आज धनत्रयोदशी
आज मंगळवार, ऑक्टोबर २९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ७, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:०६
चंद्रोदय : ०४:४२, ऑक्टोबर ३० चंद्रास्त : १६:१६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – १०:३१ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – १८:३४ पर्यंत
योग : इन्द्र – ०७:४८ पर्यंत
करण : तैतिल – १०:३१ पर्यंत
द्वितीय करण : गर – २३:५३ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १५:१४ ते १६:४०
गुलिक काल : १२:२२ ते १३:४८
यमगण्ड : ०९:३० ते १०:५६
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : ०८:५५ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : २३:०७ ते २३:५७
अमृत काल : १०:२५ ते १२:१३
वर्ज्य : ०४:०४, ऑक्टोबर ३० ते ०५:५३, ऑक्टोबर ३०
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते.
व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.
आज धनत्रयोदशी आहे.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते.
आज यमदीपदान आहे.
धनतेरस हा दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस भगवान धन्वंतरी या देवतेचा वाढदिवस म्हणून हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरींना आरोग्याची देवता संबोधले जाते. त्यामुळे भारतीय चिकित्सक हा दिवस अत्यंत भक्तिभावाने धन्वंतरींचे पूजन करून साजरा करतात.
आज धन्वन्तरी जयंती आणि पूजन आहे.
आज जागतिक पक्षाघात दिन आहे.
वैद्यकीय संशोधक डॉ वसंत रामजी खानोलकर – शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच पूर्ण झाल्यावर खानोलकर ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून एम.बी.बी.एस. ही पदवी उत्तम गुणांनी मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल व मेडिकल स्कूल या संस्थेत त्यांनी विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजी) या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. त्यापूर्वी सतत तीन वर्षे विकृतिशास्त्र या विषयात एकाही विद्यार्थ्यास परीक्षेत यश मिळाले नव्हते. त्यानंतर १९२३ साली विकृतिशास्त्र विषय घेऊन एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान एकाच विद्यार्थ्यास मिळाला. हा बहुमान मिळवणारी व्यक्ती म्हणजे खानोलकर. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे हे यश केवळ देदीप्यमान होते.
परीक्षेतील यशामुळे खानोलकरांना पुढील अभ्यासासाठी ग्रॅहम संशोधन शिष्यवृत्ती सहजच मिळाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांची दृष्टी वैद्यकीय संशोधनाकडे वळली. या काळातच वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी मूलभूत संशोधन करणे आवश्यक आहे, हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला. स्वदेशाच्या प्रगतीसाठी वैद्यकीय संशोधन करण्याचा निश्चय करून खानोलकर मुंबईस परतले. ज्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी पदवी मिळवली होती, तेथेच त्यांनी स्वत:ची वैद्यकीय कारकीर्द सुरू केली. ग्रॅन्ट वैद्यकीय कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी अनेक तरुण डॉक्टरांना वैद्यकीय संशोधन करण्याची प्रेरणा दिली.
डॉक्टरांना बऱ्याचदा पेशंट, तसेच ऊती किंवा पेशींची छायाचित्रे घ्यावी लागतात. त्यासाठी डॉ. खानोलकरांनी छायाचित्रण विभाग सुरू केला. आज हे सर्व विभाग रुग्णालयात असणे गृहीत धरले जाते. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या विभागांची निर्मिती करणे क्रांतिकारक तर होतेच, पण व्यावहारिकही होते. खानोलकर शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळेच के.ई.एम. रुग्णालयामधील प्राध्यापकपद स्वीकारताना त्यांनी आपणांस नियमाप्रमाणे पंचावन्नाव्या वर्षी निवृत्त करण्यात यावे, अशी अट घातली होती.
के.ई.एम. रुग्णालयामध्ये कार्यरत असताना, खानोलकरांपुढे एक आव्हान नव्याने उभे राहिले. ते म्हणजे कर्करोग संशोधन व रोग्यावर उपचार करण्यासाठी नव्याने बांधलेल्या टाटा स्मारक रुग्णालयाची स्थापना. पंधरा वर्षांच्या योगदानानंतर त्यांनी के.ई.एम. रुग्णालय स्वेच्छेने सोडून टाटा स्मारक रुग्णालयाच्या विकृतिशास्त्र विभागाचे संचालकपद स्वीकारले. खानोलकरांच्या सहभागामुळे टाटा स्मारक रुग्णालयाला प्रतिष्ठा लाभली. वैद्यकीय संशोधन हे वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे याबद्दल त्यांची खात्री होती. त्यांना मिळालेल्या जागतिक प्रसिद्धीमुळे कित्येक तरुण विकृतिशास्र व संशोधन या विषयाकडे आकर्षित झाले. यांतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दिवंगत धन्वंतरी डॉ.दोराब दस्तूर. त्यांनी खानोलकरांच्या मार्गदर्शनाखाली मज्जातंतुविकृतिशास्त्र (न्युरोपॅथॉलॉजी) या विषयात एम.डी. पदवी मिळवली व संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग संशोधनासाठी वेचून जगन्मान्यता मिळवली.
टाटा स्मारक रुग्णालयामध्ये डॉ. खानोलकरांनी नव्याने आधुनिक विभागाची मांडणी केली. विविध प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान होण्यासाठी शिक्षण देऊन कुशल विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्ट) नवी पिढी तयार केली. कर्करोग्यांना योग्य तऱ्हेचा व वेळीच उपचार मिळावा या हेतूने संशोधनाचा पाया घातला. विकृतिशास्त्र या विषयाची उंची वाढविण्यासाठी त्यांनी ‘टीचिंग पॅथॉलॉजिस्ट’ ही चळवळ उभी केली. यात त्या-त्या विभागातील तज्ज्ञांच्या अनुभवावर चर्चा, वादविवाद होत असत व शोधनिबंध वाचले जात. तसेच भारतातील सर्व विकृतिशास्त्रज्ञांना एकत्रित करण्यासाठी ‘इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स’ हे व्यासपीठ तयार केले.
कर्करोग संशोधनाच्या सुरुवातीस त्यांनी हुशार विद्यार्थी निवडून त्यांच्याकरवी उत्तम संशोधन करून घेतले. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्करोग संशोधनाचे पैलू दाखवून प्रत्येक शाखेत नेतृत्व तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट’ला जागतिक मान्यता मिळाली. या संस्थेत त्यांनी टिश्युकल्चर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, बायोफिजिक्स, इम्युनोलॉजी, केमोथेरपी, एन्डोक्राइनॉलॉजी, एम्ब्रायॉलॉजी व ह्यूमन जेनेटिक्स विभाग निर्माण केले.
कर्करोग संशोधनात प्राण्यांचा वापर आवश्यक असतो. याकरिता खानोलकरांनी संस्थेत प्राणिगृहाची स्थापना केली. या विभागाच्या देखरेखीसाठी एका तंत्रज्ञाला इंग्लंड येथे एका वर्षाकरिता शिक्षण व अनुभव घेण्यासाठी पाठवले. या तंत्रज्ञाने मायदेशी आल्यावर अनेकांना शिक्षित तयार केले व कर्करोग संशोधनास उपयुक्त अशा कितीतरी जातींची निपज केली. त्याचप्रमाणे, संस्थेचा छायाचित्रण विभाग (फोटोग्राफी डिपार्टमेंट) अद्ययावत असावे, या हेतूने एका तंत्रज्ञास इंग्लंड व युरोपमधील प्रयोगशाळांत धाडून प्रशिक्षित केले व उत्तम छायाचित्रण विभागाची स्थापना केली. कर्करोग संशोधनासाठीदेखील खानोलकरांनी कुशल नेतृत्व तयार केले. संस्थेतील प्रत्येक संशोधकाने परदेशातील प्रयोगशाळांत काम करून अनुभव व ज्ञानाची कक्षा वाढवावी, ही त्यांची धारणा होती. कर्करोगावरील जागतिक संशोधनाची त्यांना सखोल माहिती असे व आपल्या देशात कोणत्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे, याबद्दल त्यांचे विचार पक्के होते.
खानोलकरांनी वैद्यकशास्त्रातील वैज्ञानिक चळवळ उभारली. यातूनच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (एन.आय.आर.आर.एच.), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी या संस्था निर्माण झाल्या. या संस्थांचे तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील बायोमेडिकल ग्रूपचे बीज त्यांच्या प्रेरणेने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सुरुवातीच्या विकृतिशास्त्र प्रयोगशाळेत व नंतर कर्करोग संशोधन केंद्रातच रोवले गेले. देशापुढील वैद्यकीय समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी अचूक दृष्टी असणाऱ्या खानोलकरांना देश-विदेशांत अनेक सन्मान मिळाले.
इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर (यु.आय.सी.सी.) या जागतिक संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अणुविभाजनातून उद्भवणाऱ्या वाईट परिणामांपासून संरक्षण करण्याबाबतच्या वैज्ञानिक समितीवर भारताचे प्रतिनिधी व नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. अमेरिका, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील वैज्ञानिकांनी त्यांचा सन्मान केला.
भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवीने गौरविले. ते १९६० ते १९६३ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. मराठी विज्ञान परिषदेने आपल्या १९६७ सालच्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा सन्मान केला होता.
१९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे डॉ वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल , १८९५)
- घटना :
१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
मृत्यू:
•१९८१: अभिनेते दादा साळवी यांचे निधन. (जन्म : ४ डिसेंबर १९०४ )
१९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल, १९०३)
- जन्म :
१९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च, २०००)
१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.