रियल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : येथील ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन संस्थेतर्फे रियल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यात साखर उद्योगातील दोन व्यक्तिमत्त्वे बाजीराव सुतार आणि डॉ. यशवंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात २३ मे रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

ग्रीन वर्ल्डचे प्रमुख गौतम कोतवाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. साखर उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जी. सुतार आणि कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, असे पत्रकात म्हटले आहे. विभागीय आयुक्त, (छत्रपती संभाजी नगर) दिलीप गावडे व अजय केसरी (इन्कम टॅक्स कमिशनर, पुणे) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या साडेतीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे या क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. डीएसटीएच्या कौन्सिल सदस्यासह, ते विविध संस्था आणि समित्यांवर पदाधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना एमडी असोसिएशनचे ते उपाध्यक्ष असून, को-जन असोसिएशन ऑफ इंडियाचेही संचालक आहेत.

अलीकडेच त्यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) या नामांकित संस्थेचा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. ते M.com, M.Phil, G.D.C & A अर्हताधारक आहेत, तसेच त्यांनी Ph.D. देखील मिळवली आहे. भारतीय शुगरचा सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्यांना २०२२ साली ‘बेस्ट एमडी’ पुरस्काराने गौरवले आहे.

महाराष्ट्रातील आघाडीच्या, श्रीपूर येथील प्रसिद्ध कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची धुरा ते गेल्या चौदा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळत आहेत.

बाजीराव सुतार यांची समृद्ध कारकीर्द

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बुद्रुकचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव जी. सुतार यांना सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील सलग 39 वर्षांचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी साखर कारखान्यांचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व कार्यक्षमतेने हाताळले आहे तसेच कारखान्याच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सर्व विभागांमध्ये संगणकीकरण व ERP सिस्टीमची प्रभावी अंमलबजावणी करून संस्थेच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे.
शासकीय व निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद आणि हितचिंतक यांच्याशी त्यांनी नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध जपले आहेत. सध्या ते DSTA Pune येथे कौन्सिल मेंबर म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत वसंतदादा, वारणा, इंदापूर व संजीवनी व आत्ता कृष्णा कारखान्यामध्ये कार्यरत असताना कारखान्यांना व त्यांना वैयक्तिक असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच गतिमान प्रशासकीय कामकाज, पारदर्शक कारभार, कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास, गुणवत्तापूर्ण धोरण, खर्चामधील काटकसर, निपक्षपाती भूमिका, धाडसी निर्णयक्षमता आणि वेळेत कामकाजाची अंमलबजावणी यासाठी बाजीराव सुतार हे संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी साखर क्षेत्रात सुपरिचित आहेत. सभासद, कर्मचारी व इतर संबंधित घटकांच्या अडीअडचणी शांतपणे समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात.
या सर्व निकषांचा अभ्यास करून व त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे त्यांना “रियल अचीवर्स ऑफ द महाराष्ट्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, अशीही माहिती कोतवाल यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »