साखर उत्पादनात ‘जवाहर’ अव्वल, देशात महाराष्ट्राचा क्रमांक पहिलाच
साखर आयुक्तांकडून गाळप हंगामाचा सविस्तर आढावा
- गाळप हंगामाची वैशिष्ट्ये
- साखर उत्पादनात राज्यात पहिला : जवाहर शेतकरी सह. साखर कारखाना (हुपरी)
- ऊस गाळपात राज्यात पहिला : विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखाना (माढा)
- उताऱ्यात राज्यात पहिला : श्री पंचगंगा सह. साखर कारखाना (हातकणंगले) – १२.८६
पुणे : तब्बल २२ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, साखर उत्पादनात राज्यात अव्वल ठरला आहे, तर सुमारे १०५ लाख टनांसह यंदाही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.
यंदाच्या गाळप हंगामाची एप्रिलमध्ये अखेर झाली आणि राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी गाळप हंगाम २०२२-२३ चा तपशीलवार आकडेवारीसह आढावा घेतला.
महाराष्ट्राची आनंदाची आणि अभिमानाची बाब अशी की, राज्याचे साखर उत्पादन यंदा सुमारे 32 लाख टनांनी घटूनदेखील, देशात पहिला क्रमांक कायम राखला आहे. १०५ लाख टनांसह आपले राज्य, एक नंबरला तर उत्तर प्रदेश १०१ लाख टन साखर उत्पादनासह दुसऱ्या स्थानी आहे.
आयुक्तांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, साखर उत्पादनात हुपरीचा कलाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना राज्यात प्रथमस्थानी आहे. त्याने २२ लाख ७ हजार ७० क्विंटल साखर उत्पादन केले, मात्र एकूण ऊस गाळपात माढ्याचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना १८ लाख ४१ हजार ४२१ टनांसह राज्यात अव्वल ठरला.
साखर उत्पादनात जवाहरनंतर, पहिल्या दहा कारखान्यांमध्ये गुरू कमोडिटीज (जरंडेश्वर, कोरेगाव ), विठ्ठलराव शिंदे ससाका, इंडिकॉन डेव्हलपर्स, कर्जत, तात्यासाहेब कोरे ससाका, सोमेश्वर ससाका, बारामती ॲग्रो, माळेगाव ससाका, श्री दत्त शिरोळ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात ससाका या कारखान्यांचा समावेश आहे.
ऊस गाळप पहिल्या दहामध्ये शिंदे सह. साका खेरीज, जरंडेश्वर शुगर, जवाहर शेतकरी ससाका, बारामती ॲग्रो (शेटफळगढे), इंडिकॉन डेव्हलपर्स, तात्यासाहेब कोरे ससाका, माळेगाव ससाका, सोमेश्वर ससाका, ज्ञानेश्वर ससाका आणि श्री दत्त शिरोळ ससाका या कारखान्यांचा समावेश आहे.
साखर उताऱ्यामध्ये पंचगंगा सहकारी साखर कारखाना (रेणुका शुगर) १२.८६ सरासरीसह राज्यात प्रथमस्थानी आहे. त्याखालोखाल राजाराम बापू ससाका (करंदवाडी), राजाराम बापू ससाका (वाटेगाव), कुंभी-कासारी ससाका (कुडित्रे), दूधगंगा वेदगंगा (कागल), सह्याद्री ससाका (कराड), भोगावती ससाका (करवीर), उदयसिंह गायकवाडा ससाका (अथणी शुगर्स – शाहूवाडी), अथणी शुगर्स (भुदरगड) आणि विश्वासराव नाईक ससाका (शिराळा) यांचा समावेश आहे.
१००० लाख टनांपेक्षा अधिक गाळप
यंदाच्या साखर हंगामात राज्यात १०५३ लाख टन ऊस गाळप झाले असून, १०५.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा दहा मिळाला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत एकूण सुमारे ३० लाख टन ऊस गाळप घटले आहे, तर साखर उत्पादनात सुमारे ३२ लाख टनांनी घट होऊन, सुमारे १०५.३ लाख टन एवढे उत्पादन झाले आहे. गेल्या वेळी ते १३७.३ लाख टन एवढे होते, अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली.