तनपुरे साखर कारखान्यावर प्रशासक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नगर – डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ अखेर बरखास्त झाले. त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची एक वर्षांच्या कालावधीसाठी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी त्वरित कारभार ताब्यात घेतला. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे, राहुरीचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) दीपक नागरगोजे उपस्थित होते.

तनपुरे साखर कारखाना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या आधिपत्याखालील संचालक मंडळाच्या ताब्यात होता. संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत १६ जून २०२१ रोजी संपली. मात्र कोरोना काळात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने कारखान्याच्या संचालक मंडळाला एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १६ जून २०२२ संपली.

दरम्यान, कारखाना बचाव समितीतर्फे अमृत धुमाळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली होती. तसेच राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तनपुरे कारखान्यास निवडणूक प्रक्रियेसाठी ३२ लाख निधी भरण्याचे कळविण्यात आले. मात्र साखर कारखान्याने निवडणूक खर्चाची सुमारे ३२ लाखांची रक्कम जमा करण्यास असमर्थता दर्शवल्याने कारखान्यावर प्रशासक येणे अपरिहार्य होते.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक (सहकारी संस्था) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनीस कारखाना प्रशासक नेमण्याचा आदेश काढला. कारखान्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक मंडळ अस्तित्वात आले आहे.

प्रशासक मंडळात मुख्य प्राधिकृत अधिकारी म्हणून गणेश पुरी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), अहमदनगर, तर प्राधिकृत अधिकारी म्हणून देविदास घोडेचोर, सहायक निबंधक (सहकारी संस्था), जामखेड आणि प्रकाश सैंदाणे, उप लेखापरीक्षक, सहकारी संस्था अधीन विलेप वर्ग-२ (पणन) अहमदनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »