नऊशे कोटींच्या केंद्राच्या प्रकल्पात पुण्याच्या ‘प्राज’चे तंत्रज्ञान

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पानिपत (हरियाणा) येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या आशियातील पहिल्या 2G इथेनॉल बायो-रिफायनरीचे अनावरण केले. हा प्रकल्प पुण्यातील ‘प्राज’च्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून तांदळाच्या पेंढ्यावर प्रक्रिया करणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी पुणेस्थित प्राज उद्योग समूहाकडून तंत्रज्ञान परवाना घेतला आहे. शिवाय प्राज ‘ईपीसीएम’ भागीदारदेखील आहे.
प्राजने जारी केलेल्या निवेदनामध्ये पंतप्रधान मोदी यांचा दाखल देत म्हटले आहे की, “आमच्यासाठी जैवइंधन म्हणजे पर्यावरणपूरक इंधन, पर्यावरण वाचवणारे इंधन आहे. या आधुनिक प्रकल्पाच्या स्थापनेमुळे, हरियाणातील शेतकऱ्यांना, जेथे तांदूळ आणि गहू मुबलक प्रमाणात पिकवले जातात, त्यांना पिकासोबतच त्याचे अवशेष वापरूनदेखील आर्थिक लाभ मिळवता येईल. तसेच जैवइंधन निर्मिती आणि राष्ट्र उभारणीत योगदान दिल्याचा अभिमान शेतकऱ्यांना आता वाटेल.”

35 एकरांमध्ये पसरलेली ही 2G इथेनॉल बायो-रिफायनरी प्राजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे तीन कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी दरवर्षी दोन लाख टन गहू-तांदळाच्या पेंढ्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होत असतानाच, या प्लांटमुळे ग्रामीण तरुणांसाठी सुमारे 1,500 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
“महत्त्वाचे म्हणजे, दरवर्षी या भागात गहू आणि तांदळाच्या पेंढया जाळल्या जातात, त्यामुळे प्रचंड प्रदूषण होते. दिल्लीतील हवा प्रदूषीत होते. जे सुमारे 320,000 मेट्रिक टन CO2 एवढे आहे. पण आता हे सारे थांबेल. त्यामुळे दरवर्षी होणारे प्रदूषण थांबेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, रस्त्यावरील सुमारे 63,000 गाड्या कायमच्या बंद झाल्या तर जेवढे प्रदूषण कमी होईल तेवढे या प्रकल्पामुळे कमी होणार आहे. या 2G बायो-रिफायनरीमुळे वार्षिक ₹55 – 60 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचेल. या प्रकल्पामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळेल आणि 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्यात मदत होईल” असे निवेदनात म्हटले आहे.
स्वदेशी तंत्रज्ञान
प्राजचे स्वदेशी विकसित ‘एनफिनिटी’ तंत्रज्ञान विविध कृषी अवशेषांवर प्रक्रिया करून बायोइथेनॉल, लिग्नोसल्फोनेट्स, बायो-बिटुमेन यासह विविध उत्पादनांची निर्मिती करते. प्राजच्या तंत्रज्ञानामुळे या प्रकल्पाचा खर्चही कमी झाला आहे..
प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “या महत्वाकांक्षी प्रकल्प उभारणीचा आम्हालाही खूप अभिमान आहे. ऊर्जा स्वावलंबी भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा प्रकल्प एक मोठा मैलाचा दगड आहे. आम्हाला विश्वास आहे की या प्रकल्पाच्या यशामुळे जागतिक जैव अर्थव्यवस्थेत भारताचे तंत्रज्ञान नेतृत्व अधिक मजबूत होईल. ”
ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या आठवड्यात बायो-रिफायनरीचे कार्य सुरू झाले आहे आणि ९० दिवसांच्या आत 2G इथेनॉलचे व्यावसायिक उत्पादन सुरू होईल.