यंदा कापसानंतर ऊसच : साखर आयुक्त

आयएसओ कार्यालय भारतात आणण्याची गरज : साखर आयुक्त
पुणे : आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे (आयएसओ) कार्यालय भारतात, विशेषत: महाराष्ट्रात आणण्याची गरज व्यक्त करतानाच, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली.

– शेखर गायकवाड, साखर आयुक्त
भारत जगात नंबर वनचा साखर उत्पादक देश बनला आहे. त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. जागतिक क्रमवारीत एका राज्याने बाजी मारण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, असे शेखर गायकवाड म्हणाले.
आगामी साखर हंगामदेखील विक्रमी राहण्याची आशा व्यक्त करतानाच, या हंगामात सुमारे १५ लाख हेक्टरवर ऊस लागवड झालेली दिसत आहे. त्यामुळे गाळप हंगाम भरगच्च आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पेरा कापूस आणि धानाचा होतो. मात्र यंदा कापसानंतर उसाने दुसरा क्रमांक घेतला आहे.’
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो.च्या ६७ व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. साखर आणि इथेनॉलची जागतिक स्थिती, आगामी साखर हंगाम आणि उत्पादनाचा अंदाज याबाबत साखर आयुक्तांनी थोडक्यात माहिती दिली.
याची कारणमीमांसा करताना गायकवाड म्हणाले, ‘गत हंगामामध्ये उसाची देणी लवकर मिळाली. शेतकऱ्यांची तब्बल ९८ टक्के रक्कम कारखान्यांनी एफआरपीनुसार अदा केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा हुरूप वाढला आणि ऊस लागवड क्षेत्र वाढले आहे. यंदा वेळेत गाळप हंगाम पूर्ण होईल आणि कुठेही ऊस शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल.’