श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

२९ जून
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर- आद्य विनोदी लेखक, नाटककार आणि कवी
परशुराम लक्ष्मण वैद्य- संस्कृत, पाली, प्राकृत भाषा – साहित्याचे थोर पंडित
प्रशांतचंद्र महालनोबीस- भारतीय सांख्यिकीविज्ञ
कमलाकर जयराम सारंग- नाट्यअभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक
समीर दिवाकर चौघुले- उत्कृष्ट लेखक, विनोदी अभिनेता
…………………………………….
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर- आद्य विनोदी लेखक, नाटककार आणि कवी (जन्मः २९ जून १८७१ नागपूर; निधन: १ जून १९३४)
जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एलएल.बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रम शशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. तिसरी, १९२२, प्रथम प्रयोग १९०१), गुप्तमंजूषा (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९११), वधूपरीक्षा (१९१४), सहचारिणी (१९१८), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (आवृ. दुसरी, १९२३), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली.
‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख ‘विविध ज्ञान विस्तारात’ प्रसिद्ध झाला (१९०२). सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे- अर्थात साहित्य बत्तिशी ह्या नावाने प्रसिद्ध झाली (१९२३). त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) ह्या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (१९२३) हा त्यांचा कवितासंग्रह. ‘बहु असोत सुंदर संपन्न’ ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे १९२० पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (१९३५) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (१९१३) ह्या ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.
कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणले. आपल्या असाधारण कल्पकतेच्या साहाय्याने नाट्यसंवादांतून आणि विनोदी लेखांतून त्यांनी जी विरुद्धकल्पना–न्यासात्मक चमकदार वाक्यरचना–रूढ केली, तिला त्यांच्या हयातीत गडकऱ्यांनी व त्यानंतर प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे इत्यादींनी सुरूप प्राप्त करून दिले. त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्‍मय ठेवा आहे. त्यात संगृहीत झालेल्या त्यांच्या उपहासगर्भ व विनोदी लेखनाने एका अभिनव वाङ्‍मयप्रकाराला आणि लेखनपरंपरेला जन्म दिला. गडकरी, चिं. वि. जोशी, अत्रे, पु. ल. देशपांडे इ. विनोदी लेखक याच परंपरेतील. कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे… मधील लेखन असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. धर्मव्यवहार, सार्वजनिक जीवनव्यवहार, वाङ्‍मयव्यवहार ह्या आणि महाराष्ट्र समाजजीवनाच्या इतर अनेक व्यवहारांचे कोल्हटकरांनी त्यामध्ये विनोदगर्भ व उपहासगर्भ परीक्षण केले आहे. कोल्हटकरांचे वाङ्‍मयसमीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. या श्रेष्ठ विनोदी पुस्तकातून त्यांनी व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे अनेक घटकांचं दर्शन घडवलं. न. चिं. केळकरांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं- ‘काव्य करण्याप्रमाणे विनोदी लेखन करण्यास उज्ज्वल प्रतिभा लागते…विनोदी लेख लिहिता येणे ही एक ईश्वरी देणगी आहे… पुस्तक वाचणाऱ्यास निबंधकाराच्या अंगी असलेली वस्तुनिरीक्षणाची दृष्टी, मार्मिकपणा, गहन विचारशक्ती, उदाहरणे देण्याची हातोटी व सर्वांत मुख्य म्हटले म्हणजे कोणतीही गोष्ट हसू येईल व मौज वाटेल अशा रीतीने सांगण्याची कला या सर्वांबद्दल त्याचे अभिनंदन करावेसे वाटेल.’ ह्या वृत्तीतून ते समग्र लेखन झालेले असल्यामुळे तद्वारा कोल्हटकरांनी मराठी वाङ्‍मयविचाराला भरभक्कम असे तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. पुस्तकपरीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यांमधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्‍मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले व त्यांची जी शास्त्रीय काटेकोरपणे चर्चा केली, त्यामुळे मराठी वाङ्‍मयविचाराला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली.
त्यांनी केलेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या द्वितीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली पुण्यासच भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही (१९२०) ते अध्यक्ष होते. पुणे येथे ते निधन पावले. संदर्भ : १. कुळकर्णी, वा. ल. श्रीपाद कृष्ण : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९५९. २. खानोलकर, गं. दे. साहित्य-सिंह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जीवन गाथा), मुंबई, १९७२. (वा. ल. कुळकर्णी, मराठी विश्वकोशातून)
…………………………………….
परशुराम लक्ष्मण वैद्य- संस्कृत, पाली, प्राकृत भाषा – साहित्याचे थोर पंडित (जन्मः २९ जून १८९१; निधनः २५ फेब्रुवारी १९७८)
जन्म सिद्धेश्वर ह्या कोकणातील एका खेड्यात. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे माधुकरी मागून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगली येथे गुरुगृही राहून संस्कृतचे विशेष अध्ययन केले. त्यानंतर नासिकला एका नामांकित वैद्यांच्या घरी राहून आयुर्वेदाचा अभ्यास केला. पुढे खाजगी रीत्या इंग्रजीचा अभ्यास करून नासिकच्याच एका माध्यमिक शाळेत इंग्रजी चौथीत प्रवेश मिळविला. त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते मॅट्रिक झाले (१९१२). संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील शिक्षण अर्धवट सोडून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी नोकरी धरली. पुढे रॅंग्लर परांजपे यांच्या मदतीने १९१८ साली ते बी. ए. झाले. ह्या परीक्षेत त्यांना पहिला वर्ग आणि भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. १९१९ साली पाली हा विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठाची एम्‌. ‍ए. ची परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तत्पूर्वीच प्रथम कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांच्या प्राध्यापकीय जीवनाची सुरुवात झाली होती. १९२१ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यपद त्यांना देण्यात आले होते. पुढे भारत सरकारकडून प्राच्यविद्याभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळवून ते फ्रान्स आणि बेल्जियम येथे दोन वर्षे होते. पॅरिस विद्यापीठाची डी. लीट्‌. ही पदवी त्यांनी ह्या वास्तव्यात मिळविली (१९२३). भारतात परतल्यानंतर ते पुन्हा सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकवू लागले. १९२८ मध्ये त्यांना स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. १९३० साली त्यांची पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बदली झाली. १९३२ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक झाले. तेथेच १९४७ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पाच वर्षे बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक व संस्कृत-पाली विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर चार वर्षे दरभंगा येथील मिथिला इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत रिसर्च ह्या संस्थेचे ते संचालक होते. १९६१ पासून पुढील बारा वर्षे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले. येथेच हरिवंशाचे संपादनही त्यांनी केले.
वैद्य ह्यांनी आपल्या संशोधनाचे क्षेत्र निश्चित करून घेतले होते आणि ते म्हणजे संस्कृत, पाली आणि प्राकृत भाषांतील महत्त्वाच्या ग्रंथांचे चिकित्सक आणि पद्धतशीर संपादन करणे. त्यांनी संपादिलेल्या ग्रंथांपैकी काही असे : संस्कृत – महाभारतातले कर्णपर्व (१९५४), रामायणातील अयोध्याकांड व युद्धकांड (१९६२,१९७१), सार्थ वाग्भट, भाग १ व २ (१९१५), अष्टांगहृदय, ललितविस्तर (१९५८), दिव्यावदानम्‌ (१९५९), महायानसूत्रसंग्रह : भाग १ व २ (१९६१ १९६४), लंकावतारसूत्रम्‌ (१९६४) अर्धमागधी – जैन पंथापैकी सूयगडं (१९२१), उवासगदसाओ (१९३०), कुम्मापुत्रचरिय (१९३०), विवागसुयं (१९३२) पाली बौद्ध ग्रंथांपैकी धम्मपद (१९२१), बौद्धागमार्थसंग्रह (१९५६) अपभ्रंश ग्रंथांपैकी जसहरचरिउ (१९३१), महापुराण, ३ भाग (१९३७ १९४० १९४३), हरिवंशपुराण (१९४१). प्राकृत व्याकरणाशी संबंधित – वररुचीचा प्राकृत प्रकाश (१९२३), हेमचंद्रकृत प्राकृत व्याकरण (१९२७), त्रिविक्रमाचे प्राकृत व्याकरण. ह्यांखेरीज सहा भागांत महाभारत सूची (१९६७–७२) त्यांनी तयार केली. बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार (१९२७) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच ३५ प्रदीर्घ लेखही लिहिले.
वैद्य हे ऐहिक गोष्टींच्या बाबतीत उदासीन होते. ‘दरिद्री म्हणून जन्माला आलो, दरिद्री म्हणूनच मरावे’ असे त्यांचे स्वतःबाबतचे विचार होते. मिळालेला पैसा त्यांनी सत्कार्यास्तव देऊन टाकला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराला त्यांनी भरीव आर्थिक मदत केली होती. शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या व्यक्तींनाही ते मुक्तहस्ते साहाय्य करीत. पुणे येथे ते निधन पावले. (वि. बा. इनामदार. मराठी विश्वकोशातून)
…………………………………….
प्रशांतचंद्र महालनोबीस- भारतीय सांख्यिकीविज्ञ (जन्मः २९ जून १८९३; निधनः २८ जून १९७२)
जागतिक सांख्यिकीविज्ञानाच्या (संख्याशास्त्राच्या) क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची विशेष कीर्ती आहे. आर्थिक विकासाकरिता स्वातंत्र्योत्तर काळात जे नियोजन करण्यात आले, त्यात महालनोबीस यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे.
महालनोबीस यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. कलकत्ता येथील प्रेसीडेन्सी कॉलेजातून १९१२ मध्ये भौतिकीची बी.एस्‌सी. पदवी मिळविल्यानंतर १९१५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाची भौतिकी व गणित या विषयांतील एम्.ए. पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजात भौतिकीचे प्राध्यापक (१९१५–२२), भौतिकी विभागाचे प्रमुख (१९२२–४५) आणि कॉलेजचे प्राचार्य (१९४५–४८) व १९४८ नंतर गुणश्री प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानी कलकत्ता येथे वातावरणवैज्ञानिक (१९२२–२६) व कलकत्ता विद्यापीठात सांख्यिकीच्या पदव्युत्तर विभागाचे मानसेवी प्रमुख (१९४१–४५) म्हणूनही काम केले. सांख्यिकीय क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल कार्यामुळे बंगाल सरकारचे सांख्यिकीय सल्लागार (१९४५–४८), भारत सरकारचे सांख्यिकीय सल्लागार (१९४९ पासून) व योजना आयोगाचे सदस्य (१९५५–६७) म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या. कलकत्ता येथे १९३१ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या इंडीयन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे ते प्रथमपासून अध्यक्ष व सचिव होते. ही संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांख्यिकीतील संशोधनाची व प्रशिक्षणाची राष्ट्रीय संस्था म्हणून नावारूपास आली. रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीमध्ये महालनोबीस यांनी कर्मसचिव (मानसेवी प्रमुख सचिव) या पदावर (१९२१–३१) काम केले. १९६० मध्ये भारतातील संपत्तीच्या केंद्रीकरणाची व्याप्ती व उत्पादनाची साधने यांसंबंधी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते.
केंब्रिज विद्यापीठातील शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येताना त्यांनी आपल्याबरोबर कार्ल पीअर्सन यांच्या बायोमेट्रिका या नियतकालिकाचे अंक व त्यांनी प्रसिद्ध केलेली सांख्यिकीविज्ञांना उपयुक्त असलेली कोष्टके आणली. त्यांच्याद्वारे महालनोबीस यांना सांख्यिकीचा परिचय झाला. त्या काळी सांख्यिकी ही वेगळी ज्ञानशाखा म्हणून भारतातच काय पण जगात इतरत्रही मान्यता पावलेली नव्हती. आर्.ए. फिशर व इतर नामवंत शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण संशोधनानंतरच १९२० सालानंतर या ज्ञानशाखेला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. महालनोबीस यांनी सांख्यिकीच्या तीन क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. बहुचरात्मक विश्लेषणात त्यांनी दोन समष्टींतील फरक दर्शविणारी ‘अंतर’ ही संकल्पना व ती मोजण्यासाठी D2 संख्यानक (सांख्यिकीय राशी) १९३० मध्ये प्रतिपादिले. अंतर या संकल्पनेचे त्यांनी पुढे अधिक व्यापकीकरणही केले. फिशर यांनी विकसित केलेल्या प्रयोगांच्या अभिकल्पासंबंधीच्या क्रांतिकारी पद्धती महालनोबीस यांनी भारतात कृषी प्रयोगांसाठी वापरण्याकरिता पुढाकार घेतला. याकरिता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कृषी संशोधकांकरिता अनेक सांख्यिकीय टिपणे तयार केली व त्यांत स्वतःच्या सांख्यिकीय प्रयोगशाळेत नव्याने विकसित केलेल्या आणि सरळ प्रत्यक्षात वापरावयाच्या पूर्वरचित कार्यपद्धतींचा समावेश केलेला होता. या कार्यात त्यांना ⇨ राजचंद्र बोस यांचे मोठे सहाय्य झाले. कृषिविषयक प्रयोगाची योजना आखणे ही एक आर्थिक महत्त्वाची बाब आहे आणि त्याकरिता एका बाजूला प्रयोगाकरिता करावयाचा खर्च व दुसऱ्या बाजूला प्रयोगाद्वारे व्यक्तविलेल्या अंदाजांची अचूकता व विश्वासार्हता यांत समतोल राखणे आवश्यक आहे, असे महालनोबीस यांचे म्हणणे होते. १९४६ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्समध्ये महालनोबीस यांचा बृहत् प्रतिदर्श सर्वेक्षणासंबंधीच्या [मोठ्या आकारमानाचा नमुना घेऊन केलेल्या पाहणीसंबंधीच्या ⟶ प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्धांत] सिद्धांतावरील एक महत्त्वाचा निबंध प्रसिद्ध झाला. हा सिद्धांत मांडण्यासाठी त्याना अनेक पिकांच्या (उदा., बंगालमध्ये भात व ताग आणि उत्तर प्रदेशात गहू व ऊस ) प्रत्यक्ष सर्वेक्षणांत मिळालेल्या अनुभवाचा उपयोग झाला. १९५८ मध्ये त्यांनी नॅशनल सँपल सर्व्हेमार्फत गोळा केलेल्या प्रदत्ताच्या (माहितीच्या) आशयाच्या विवरणासाठी आंशिक आलेखीय विश्लेषणाची पद्धती विकसित केली. या पद्धतीमुळे अशा प्रदत्ताचा अर्थ लावणे गणितीय दृष्ट्या अधिक सुलभ झाले. या पद्धतीमुळे एकाच समाजगटाच्या दोन निरनिराळ्या कालखंडांतील किंवा एकाच कालखंडातील दोन समाजगटांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितींची तुलना करण्यातील अडचण दूर झाली. या सिद्धांतात प्रत्येक गटाचे समतुल्य आंशिक गटांत विभाजन करण्यात येते व मग त्यांची तुलना करण्यात येते.
आर्थिक सिद्धांतातही महालनोबीस यांनी सखोल अभ्यास करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रांतील पर्याप्त (इष्टतम वा अनुकूलतम) गुंतवणुकीचे निर्धारण करण्यासाठी अर्थमितीय प्रतिरूपे [⟶ अर्थमिति] विकसित केली. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर पं. नेहरूंच्या सल्लागार मंडळातील आर्थिक वृद्धी व विकासाबाबतच्या प्रश्नांसंबंधीचे एक तज्ञ या नात्याने महालनोबीस यांनी राष्ट्रीय विकास योजना तयार करण्याचे बहुतांश वेळ कार्य केले. १९५६ मध्ये त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा सरकारला सादर केला. हा आराखडा नंतरच्या पंचवार्षिक योजना आखण्याकरिता आधारभूत ठरला. नियोजनावरील महालनोबीस यांचे विचार काहीसे परंपरागतच होते. नियोजनाद्वारे रोजगाराचे नवनवे मार्ग निर्माण झाले पाहिजेत आणि राहणीमानात हळूहळू सुधारणा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. ही उद्दिष्टे हस्तउद्योग आणि मोठे (अवजड) उद्योग यांचा एकाच वेळी विकास करून साधता येतील असा त्यांचा विश्वास होता. बेकारी हा भारतातील सर्वांत निकडीचा प्रश्न असून नियोजनाच्या पश्चिमी दृष्टिकोनाचा अवलंब करून हा प्रश्न सुटू शकणार नाही, याची त्यांना जाणीव होती. यामुळे मोठ्या उद्योगात गुंतवणूक करावी म्हणजे लघुउद्योगांची मागणी वाढेल, अशी त्यांची अपेक्षा होती. भावी गुंतवणूकी करण्यासाठी देशांतर्गत संपत्तीचा विनियोग करण्याची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. बेकारांना व अनिवार्य काळात कामावरून कमी केलेल्या कामगारांना मदत करण्याच्या दृष्टीने एक राष्ट्रीय कामगार संघ निर्माण करावा, असे त्यांनी सुचविले होते.
महालनोबीस यांना अनेक अमेरिकन, युरोपीय व आशियाई देशांतील संस्थांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या होत्या. ऑक्सफर्डचे वेल्डन पदक व पारितोषिक (१९४४), कलकत्ता विद्यापीठाचे सर्वाधिकारी सुवर्ण पदक (१९५७), चेकोस्लोव्हाकिया ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सुवर्ण पदक (१९६४) वगैरे अनेक सन्मान त्यांना मिळालेले होते. भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. भारतीय विज्ञान परिषदेचे ते १९५० मध्ये अध्यक्ष होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे संस्थापक सदस्य (१९३५) व अध्यक्ष (१९५७–५८), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य लंडनच्या रॉयल सोसायटीचे (१९४५), रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे, अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशनचे सदस्य इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सदस्य (१९३७), सन्मान्य सदस्य (१९५२) व सन्मान्य अध्यक्ष (१९५७) इंटरनॅशनल बायोमेट्रिक सोसायटीचे उपाध्यक्ष (१९४७) पाकिस्तान स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशनचे सन्मान्य सदस्य (१९५२) इंटरनॅशनल इकॉनॉमेट्रिक सोसायटीचे सदस्य रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजचे सन्मान्य सदस्य (१९५८) वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे सदस्य (१९६३) संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकीय समितीचे सदस्य (१९४६) व अध्यक्ष (१९५४–५८) संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकीय प्रतिदर्शन उपसमितीचे अध्यक्ष (१९४७–५१) वगैरे अनेक पदे त्यांनी भूषविली. वॉशिंग्टन येथील जागतिक सांख्यिकीय परिषद (१९४७) इ. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळात सदस्य, निरीक्षक वा नेता म्हणून काम केले. भारतातील सांख्यिकीय संशोधनात अग्रगण्य म्हणून मानण्यात येणारे संख्या हे नियतकालिक १९३३ मध्ये महालनोबीस यांनी स्थापन केले आणि तेव्हापासून त्याचे सातत्याने संपादन करून आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्रात त्याला मानाचे स्थान त्यांनी प्राप्त करून दिले. विश्वभारतीच्या विश्वभारती पत्रिका या नियतकालिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले. टॉक्स ऑन प्लॅनिंग (१९६१), ॲन ॲप्रोच ऑफ ऑपरेशनल रिसर्च टू प्लॅनिंग इन इंडिया (१९६३) एक्सपिरिमेंट्स इन स्टॅटिस्टिकल सँपलिंग (१९६१) वगैरे ग्रंथ, तसेच अनेक वाङ्‌मयीन व तत्त्वज्ञानविषयक लेख व निबंध त्यांनी लिहिले. ते कलकत्ता येथे मृत्यू पावले. (व. ग. भदे. मराठी विश्वकोशातून)
…………………………………….
कमलाकर जयराम सारंग- नाट्यअभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक (जन्मः २९ जून १९३४; निधनः २५ सप्टेंबर १९९८)
चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. नाट्यअभिनेत्री लालन सारंग या त्यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला.
विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी व ऐतिहासिक ठरले. लालन सारंग यांनी ‘चंपा’ आणि निळू फुले यांनी ‘सखाराम’ या भूमिका केल्या होत्या. ”सखाराम सुरू झालं आणि तेरा प्रयोगांतच नाटक अश्लील आहे, अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं. त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. तीन महिन्यांतच पुण्यातल्या ‘लिंग निर्मूलन समितीनं’ तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ व ‘सखाराम बाइंडर’ ही नाटके होऊ द्यायची नाहीत, असे ठरवले. पुन्हा लढा, त्यातूनही बाहेर पडलो. खूप अनुभव! ” लालन म्हणतात, ”स्वत:चं व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला होता.” सारंगानी त्या आठवणींवर “बाइंडरचे दिवस” पुस्तक लिहिले आहे.
…………………………………….
समीर दिवाकर चौघुले- उत्कृष्ट लेखक, विनोदी अभिनेता यांचा आज वाढदिवस (जन्म २९ जून १९७३ मुंबई येथे)

समीर चौघुले हे नाव जरी ऐकले तरी आपल्या चेहऱ्यावर हास्य येते. त्याचे अनेक स्किट आपण ऑनलाईन पाहत असतो. कितीही टेन्शन असेल कितीही त्रास असेल तरीही समीर चौघुलेचे व्हिडिओ पहिल्या वर चेहऱ्यावर हसू येणार ह्यात काहीच शंका नाही. समीर यांनी आजपर्यंत व्यावसायिक नाटके, इंग्रजी रंगभूमी, दूरचित्रवाणीवरील मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपट, स्वतंत्र लेखन अशी चौफेर मुशाफिरी आजवर केली आहे. समीर चौघुले यांनी आपले शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी मधून केले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पूर्ण केले. त्यांना अभिनयाचे वेड होते. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकात काम करायला सुरुवात केली होती.

आपले कॉलेज संपल्यानंतर त्यांनी ह्याच क्षेत्रात आपल्याला करीयर करायचे असे ठरवले. सुरवातीला मुंबईत नोकरी करत असताना त्यांचा अभिनय चालू होता. पुढे नोकरी सोडून ते २००२ मध्ये आपली नोकरी सोडून पूर्णपणे अभिनयात क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. उतरला. त्याने अनेक नाटकात, मालिकात आणि सिनेमात छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. समीर चौघुले यांनी श्री बाबा समर्थ, बालक पालक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, व्यक्ती आणि वल्ली, यदा कदाचित, वाऱ्या वरची वरात, असा मी असा मी ह्या मराठी नाटकात तर केरी ओन हेवन्स आणि बेस्ट ऑफ बॉटॉम् ह्या इंग्लिश नाटकात सुद्धा कामे केली आहेत. कायद्याचं बोला, आजचा दिवस माझा, मुंबई मेरी जान, वक्रतुंड महाकाय, पेईंग घोस्ट, मुंबई टाइम आणि विकून टाक ह्या मराठी चित्रपटात सुद्धा त्यांनी अभिनय केला आहेत. समीर चौघुले यांनी सोनी मराठीवरील ‘कॉमेडीची हास्यजत्रा’ ह्या रिएलिटी शोमध्ये काम केले आहे. विशाखा सुभेदार सोबत त्यांची अफलातून कोमेडी नेहमीच रसिक प्रेक्षकांची मन जिंकत आली आहे.

समीर चौघुले यांना २०१६ मध्ये संस्कृती कलादर्पण नाट्य विभाग आणि २०१५ मध्ये झी नाट्यगौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. ‘श्री बाई समर्थ’ या नाटकाकरीता चौगुले यांना राज्य शासनाच्या व्यावसायिक नाटक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रोप्य पदकाने गौरविण्यात आले असून सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा विविध पुरस्कारांनी आजपर्यंत त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याच्या पत्नीचे नाव कविता समीर चौघुले असून त्या या दुनियेपासून लांब राहणे पसंद करतात. प्रसिद्ध विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘राम नगरकर कला गौरव पुरस्कार’ यंदा, दि. ८ जून रोजी, गेली २८ वर्षे रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असलेले, विनोदाचं अचूक टायमिंग साधणारे प्रसिद्ध कलाकार समीर चौघुले यांना जाहीर करण्यात आला आहे.

\

पं. अतुलकुमार बाळकृष्ण उपाध्ये प्रसिद्ध व्हायोलिनवादक यांचा आज वाढदिवस. (जन्म: २९ जून १९५७ पुणे येथे)
पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी आपल्या वयाच्या चौथ्या वर्षांपासून व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील बाळकृष्ण. शं. उपाध्ये हे व्हायोलिन वादनातील गुरु. त्यांनी गाणं शिकल्याशिवाय व्हायोलिन हाती घ्यायचे नाही असे सांगितले. त्यामुळे पं.अतुलकुमार उपाध्ये हे अगदी गायक नसले तरी त्यांच्या सुरांचे ज्ञान पक्के आहे. पं. एम. एम. गोपालकृष्णन, येहूदी मेन्युहिन आणि श्रीधर पार्सेकर हे व्हायोलिन वादनामध्ये त्यांचे आदर्श होत. पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर अशा दिग्गज कलाकारांचे त्यांना आशीर्वाद लाभले आणि त्यांचे संस्कार पं.अतुलकुमार उपाध्ये यांच्यावर झाले. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात १९८८ मध्ये पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली व्हायोलिनवादनाची संधी ही त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली. त्यापूर्वी इतक्या मोठय़ा समुदायासमोर कधी वादन केले नव्हते. या मैफिलीने त्यांना आत्मविश्वास दिला. पं.अतुलकुमार उपाध्ये यांनी सतारवादक उस्ताद शाहीद परवेज, बासरीवादक पं. रोणू मुजुमदार, सनईवादक दया शंकर, सारंगीवादक उस्ताद दिलशाद खाँ, सरोदवादक पं. तेजेंद्र मुजुमदार या कलाकारांसमवेत व्हायोलिनची जुगलबंदी केली आहे. त्यांची स्वत:ची पुण्यात व्हायोलिन अॅजकॅडमी आहे. ही व्हायोलिन अॅीकॅडमी सात दशकांपासून संगीताच्या प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. या व्हायोलिन अॅवकॅडमीच्या माध्यमातून नव्या पिढीचे कलाकार घडविण्याचे काम केले जाते. या सोबतच या व्हायोलिन अॅ.कॅडमीच्या माध्यमातून स्वरझंकार, स्वरमल्हार, स्वरदीपावली, स्वरमैफल अशा दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते. आज पर्यत देशभरातील २५ शहरांत स्वरझंकार महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. अनेक वर्षे सातत्याने दर्जेदार अशा मैफिलींमधून उत्तमोत्तम कलाकार देणाऱ्या अतुलकुमार उपाध्ये यांनी ‘स्वरझंकार्स म्युझिक हब’ ची सुरुवात केली आहे. व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये हे अतुलकुमार उपाध्ये यांचे सुपुत्र होत.

  • संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »