शंभर कोटींच्या वसुलीसाठी ‘भीमा पाटस’वर कारवाई : अजित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सुमारे १०० कोटींहून अधिकचे कर्ज थकीत आहे. ठरल्याप्रमाणे ही रक्कम न मिळाल्यास जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती या बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली
बॅंकेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद पवार बोलत होते.

ही थकबाकी भरण्यासाठी या कारखान्याला एकरकमी परतावा (वन टाइम सेटलमेंट) करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु यासाठी दिलेली मुदत संपून त्यानंतर चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. याबाबत माहिती घेतली असता, तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने, ही रक्कम भरता आलेली नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र ही थकबाकी न भरल्यास जिल्हा बॅंक ही भीमा पाटस कारखान्यावर वसुलीसाठीची नियमावर कारवाई करेल, असे पवार म्हणाले.

पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव अग्रेसर बँक ठरली आहे. बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षात ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सध्या बँकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटींच्या झाल्या आहेत. मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण सात हजार ९७४ कोटी तीन लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. चालू वर्षी बँकेच्या शाखेमध्येच शेतकऱ्यांना अवघ्या २० रुपयांत ई सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

बँकेच्या नोकरभरतीसंदर्भात एजन्सी नियुक्त करण्यासाठी सहकार विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती देऊन क्षारपड जमिनीत सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी प्रत्येकी ९६ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »