एमडी इच्छुकांची परीक्षा सुरळीत

पुणे : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पॅनल करण्यासाठी गुरुवारी पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेमध्ये दुपाऱच्या वेळेत मुख्य परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत आणि शांततेत पार पडली.
४ मे २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता परीक्षेस प्रारंभ झाला. त्यासाठी दीड वाजेपर्यंत हजेरी लावण्याची मुदत देण्यात आली होती. एकूण ७५ गुणांचा पेपर सोडवण्यास दोन तास तीस मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. इच्छुकांच्या चेहऱ्यावर मोठी उत्सुकता दिसून आली.
यापूर्वी म्हणजे ५ एप्रिल रोजी झालेल्या प्राथमिक (चाळणी) परीक्षेत २३९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते.
या पदासाठी प्राथमिक परीक्षा घेण्याचे ठरले आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले तेव्हा ४४८ अर्ज आले होते. मात्र अवघे २५३ उमेदवार पात्र ठरले. त्यांची परीक्षा वैकुंठभाई मेहता संस्थेने घेतली. २५३ पैकी २३९ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले.

दरम्यान, शैक्षणिक अर्हता आणि इतर पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या ४० उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसता येणार नव्हते. त्यांनी आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांना मुख्य परीक्षेस बसण्याची अनुमती दिली, मात्र त्यांचा निकाल याचिकेची सुनावणी पूर्ण होईपर्यंत राखीव ठेवण्याचा आदेश दिला होता.
मुख्य परीक्षेचा निकाल या महिन्याच्याच दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.