साखर कारखान्यांनी संशोधनात गुंतवणूक करावी – शरद पवार

पुणेः- साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर असून महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर अव्वलस्थानी आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात वैश्विक पातळीवरील आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार यांनी व्यक्त केले.
डीएसटीए अर्थात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन या साखर उद्योग क्षेत्रातील अग्रणी संस्थेतर्फे हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे आयोजित दोन दिवसीय 67 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेेचे संचालक नरेंद्र मोहन, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, डीएसटीए महाराष्ट्राचे उपाध्यक्ष एस. बी. भड, डीएसटीए कर्नाटकचे उपाध्यक्ष सोहन शिरगावकर, कल्लाप्पाण्णा आवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते डॉ. एस.एम. पवार, एन. व्ही. थेटे, सी.जी. माने, डॉ.डी.एम. रासकर, ओ. बी. सरदेशपांडे आणि सी.एन. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर गुजरात येथील गणदेवी साखर खांड उद्योग लि., कर्नाटक मधील उगार शुगर वर्क्स लि. आणि महाराष्ट्रातील जवाहर सहकारी साखर कारखाना लि. या तीन साखर कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले. तसेच यावेळी प्रभाकर कोरे, मोहनराव कदम, जयंत पाटील, नवीनभाई पटेल आणि प्रशांत परिचारक यांना यंदाचा साखर उदयोग गौरव पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. मोहनराव कदम यांच्यावतीने त्यांचे बंधू रघुनाथराव कदम यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यावेळी कृषी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील शोधनिबंधांसाठीची आणि उत्पादनासाठीची पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी साखर उद्योगाशी संबंधित कृषी, तांत्रिक आणि अभियांत्रिकी विषयाच्या संशोधन पुस्तिकेचे आणि ए.आर. पाटील यांच्यावरील मार्विक मएस्ट्रो या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, साखर निर्मिती उद्योगामध्ये संशोधन आणि तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून त्याचा उपयोग या उद्योग प्रक्रीयेतील प्रत्येक छोट्या घटकाला होणे आवश्यक आहे. साखर उद्योगाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. अगदी मानसूनपासून दुष्काळ, पूर, कीड,भारनियमन, हमीभाव अशा प्रत्येक टप्प्यावर येत असलेल्या संकटांचा विचार करून तरूण पिढीने यावर उपयुक्त असे संशोधन करावे. या क्षेत्रातील संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज असून ज्या प्रकारच्या संशोधनामुळे कोणत्याच पातळीवर नुकसान होणार नसेल अशा संशोधनाला मान्यता देणे गरजेचे आहे. कृषी उत्पादनात साखर निर्यातीत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या आपल्या देशाने पर्यावरणाच्या दृष्टीने देखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. प्रदूषणाचा वाढता विळखा लक्षात घेऊन इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना देखील अधिक चालना दिली पाहिजे. डीएसटीए अर्थात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ही साखर उद्योग क्षेत्रातील एक अग्रणी संस्था असून प्रख्यात उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी दूरदृष्टी ठेवून १९३६ मध्ये या संस्थेची स्थापना केली. मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील साखर उद्योगाच्या तांत्रिक गरजांची पूर्तता करणे आणि या उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन केली असून साखर निर्मिती उद्योगांंना आजही अव्याहतपणे डीएसटीए आपली सेवा देत आहे. डीएसटीएची सभासद संख्या २२०० हून अधिक असून यामध्ये साखर उद्योगाशी संबंधित तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे, ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. साखर उद्योगाच्या विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 4-5 संस्था देशात असून त्यामध्ये डीएसटीएचे स्थान वरचे आहे.
यावेळी बोलताना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, यंदाच्या वर्षी जागतिक पातळीवरील साखर निर्मितीत पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून भारताने स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर असून ब्राझील दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक पातळीवरील देशांच्या क्रमवारीत चीन, रशिया, थायलंड या देशांना मागे टाकून एखाद्या देशातील राज्याने स्थान मिळवण्याचा इतिहास महाराष्ट्राने रचला आहे. साखर उद्योगाला सोन्याचे दिवस आले असून दिनांक 15 सप्टेंबर 2022 पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 42 हजार 600 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. एकही रूपया सबसिडी न देता देशातून एकशे बारा लाख टन साखर यावर्षी निर्यात झाली आणि त्यापैकी 75 लाख टन साखर ही महाराष्ट्रातून निर्यात झाली, ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती म्हणाले की, या परिषदेत ९०० हून अधिक मान्यवर सहभागी झाले असून त्यामध्ये साखर निर्मिती उद्योग आणि त्याच्याशी संबंधित उद्योग-व्यवसायांशी संबंधित चेअरमन, कार्यकारी संचालक आणि तंज्ञत्र यांचा समावेश आहे. या परिषदेत कृषी, अभियांत्रिकी अशा विविध विषयांशी संबंधित ४७ शोधनिबंध सादर होणार असून त्यावर चर्चा देखील होणार आहे.
यावेळी नरेंद्र मोहन, सोहन शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. डीएसटीए महाराष्ट्राचे उपाध्यक्ष एस. बी. भड यांनी आभार मानले.