारदा’चे संकलन माधव शिंदे यांनीच केले. सुधीर फडके आणि य. ह. जोशी यांनी ‘विठ्ठल रखुमाई’ हा चित्रपट यशवंत पेंढारकरांच्या दिग्दर्शनाखाली कोल्हापुरात सुरू केला. पूर्वानुभवाने त्याचे संकलनाचे काम माधव शिंदेंच्यावरच सोपविण्यात आले.
‘राम राम पाव्हणं’, ‘पाटलाचा पोरं’च्या यशानंतर उदयकला चित्रने ‘मायेचा पाझर’ हा चित्रपट सुरू केला; पण त्यांनी काही तंत्रज्ञामध्ये बदल केला. दिग्दर्शन दिनकर पाटलांच्या ऐवजी माधव शिंदे यांना दिले. पुढे त्यांनी मराठी चित्रपट व्यवसायात एक चांगला हळूवार, भावनाप्रधान दिग्दर्शक म्हणून आपला प्रभाव पाडला. १९५३ मध्ये लता मंगेशकर आणि दिनकर द. पाटील यांच्या भागीदारीत ‘सुरेल चित्र’ ही चित्रनिर्मिती संस्था स्थापन केली आणि ‘वादळ’ या चित्रपटाची निर्मिती केली. १९५९ मध्ये माधवरावांनी ‘सुरेल’चा ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला. या चित्रपटाला फिल्मफेअर अवॉर्ड तसेच ‘साप्ताहिक रसरंग’चे फाळके पारितोषिक मिळाले.
माधवरावांनी आपल्या ‘सुरेल चित्र’साठी महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘जगावेगळं सासर’ या लोकप्रिय कथेवरून ‘कन्यादान’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘उत्कृष्ट मराठी चित्रपट’ म्हणून त्याला राष्ट्रपतीचं सर्टिफिकेट ऑफ मेरीट मिळाले. यानंतर माधवरावांनी विशेष सामाजिक आशय असलेला ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला शासनाचे अस्पृश्यताविषयक पारितोषिक मिळाले. माधव शिंदे यांनी १९६७ साली ‘किल्ले रायगड’ वर लघुपटाची निर्मिती केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन दिग्दर्शक शिंदे यांनी या लघुपटात ‘किल्ले रायगड’चे संपूर्ण अंतरंग उलगडून दाखविले होते. ‘गृहदेवता’ हा चित्रपट ताश्कंद महोत्सवात दाखविला गेला. त्यातील काव्यात्मकता वेधक होती. डॉ. नाथमाधव यांच्या कादंबरीवरील ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवर ‘कन्यादान’ हा चित्रपट आधारित होता. ‘थोरातांची कमळा’ किंवा वि.स. खांडेकरांनी लिहिलेला ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटकथा माधव शिंदे यांच्या प्रकृतीशी विसंगत होत्या. १९८० मध्ये ‘सुगम चित्र’च्या मोहन जवादे निर्मित ‘संसार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन करून त्यांनी ती कोंडी फोडली. त्यांच्या या पटकथेला त्यावर्षीचे महाराष्ट्र शासनाचे ‘उत्कृष्ट पटकथा लेखना’चे पारितोषिक मिळाले होते. दुर्दैवाने माधव शिंदे यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. (सुधीर नांदगांवकर)
……………………………………
मधुकर टिल्लू- एकपात्री कलाकार (जन्म: २ जुलै १९३३ अमळनेर खानदेश; निधनः १ जुन २०००)
मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजविणाऱ्या पहिल्या पिढीतील कलाकार म्हणजे मधुकर टिल्लू! भालबा केळकर यांच्या पीडीए मध्ये विविध नाटकात ते काम करायचे. ‘रंगदीप’ संस्थेच्या संगीत ‘देवमाणूस’ या नाटकातील उत्कृष्ट भूमिकेबद्दल उपराष्ट्रपती बी.डी.जत्ती यांच्यातर्फे उत्कृष्ठ अभिनयाबद्दल गौरव व पुरस्कार मिळाला होता.
व्यवसायाच्या निमित्ताने फिरस्ती करावी लागल्याने नाटकापासून दूर जावे लागले. मुळातच विनोदी प्रसंग रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी असल्याने , त्यांच्या कलाकार मनाने एकट्याने कार्यक्रम करण्याचा विचार केला….1961 च्या दरम्यान त्यांनी विनोदी प्रसंगांची गुंफण करून, सलग कथा नसलेल्या, ‘ प्रसंग लहान, विनोद महान’ या कार्यक्रमाची सुरुवात केली. वेडेवाकडे अंगविक्षेप आणि अश्लील कोटीक्रम न करताही विनोद सादर करता येतो हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी गावोगावी हजारो कार्यक्रम करून रसिकांमध्ये एकपात्री कलाप्रकार रुजवला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या विनोदोत्सवात त्यांचा समावेश होता. नवनवीन प्रासंगिक किस्से यातून सुरु केलेला ‘ हसायदान’ हा त्यांचा दुसरा कार्यक्रमही तुफान गाजला.
१९७२ साली यवतमाळचे मराठीतले पहिले शायर भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी त्यांनी ऐकली. आणि त्यांनी ही शायरी जागोजागी पोहचविण्याचा ध्यास घेतला. सलग 14 वर्षे त्यांनी भाऊसाहेबांचे शेकडो प्रयोग आयोजित केले. वयोमानाप्रमाणे भाऊसाहेबांना दौरे जमेना , तेंव्हा सुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मोठ्या विश्वासाने हा कार्यक्रम मधुकर टिल्लू यांचेवर सोपवला. यानंतर टिल्लू यांनी सादर केलेल्या ‘ जिंदादिल ‘ मराठी शेरोशयारी या कार्यक्रमाने रसिकमनावर गारुड घातले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे टिल्लू यांच्या कार्यक्रमाचे चाहते होते. ‘ विनोदाच्या माध्यमातून प्रकट झालेले आपले कलागुण श्रेष्ठ आहेत ‘ असा अभिप्राय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना दिला होता.
विनोद आणि हास्याचे शारीरिक व मानसिक फायदे त्यांनी आपल्या विविध व्याख्यानातून व हॉस्पिटलमधून मांडले. व्यावसायिक विनोदावर आधारित ‘ ह्युमर फ्रॉम प्रोफेशन ‘ हा आगळा वेगळा कार्यक्रम ते सादर करीत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन संकेश्वरपिठाच्या जगतगुरू शंकराचार्यांतर्फे ‘ विनोद विशारद ‘ ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
टिल्लू कुटुंबातील तीन पिढया …मधुकर टिल्लू, मकरंद टिल्लू, हर्षदा टिल्लू हे ५० हुन अधिक वर्षे एकपात्री सादर करत आहेत. हे एकपात्री क्षेत्रात , मराठी रंगभूमीच्या इतिहासात … कदाचित देशात व जगातही प्रथमच घडणारा योग!
विविध मान सन्मान मिळविणाऱ्या मधुकर टिल्लू यांनी अनेक नवोदित कलाकारांना स्फूर्ती देऊन एकपात्री कला खऱ्या अर्थाने वाढविली. सध्याचा काळात अनेक एकपात्री कलाकार विनोदाची गुंफण करून रसिकांना हसवतात. मधुकर टिल्लू हे याप्रकारचे जनक होते. हेच त्यांनी रंगभूमीला दिलेले सर्वात मोठे योगदान होते. हास्याचे वरदान ‘ हसायदान’ देणारे व रंगभूमीवर नवीन दालन निर्माण करणारे ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
आशालता वाबगावकर- अभिनेत्री (जन्म : २ जुलै १९४१; निधनः २२ सप्टेंबर २०२०)
आशालता नाईक हे आशालता वाबगांवकर यांचे माहेरचे नाव. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. रेवतीच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध चालू झाला. काहींची भाषा योग्य नव्हती, काहींना रेवतीचे सौंदर्य नव्हते, तर काहींना गाण्याचे अंग नव्हते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक या मुलीचे नाव सुचवले. आकाशवाणीवर त्यांनी या मुलीची भाषा ऐकली होती. गाणेही ऐकले होते.
घरात स्कर्ट घालणारी ही षोडशवर्षा मुलगी साडी नेसून चाचणीला आली आणि एकही प्रश्न न विचारता सावकारांनी तिची निवड केली. सर्व जण अवाक झाले. सावकारांना विचारताच ते म्हणाले, ‘तिचा नाकाचा शेंडा फार बोलका आहे. ही मुलगी रंगभूमीवर नाव काढील.’ त्यांची निवड योग्य ठरली. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’ व ‘संगीत मृच्छकटीक’ या तिन्ही नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशालता वाबगावकर यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी साकार केलेल्या भूमिका अद्यापि लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंतसेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी ‘हीच माझी मत्स्यगंधा,’ असे उद्गार काढले होते. म्हणून आशालता वाबगावकर या आपल्या दोन्ही गुरूंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत असत.
नाट्यस्पर्धांतून बक्षिसे मिळविणारी आशालता वाबगावकर सर्वार्थाने रसिकांच्या मनात कायमची जाऊन बसल्या, त्या त्यांच्या मत्स्यगंधेच्या भूमिकेने. या नाटकात संवादाबरोबरच संगीताची परीक्षा त्यांना प्रेक्षकांसमोर द्यायची होती. जितेंद्र अभिषेकी या नव्या दमाच्या कल्पक संगीत दिग्दर्शकाचेही ते पहिलेच नाटक. त्यामुळे एक वेगळा तणाव आशाच्या मनावर येणे स्वाभाविक होते. अभिषेकींनी आपल्या कौशल्याने त्यांच्या गळ्यात चपखल बसतील, अशा चाली अलगदपणे तिच्या गळ्यात उतरवल्या. आशालता वाबगावकर यांनीही परिश्रमपूर्वक या चालींचे सोने केले. कुठलीही भूमिका साकारताना त्यासाठी अपार कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. म्हणूनच ‘भावबंधन’ नाटकात चित्तरंजन कोल्हटकर (घनश्याम) व प्रसाद सावकार (प्रभाकर) यांसारख्या मुरलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर आपल्याला लतिकेची भूमिका करावी लागणार आहे, हे समजल्यावर त्यांनी, त्या मा. नरेश यांना आपल्या घरी येऊन तालीम देण्याची विनंती केली. मा. नरेश यांनी प्रकृती अस्वस्थ असूनसुद्धा पंधरा दिवस आशाताईंच्या घरी राहून त्यांना या भूमिकेचे बारकावे समजावून दिले होते. दुर्दैवाने अल्पावधीतच त्यांचे निधन झाल्यामुळे मा.नरेश त्यांचा प्रयोग मात्र पाहू शकले नाहीत.
पहिल्यांदाच रंगभूमीवर येणाऱ्या नाटकात एखादी भूमिका साकार करणे हे जितके कठीण असते, त्याहीपेक्षा पूर्वी रंगभूमीवर येऊन गेलेल्या व प्रेक्षकांच्या मनात स्थिर होऊन राहिलेल्या, दुसऱ्या कलाकाराने साकारलेल्या भूमिका करणे हे अति अवघड असते; कारण प्रेक्षकांच्या नजरेसमोर तरळत असलेल्या पूर्वीच्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कौशल्याचा प्रभाव स्वत:च्या भूमिकेने पुसून टाकणे हे आव्हान असते व ते पेलण्यासाठी धाडस लागते, जबर आत्मविश्वास लागतो. आशाताईंनी हे आव्हान अनेक वेळा यशस्वीरीत्या पेललेले होते. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील येसूबाई (सुधा करमरकर), ‘गारंबीचा बापू’मधील राधा (उषा किरण), ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी (पद्मा चव्हाण) आणि ‘भाऊबंदकी’नाटकात त्यांनी आनंदीबाईची भूमिका केली होती. ही भूमिका आधी दुर्गाबाई खोटे करीत असत. दाजी भाटवडेकर (राघोबादादा), मा. दत्ताराम (रामशास्त्री) अशा कसलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करणे सोपी गोष्ट नव्हती. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी आशाताईंना आनंदीबाईच्या स्वभावाचे कंगोरे समजावून सांगितले होते, मार्गदर्शन केले होते. आनंदीबाई ही राजकारण कोळून प्यालेली, आपल्या सौंदर्यावर आपला नवरा पूर्णपणे भाळलेला आहे हे जाणणारी, महत्त्वाकांक्षी स्त्री. ‘या नाटकात डोळ्यांचा आणि शब्दांचा उपयोग करा, शब्द प्रेक्षकांच्या उरी घुसले पाहिजेत,’ असा कानमंत्र दाते यांनी आशाताईंना दिला होता. एका प्रवेशात नारायणरावांची गारद्यांच्या हातून हत्या होताना आनंदीबाई पाहते आणि लगेच बाकी सर्वांच्या समोर त्यांचे प्रेत पाहून रडवेली होते, असा क्षणात मुद्राभिनय बदलण्याचा प्रसंग होता. साताऱ्याला या प्रसंगानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांतून चप्पल फेकली. त्या क्षणभर नर्व्हस झाल्या. भाषण आठवेना. रामशास्त्रीच्या भूमिकेतील मा. दत्ताराम जवळच उभे होते. ते म्हणाले, ‘मुली, ही तुझ्या अभिनयाला दिलेली दाद आहे. पुढचं वाक्य बोल.’ या व अशा भूमिकांमुळे आशा आणि आव्हान हे रंगभूमीवरचे समीकरणच झालेले असावे.
दि गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, अभिजात, मुंबई मराठी साहित्य संघ, माउली प्रॉडक्शन्स व आय.एन.टी. अशा सहा संस्थांमधून त्यांनी जवळजवळ पन्नासहून अधिक नाटकांचे हजारो प्रयोग केले. चंद्रलेखा या संस्थेत त्यांनी सर्वाधिक नाटके केली. ‘घरात फुलला पारिजात’मध्ये चंद्रलेखा, ‘आश्चर्य नंबर दहा’ मध्ये विमला, ‘विदूषक’ मध्ये अंजली, ‘गरुडझेप’मधील सत्तरी ओलांडलेली राजमाता जिजाबाई आणि ‘वाऱ्यावरची वरात’मधली तारस्वरात कन्नड भाषेचे हेल काढून बोलणारी कडवेकर मामी अशा भिन्नभिन्न स्वभावाच्या भूमिकांमधून आशाताईंनी आपले नाट्यनैपुण्य प्रकर्षाने प्रगट केलेले आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकात खुद्द पु.लं.च्या बरोबर काम करायला मिळणे हा त्या आपल्या आयुष्यातील भाग्ययोग मानत असत. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला बँडेज केले होते. असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे हालचाली करणे कठीण झाले होते. शंभरावा प्रयोग रद्द करणे योग्य नसल्यामुळे त्या तशाही परिस्थितीत भूमिका करण्यासाठी तयार झाल्या. प्रयोग सुरू होण्याअगोदर त्यांनी ही परिस्थिती प्रेक्षकांना समजावून सांगितली. आपली भूमिका नेहमीप्रमाणे होऊ शकत नसल्यामुळे ज्यांना पैसे परत पाहिजेत, त्यांना ते देण्याची संस्थेने तयारी दाखविली; पण एकाही प्रेक्षकाने पैसे परत घेतले नाहीत.
आशालता वाबगावकर यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात अभीनय केला होता.
दूरदर्शनवरआशालता वाबगावकर यांनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता. त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. त्यांचे ‘गुंतता हृदय हे’हे नाटक पाहिले आणि ‘अपने पराये’ या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अमोल पालेकर, गिरीश कार्नाड यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना पदार्पणातच मिळाली होती. त्यांनी चित्रपट तंत्राची मुळाक्षरे बासुदांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली गिरवल्यामुळे नंतर केलेल्या जवळजवळ दोनशेहून अधिक हिंदी व पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांचा प्रवास सोपा झाला. आशाताई कधी स्तुतीने भाळल्या नाहीत किंवा निंदेने चळल्या नाहीत. रंगभूमीवर किंवा चित्रपटात डोळ्यांत पाणी आणण्यासाठी त्यांना कधी ग्लिसरीनचा वापर करावा लागला नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. स्टेजवर नुसते रूप असून भागत नाही. आपण बोललेले शब्द प्रेक्षकांच्या मनाला गोड वाटले पाहिजेत. चेहरा बोलला पाहिजे. भूमिकेशी एकरूप व तन्मय झाले म्हणजे प्रेक्षक तुमचा अभिनय स्वीकारतात. प्रेक्षक हुशार असतात. त्यांना अस्सल व नक्कल यांतला फरक लगेच समजतो. याच प्रेक्षकांनी आपला अभिनय गोड मानून घेतला आणि आपल्याला उदंड प्रेम दिले, याबद्दल त्या त्यांचे ऋणही व्यक्त करत असत. (डॉ. अजय वैद्य)
……………………………………..
अरुण गोडबोले- बहुगुणी व्यक्तिमत्व यांचा आज वाढदिवस (जन्म- २ जुलै १९४४ सातारा येथे)
हल्लीच्या लोकशाहीत जुन्या संस्थानिकी घराणेशाहीला विरोध असणे हे अगदी स्वाभाविक आहे. मात्र, अरुण गोडबोले यांना त्यांचे वडील आदरणीय रा. ना. उर्फ बन्याबापू गोडबोले यांच्याकडून सार्वजनिक कार्याचा वसा जो वसा मिळाला, तो त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे चालवला आणि त्यात भर घातली. सातारच्या संस्थात्मक जीवनाचा विचार केला तर बन्याबापू हे निश्चितच सातारचे न्या. मू. गो. रानडे ठरतात. रानड्यांनी महाराष्ट्रात जशी विविध संस्थांची स्थापना केली आणि महाराष्ट्राचे संस्थात्मक जीवन सुरू केले, तसेच गोडबोले यांनी सातारमध्ये केले. अरुण गोडबोले या बन्याबापूंच्या चिरंजीवांकडे त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा वारसा आला. अरुणजींनी तो आपल्या पद्धतीने जपला आणि स्वत:च्या कुवतीने त्यात भरीव भर घातली. शालेय जीवनातच अरुणजींची बुद्धिमत्ता दिसू लागली. न्यू इंग्लिश स्कूलमधून १५ व्या वर्षीच अकरावी (जुनी शालान्त परीक्षा) घवघवीत गुणांनी उत्तीर्ण करून त्यांनी पुण्याच्या ‘बी. एम. सी. सी.मध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यांनी प्रथम बी.कॉम. आणि नंतर एम.कॉम.ही पूर्ण केले. तेथेही ‘विशेष प्राविण्यासह’ प्रथम श्रेणी कायम राखली. ते वडिलांचा कर सल्लागाराचा व्यवसायच करणार असल्यामुळे आवश्यक असलेली कायद्याची एलएल.बी. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली. या परीक्षेत तर ते पुणे विद्यापीठात दुसरे आले आणि त्यांनी ‘डी. एल. वैद्य सुवर्ण पदक’ प्राप्त केले. अरुणजींमध्ये व्यावसायिकाचे रक्त सुरुवातीपासूनच खेळत होते. पुण्याच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी चक्क एक ट्रक विकत घेतला;आणि पुणे – बेळगाव असा ट्रकचा व्यवसाय केला. कोठलाही व्यवसाय यशस्वीपणे चालायचा असला तर स्वत: त्यातल्या बारीकसारीक गोष्टी स्वत:ला जमल्या पाहिजेत. अरुणजी त्यामुळे ट्रक चालवायला शिकले नसले तर नवलच!
सातारमध्ये विशीतील अरुणजींनी आपल्या वडिलांबरोबर कर सल्लागाराच्या व्यवसायात काम सुरू केले. मात्र, बन्याबापू हे रामशास्त्री प्रभुणे यांचे थेट वंशज होते. त्यांनी अरुणजींना जेमतेम चार महिने मार्गदर्शन केले असेल; नंतर त्यांनी अरुणजींना सांगितले, की आता सर्व तुझे तू निभावून न्यायचे. चांगले काम केलेस तर यशस्वी होशील, अन्यथा अयशस्वी. बरे, इतकेच करून थांबतील तर ते बन्याबापू कसले? त्यांनी त्यांच्या सर्व पक्षकारांना स्पष्ट सांगितले, की आता त्यांनी सर्व व्यवसाय अरुणकडे सोपवला आहे. तुमची इच्छा असेल तर त्याच्याकडून काम करून घ्या. तुम्ही दुसर्या वकिलांकडे काम दिलेत तरी मी काही बोलणार नाही.
अरुणजींना याचा राग नसेल का आला? पण ते बन्याबापूंचेच चिरंजीव होते. त्यांनी ओळखले, की पिताजी आपली परीक्षा घेत आहेत. त्यामुळे आपण या परीक्षेत धवल यश मिळवले पाहिजे; आणि तसे त्यांनी ते मिळवलेही. मात्र, हे व्यावसायिक काम करतांना अरुणजींनी त्या कामाला त्यांच्या स्वभावानुसार आणखी एक जोड दिली. जुने पक्षकार कायम राहिल्याने कौटुंबीक भावसंबंध निर्माण झाले होतेच. त्याचा फायदा घेऊन अरुणजींनी त्यावेळेस प्रचलित नसलेला ‘समुपदेशन’ शब्द न वापरता तेही काम कित्येक कुटुंबांसाठी हळुवारपणे केले.
त्यांचा व्यवसाय सातार्यांत होता; पण आयकराचे कार्यालय पुण्यात होते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा आणि कधी कधी जास्त वेळा पुण्याला जाणे व्हायचे. अरुणजींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले असल्यामुळे ते संबंध कायम राखत त्यांनी पुण्यात व्यावसायिक, साहित्यिक सांस्कृतिक संबंधही निर्माण केले, वाढवले. या माणसाला नवनव्या माणसांच्या ओळखी करून त्या टिकवण्याचे व्यसन आहे, असे म्हटले तर अजिबात गैर होणार नाही. त्याचा एक भाग असा, की ते दिवाळीला या सर्व परिचितांना भेटपत्रे पाठवतात. हा आकडा किमान सहा हजारांवर आहे! मूळचे कोकणस्थ ब्राह्मण, आणि जन्मजात व्यावसायिक वृत्ती! त्यामुळे अशी भेटपत्रे विकत घेऊन ती पाठवण्यापेक्षा स्वत:च छापली तर ती कमी किमतीत आणि जास्त मनासारखी पाठवता येतील; असा विचार आला नाही तरच नवल! मग त्या दृष्टीने सर्व सुरू झाले. त्यामुळे तदनुषंगिक सर्व गोष्टी शिकून त्यांतही जाणकार झाले. ही जाणकारी इतकी, की छपाईचे काम करणारासुद्धा अरुणजी नवीन काय सांगतात याची वाट बघत असतो! त्यातून तो व्यावसायिक नवी गोष्ट शिकतो! ही भेटपत्रे साधी, आकर्षक आणि गोडबोले कुटुंबीयांच्या कार्याची माहिती देणारी असतात, हे वेगळे सांगायला हवे काय?
उपजत साहित्याचे, वाचनाचे प्रेम अनिवार! शिवाय, कविता करण्याची आवड. मग या प्रत्येक भेटपत्राच्या मागच्या पृष्ठावर दरवर्षी अरुणजींची एक नवी आणि समर्पक कविता असणार. पण ही कविता करावयास वेळ तर हवा ना? छपाई अगदी अंतिम टप्प्यात आली आणि कविता हवी, म्हणून तगादा सुरू झाला, की मग अरुणजी मांडी ठोकणार; आणि काही वेळातच एका सिद्धहस्त कवीप्रमाणे नवी, अर्थानुकूल कविता लिहून देणार. १९९९ पासून मला ही भेटपत्रे यावयास सुरुवात झाली. ही सगळी भेटपत्रे मी त्या कवितांसाठी जपून ठेवली आहेत. या सत्तरीच्या समारंभाची जी निमंत्रणपत्रिका आहे त्याच्याही पाठीमागच्या पृष्ठावर ‘रांगोळी’ नावाची स्वत:चे मनोगत उलगडून दाखवणारी कविता आहेच!
सतत नवीन काही तरी करण्याचा ध्यास असणार्या अरुणजींनी चक्क चित्रपट निर्मिती करण्याचे घरी जाहीर केले आणि सातारसारख्या गावी पिढ्यांपिढ्या राहणार्याय गोडबोल्यांच्या ‘आनंदी निवास‘च्या भिंती थरथरल्या! त्यांच्या इतर ‘ऊचापतींना’ फारशी हरकत न घेणार्यान त्यांच्या पिताश्रींनी त्यांची हरकत सौम्यपणे नोंदवली. सातार्या सारख्या ठिकाणी, जेथे पूर्वी कधी चित्रपट निर्मिती झाली नव्हती त्या गावी, व्यवस्थापनाची पदवी न घेताही ते कोळून प्यायलेल्या अरुणजींनी परफेक्ट व्यावसायिक गणिते करून चित्रपट निर्मितीस, सुरुवात केली. आणि अशा धडाक्यात चित्रपट पूर्ण केला, की भले भलेही थक्क झाले! अरुणजींनी सर्वात कळस केला, तो त्या चित्रपटाच्या पहिल्या किंवा प्रारंभाच्या खेळाला (‘प्रिमियरला’) कोणी कल्पना करणार नाही अशा वाईस्थित प्रकांडपंडित म्हणून गाजलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना बोलावून! शास्त्रीजींनीही चित्रपटाचा पहिला खेळ बघून झाल्यावर असे समयोचित माहितीपूर्ण भाषण केले, की आश्चर्यचकित झालेल्यांत अरुणजींना चित्रपट निर्मितीस विरोध करणार त्यांचे पिताश्रीही होते! ‘कौशिक चित्र’ या संस्थेमार्फत त्यांनी ५ मराठी आणि एका हिन्दी चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटांची नावे : ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘नशीबवान’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’ आणि ‘राम रहीम’. ‘बंडलबाज’चा हिन्दी अवतार ‘हम दो बंडलबाज’.
स्वत:ची चित्रपट निर्मिती आहे म्हटल्यावर ‘राम रहीम’ चित्रपटाची कथा, संवाद आणि काही गीते अरुणजींनी लिहिली. शिवाय, काही भागाचे दिग्दर्शन करून तीही हौस भागवू घेतली. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शांनाला पुरस्कार जाहीर झाल्यावर ते सर्व श्रेय आपले नसल्याचे जाहीरपणे कबूल करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. त्यांच्या काही चित्रपटांनी विविध पुरस्कार पटकावले! अरुणजींनी भले या सर्व व्यापांत बख्खळ पैसा नसेल कमावला पण अन्य हौशी निर्मात्यांप्रमाणे आपले हात पोळून घेतले नाहीत! या सर्व अनुभवांवर एक पुस्तक त्यांनी लिहावे असे मी आग्रहाने सुचवले होतेच. यथावकाश अरुणजींनी ‘सिनेमाचे दिवस’ हे पुस्तक लिहिलेच.
व्यवसायाची गरज म्हणून प्राप्तीकर आणि तत्सम विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. मूळ साहित्याच्या प्रेरणा असल्यामुळे प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे, कविता संग्रह, चिंतनात्मक, निवडणूकविषयक, चित्रपट कथा, संवाद, गीते, ललित लेख संग्रह,अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांतून विपुल स्फुट लेखन, याशिवाय, रामदास, महालक्ष्मी आणि अन्य आध्यात्मिक गीते आणि त्यांच्या कॅसेट्स, अशी अनेकानेक पुस्तके त्यांची झाली. यातही त्यांच्यातला व्यावसायिक जागा असल्यामुळेच १९८२ साली ‘कौशिक प्रकाशन’ संस्थेची स्थापना करणे ओघानेच आले! याच्यातर्फे अन्य पुस्तके आणि कॅसेट्स प्रकाशित केली. त्यांच्या काही पुस्तकांना ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद’ यांच्यातर्फे जाहीर झालेले पुरस्कार मिळाले आहेत. ‘अजिंक्यतारा ते आल्प्स’ या पुस्तकास उत्कृष्ट प्रवासवर्णन म्हणून कै. अनंत काणेकर पुरस्कार मिळाला आहे.
आपल्या वडलांप्रमाणेच त्यांनी स्वत:च्या वयाला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर चिरंजीव उदयन याच्याकडे आपल्या पोटपूजेच्या व्यवसायाची धुरा सुपूर्त केली! वडिलांचा हा आदर्श कायम ठेवल्यामुळे ‘आता तू एकट्याने सर्व सांभाळ’ असे सांगण्याचा आपल्या वडिलांचा दुसरा आदर्श त्यांनी पाळला नसेलच, असे सांगता येत नाही! मात्र, तरुण, देखण्या, उत्साही आणि २१ व्या शतकाचे अपत्य असणाऱ्या उदयनने हे कापडांत बांधलेले कागद, जुन्याच काळातील भिंती, आणि काहीसा धुरळा असलेल्या त्या कार्यालयाला, जी शासकीय कार्यालयाची कळा आलेली होती, ती आपले कार्यालय घरात ठेवूनही घालवली आणि ते चकाचक केले; आणि मुख्य म्हणजे त्याने आपल्या पत्नीच्या साहाय्याने कामाचे संगणकीकरण केले. सुरवातीला अरुणजींना हे पसंत नव्हते. पण चाणाक्ष आणि सूज्ञ अरुणजींनी ‘जे जे होईल ते ते पहावे’ हा संतांचा उपदेश मनाशी बाळगून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले; आणि मान्य केले!
‘श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड‘पासून बॅडमिंटन असोसिएशन, युनायटेड वेस्टर्न बँक, प. म. वि. मंडळ, आयुर्वेदीय अर्कशाला, सातार्या’तील अनेक न्यास, अंत्यविधी मंडळ, रिक्शा टॅक्सी संघटना, जनसेवा ब्लड बँक, हिगणे स्त्री शिक्षण संस्था,व्यायाम मंडळ, म. रा. रौप्य महोत्सव शासकीय समिती, सातारा नगर परिषद, मराठी चित्रपट निर्माता महासंघ, सातारा जिल्हा सैनिक कल्याण मंडळ, महाराष्ट्र स्कूटर्स, अशा जवळजवळ ३४ संघटनांत ते अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मार्गदर्शक, विश्वस्त, सल्लागार सदस्य, अशा पदांवर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाचे ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणूनही त्यांनी काम केले आहे. १९९३ साली सातारला भरलेले अ. भा. म. साहित्य सम्मेलन, आणि तेथेच भरलेले २००४ चे पहिले संतसाहित्य सम्मेलन यांतही त्यांचा अनेक अंगांनी सक्रिय सहभाग होता.
सातारच्या विमा महर्षी अण्णासाहेब चिरमुल्यांनी स्थापन केलेली आणि सातारकरांच्या अभिमानाचा विषय असलेली ‘युनायटेड वेस्टर्न बँक’ डबघाईला आली तेव्हा ‘यु. वे. बँक – उदय, उत्कर्ष आणि अस्त’ असे पुस्तक लिहून त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
मात्र, तरीही यापैकी अरुणजींनी काहीही केले नसते आणि फक्त ‘रा. ना. गोडबोले सार्वजनिक न्यासा’ चेच काम केले असते तरी अरुणजी एक कायम संस्मरणीय व्यक्ती म्हणून लक्षात राहिले असते. बन्याबापूंनी स्वत:च्या नावाने समाजऋण फेडण्यासाठी केलेल्या या न्यासातर्फे फक्त गोडबोले कुटुंबीयांकडूनच देणग्या घेतल्या जातात. १९७१ साली स्थापन झालेल्या या न्यासाने पहिल्या ३५ वर्षांतच ६,००० गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना जातपात न बघता २० लक्ष रुपयांच्यावर रक्कम शैक्षणिक मदत म्हणून दिली आहे. या न्यासातर्फे दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी सातारकरांना गेली ४० वर्षे नामवंत शास्त्रीय गायक,नामवंत कवी, उत्कृष्ट वक्ते यांचे गायन, काव्यवाचन, व्याख्यान यांचा लाभ होत आहे. २५ लाख रुपयांपेक्षा जास्त गंगाजळी जमा करणाऱ्या या न्यासाच्या कामात अरुणजी सक्रीय असतात. ही प्रखर सामाजिक जाणीव दाखवणाऱ्या अरुणजींपुढे नतमस्तक व्हावे असे कोणाला वाटणार नाही?
अरुणजींच्या हौसेला मोल नाही! त्यांनी काही वर्षांपूर्वी सासवडला भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक लढवली! हे सर्व पाहिल्यावर त्यांना यासाठी मत न देऊन मला चालण्यासारखे नव्हते!
मध्यप्रदेशातील इटारसीच्या शोभा गणेश परांजपे या १९६७ साली अरुणजींशी विवाह होऊन अनुपमा गोडबोले म्हणून सातार्याोत प्रवेश करत्या झाल्या. अभिनेत्री सुकन्या कुलकर्णीच्या चेहेर्याोशी साम्य असणार्याण अनुपमाजी ‘सागर विद्यापीठा‘च्या एम.ए. झालेल्या आहेत. सार्वजनिक कार्य करणारे श्वशुर, सासूबाई, दीर, नणंदा आणि आल्या – गेल्याचा प्रचंड राबता असणाऱ्या या घरात त्या यथावकाश रूळल्या आणि पक्क्या सातारकर झाल्या. जन्मत: उत्तम दर्जाची विनोदबुद्धि असणाऱ्या अनुपमाजींनी ‘तरीही चकोर अनन्य’ या नावाचे अतिशय आगळेवेगळे आणि संग्राह्य असे आत्मकथन लिहिले आहे.
भरलेले घर आणि कायम लष्करच्या भाकर्या भाजत असलेला नवरा! या सर्व धबडग्यात त्यांच्या वाट्याला अरुणजी किती आले (किंवा किती नाही) हे सूज्ञ व्यक्ती सहजच समजू शकेल. पण वैवाहिक आयुष्याच्या तीन तपांनंतर लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी अरुणाजींना असा काही ‘घरचा आहेर’ दिला आहे, की ज्याचे नाव ते! सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी‘मध्ये पु. लं.वर सरळ सरळ टीका केली आहे. पण अनुपमाजींनी प्रत्येक प्रकरणात शालजोडीतले हाणत तोच परिणाम साधला आहे! त्या पुस्तकातील काही प्रकरणांच्या, ‘अस्सं माहेर सुरेख बाई!’, ‘गोडबोले बोर्डिंग हाऊस’, ‘गोष्टी गाडीच्या आणि साडीच्या’, ‘दळे तिलाच कळे!’ या शीर्षकांवरून त्यांच्या लिखाणाची कल्पना यावी. मात्र, असे शालजोडीतले हाणणार्या! अनुपमाजी शेवटी मात्र ‘भाग्यवती मी या संसारी!’ असे वाचकांना बजावयास कमी करत नाहीत! कर सल्लागार असलेला मुलगा उदयन, एम.डी. झालेली आणि जवळच कर्हांडला असलेली मुलगी गौरी ताम्हनकर, नातवंडे, वेगळ्या प्रकारे कर्तृत्व सिद्ध केलेले दोन बंधु, भावजया, आणि त्यांचे गोतावळे या साऱ्यागत अरुणजी तसे तृप्त आहेत. (प्रकाश चान्दे)
……………………………………
प्रदीप निफाडकर- मराठी गझलकार यांचा आज वाढदिवस (जन्म- २ जुलै १९६१)
गझलेत वात्सल्यता आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे प्रदीप निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे. ‘वेगळे वाटसरू’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनाथ मुलांच्या भविष्यावर नजर टाकणार्याव मालिकेचे‘आभाळ पेलणारे आयुष्य’ हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्रदीप निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली होती. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘गझलसम्राट सुरेश भट आणि…’ हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तत्पूर्वी भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन करण्याचे भाग्य निफाडकर यांना लाभले. ‘रसवंतीचा मुजरा’ असे त्या पुस्तकाचे नाव असून, नागपूर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्याचे प्रकाशन झाले होते. भारतातील सर्व भाषा तसेच नेपाळी, इंग्रजी भाषेतील ‘आई’ या विषयावरील कवितांचे संपादन श्री. निफाडकर यांनी केले, त्याचे ‘माँ’ नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील ८५ नव्या दमाच्या मराठी गझलकारांच्या निवडक गझलांचे ‘आवडलेल्या गझला’ या पुस्तकाचेही संपादन त्यांनी केले आहे. ‘मै शायर’ हे त्यांचे 35 शायरांवरील पुस्तक बहुचर्चित आहे. निफाडकर यांच्या मराठी गझलांची ‘देखणी’ ही ध्वनिफीत एच. एम.व्ही. कंपनीतर्फे प्रकाशित झाली आहे. इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात त्यांच्या गझलेचा समावेश झाला असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वृत्तविद्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात त्यांनी भरपूर लेखन केले आहे. त्यांच्याविषयी व त्यांच्या गझलांविषयी लेखांचे एक पुस्तक ‘मराठी गझल : प्रदीप निफाडकर’ या नावाने आले आहे. नुकतेच त्यांच्या कवितांचे एकमेव शीर्षकाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या गझलांचे पुस्तक ‘गझलधाम’ हे, श्रीविद्या प्रकाशनातर्फे 2 जुलैला प्रकाशित झाले आहे. प्रदीप निफाडकर यांनी ‘मोहिनी’ व ‘स..सासूचा’ या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘मी मराठी’ या वाहिनीच्या ‘सलाम नाशिक, सलाम नागपूर व सलाम कोल्हापूर’ या कार्यक्रमांचे शीर्षक गीतलेखन निफाडकर यांचेच होते.
प्रदीप निफाडकर यांना आतापर्यंत राज्य उर्दू अकादमीचा विशेष पुरस्कार, कै. भाऊसाहेब पाटणकर स्मृती, उर्दूमित्र, वैष्णवमित्र,भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारिता, रामसुखजी भट्टड पुरस्कृत कै. दादासाहेब पोतनीस आणि दै. देशदूततर्फे ‘गुणवंत’, साहिर लुधियानवी व बलराज सहानी फाउंड़ेशनचा ‘जाँ निसार अख्तर पुरस्कार’ असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘स्वप्नमेणा’ या गझलसंग्रहास नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून ‘प्रभाकर वैद्य पुरस्कार’ तर ‘गझलदीप’ पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ‘साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे. ‘सकाळ’, ‘लोकमत’, ‘देशदूत’ अशा वृत्तपत्रांमध्ये तब्बल २६ वर्षे त्यांनी काम केले. उपसंपादकापासून कार्यकारी संपादकापर्यंत त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.
‘गझलदीप’ हा त्यांचा मराठी गझलांचा स्वतंत्र कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये झाला आहे.
अमरावती येथे १९८९ ला झालेल्या संमेलनापासून अखिल भारतीय संमेलनात त्यांचा सातत्याने निमंत्रित कवी म्हणून सहभाग आहे. दुबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य समेलनात पुण्याहून फक्त त्यांनाच निमंत्रित केले होते.मुक्ताईनगर येथील अखिल भारतीय उर्दू मुशायर्यामत अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली आहे. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कवी असून दूरदर्शन व विविध वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. ‘काव्यदीप’ नावाचे खास कवितेचे मासिक त्यांनी दोन वर्षे चालविले आहे. उर्दू साहित्य परिषदेचे ते बिनविरोध निवडून आलेले पहिलेच मराठी भाषक अध्यक्ष होते. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
- बाबूजी (जवाहरलाल दर्डा) (जन्म २ जुलै १९२३) एका मोठ्या मनाची जन्मशताब्दी….!*
बाबूजींचा जन्म २ जुलै १९२३. पुढच्या वर्षी शताब्दी वर्षाची समाप्ती होईल. वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलैचा. बाबूजींचा २ जुलै… दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचे अंतर… पण घट्ट मैत्रीमध्ये हे अंतर कधीच जाणवले नाही. यासाठी दोन्ही व्यक्तीमत्त्वांच्या मनात एक मोठेपण असावे लागते. ते दोघांमध्ये होते. म्हणून ही मैत्री टिकली. बाबूजी हा मोठ्या मनाचा माणूस होता. एवढंच नव्हे तर आयुष्यामध्ये चारही बाजूंनी हल्ले होत असताना कोणत्याही व्यक्तीमत्त्वाने किती समचित्त रहावे, याचा बाबूजी आदर्श होते. त्यांच्यासोबत मी १९७४ ते १९९७ पर्यंत… त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत होतो. आयुष्यात त्यांच्या विरोधातील व्यक्तीबद्दल एकही चुकीचा शब्द, अनादराचा शब्द त्यांनी कधीही उच्चारला नाही. ते स्वातंत्र्यसेनानी होते. १८ महिने जबलपूर येथील तुरुंगात त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. त्यांच्यासोबत वीर वामनराव जोशी होते. खामगावच्या राष्ट्रीय शाळेचे प्राचार्य पंधे गुरुजी होते. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीची कधी शेखी मिरवली नाही. पण राजकारणातील विरोधकांनी, १८ महिने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तीलाही राजकारणाकरिता विधानमंडळात ‘लक्ष्य’ बनवले. विधानमंडळाचे कामकाज बंद पाडले. ‘तुम्ही स्वातंत्र्यसैनिक नाहीत….’ असे आरोप झाले. नागपूरातील एका वृत्तपत्राने वर्षभर बाबूजींच्या विरुद्ध मुख्य शीर्षक करून मोहीम चालवली. या सर्व वेळी बाबूजींनी आपला तोल कधीही ढळू दिला नाही. त्यांच्यासोबत आयुष्याची २४ वर्षे गेली. या व्यक्तीमत्त्वाच्या मनाच्या उंचीची कल्पनाच करता येणार नाही. - – मधुकर भावे