माणुसकीला काळिमा! : ऊसतोड कामगाराचा मृत्यू, पण मुकादमाची अंत्यविधीसाठीही अमानुष अट!

औंढानागनाथ : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीचे कष्ट उपसणाऱ्या एका मजुराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, या दु:खद प्रसंगातही माणुसकी विसरलेल्या एका मुकादमाने मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी जाण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “आधी अंत्यविधी करा आणि लगेच कामावर परत या,” अशा अमानुष अटीवरच या मजुरांना आपल्या हक्काच्या माणसाला निरोप देता आला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील एक मजूर गट मानवत (जि. परभणी) भागात ऊस तोडणीसाठी गेला होता. १९ डिसेंबर रोजी एका कामगाराचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आपल्या सहकाऱ्याचा आणि नातेवाईकाचा मृतदेह घेऊन गावाकडे अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी मजुरांनी मुकादमाकडे परवानगी मागितली. मात्र, मुकादमाने त्यांना जाण्यास स्पष्ट नकार दिला.
अंत्यविधी आटोपला अन’ रक्षाविसर्जना’आधीच कामावर ओढले
बराच वेळ विनवण्या केल्यानंतर मुकादमाने एक अट घातली. तो स्वतः सोबत येईल आणि अंत्यविधी संपताच सर्व मजुरांना तात्काळ पुन्हा उसाच्या फडावर परत यावे लागेल. नाइलाजास्तव मजुरांनी ही अट मान्य केली. अंत्यविधी उरकताच, हिंदू धर्मातील महत्त्वाचा ‘रक्षा सावडण्याचा’ विधी होण्यापूर्वीच मुकादमाने सर्व कामगारांना पुन्हा कामावर नेले. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
‘उचल‘ ठरतेय गुलामीची साखळी?
ऊसतोडणीला जाण्यापूर्वी कामगार मुकादमाकडून ठराविक रक्कम ‘उचल’ (अॅडव्हान्स) म्हणून घेतात. याच पैशांच्या जोरावर मुकादम कामगारांना वेठबिगारीसारखी वागणूक देतात, असा संशय व्यक्त होत आहे. औंढ्यातील या घटनेने ऊसतोड मजुरांच्या शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा मुकादमांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मुख्य ठळक :
- हृदयद्रावक: मयताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठीही मुकादमाच्या अटीचा सामना.
- आक्रोश: रक्षा सावडण्यापूर्वीच मजुरांना पुन्हा कामावर जुंपले.
- प्रश्न: मजुरांची ‘उचल’ म्हणजे त्यांची गुलामी आहे का?






