आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड

भाजप आमदार राम शिंदे यांनी केली होती तक्रार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या शेटफळगढे येथील साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गाळप हंगाम नियमांचा भंग केल्याबद्दल भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी या कारखान्याविरुद्ध तक्रार केली होती. हे प्रकरण विधिमंडळामध्येही गाजले होते.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती गुरुवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘‘२०२२-२३ चा गळीत हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर झाली होती. मात्र बारामती ॲग्रो साखर कारखान्याने या तारखेआधीच गाळप सुरू केले आणि नियमांचा भंग केला, त्यामुळे या कारखान्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि २३ माच २०२३ रोजी साखर आयुक्तालयाने आदेश जाहीर केला.’’
‘आ. शिंदे यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ काही व्हिडिओ पेनड्राइव्हच्या माध्यमातून दिले होते. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओरूपी पुराव्याबाबत वेळोवेळी दिलेल्या निवाड्यांचा अभ्यास केला असता, पेनड्राइव्हमधील व्हिडिओ पुरावे म्हणून ग्राह्य धरता येत नव्हते. तसेच गाळप हंगामाच्या आधी कारखान्यावर ऊस आणण्यात आला नव्हता असे कारखान्यालाही पटवून देता आले नाही.’, असे साखर आयुक्त म्हणाले.
शेवटी दोन्हीचा सुवर्णमध्य काढून त्या काळात कारखान्यावर आलेल्या नऊशे टनांवर दंड आकारण्यात आला. प्रत्येकी पाचशे रूपये याप्रमाणे एकूण साडेचार लाख रुपयांचा दंड बारामती ॲग्रोच्या या कारखान्याला करण्यात आला आहे, असे शेखर गायकवाड यांनी सांगितले.
आ. शिंदे यांनी हा विषय अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. त्यांनी सहकारामंत्री अतुल सावे यांच्याकडेही तक्रार केली होती आणि विधिमंडळ अधिवेशनातदेखील हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी सावे यांनी शिंदे यांची अनेक प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.