डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा विचार
नवी दिल्ली : केंद्र सरकार डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
भारतीय इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढवून विदेशी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून ईबीपी अर्थात इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम हाती घेण्यात आला आहे. पुढील 2 वर्षांत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आहे.
मागच्या मे महिन्यामध्ये, पेट्रोलमध्ये सरासरी इथेनॉल मिश्रण प्रथमच 15% पेक्षा जास्त होते. इथेनॉल खरेदीत वाढ झाल्यामुळे हे शक्य झाले. भविष्यात डिझेलमध्येही इथेनॉलचे मिश्रण करून, क्रूड तेलाची आयात आणखी कमी करण्याचा विचार आहे.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ने आधीच BS3 आणि BS6 बसगाड्यांवर इथेनॉल-मिश्रित डिझेलच्या चाचण्या घेतल्या आहेत. नियमित डिझेलच्या तुलनेत इंधनाचा वापर किंचित कमी असल्याचे चाचण्यांमध्ये दिसून आले. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पुढील चाचण्या घेणे अपेक्षित आहे.