साखर आयुक्तपदी अनिल कवडे
पुणे : वरिष्ठ सनदी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे नवे साखर आयुक्त असतील. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ५ फेब्रुवारी काढण्यात आले, त्यानुसार सध्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पुणे विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
अनिल कवडे हे प्रशासनात मुरलेले सनदी अधिकारी आहे. त्यांना २००३ मध्ये आयएएस केडर मिळाले. त्यानंतर त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, सहकार आयुक्त अशा जनतेशी थेट संबंध असलेल्या पदांवर काम करून आपला ठसा उमटला आहे.
मध्यंतरी शेखर गायकवाड निवृत्त झाल्यानंतर श्री. कवडे यांच्याकडे साखर आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला होता. आता त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी आली आहे. मात्र पुढील महिन्यात ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे कार्यकाळ खूप कमी असेल.
नुकतेच सचिव संवर्गात बढती मिळालेले वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आता सहकार खात्यातून (साखर आयुक्त) महसूल विभागात गेले आहेत. पुणे विभागीय आयुक्त म्हणून, त्यांची सौरव राव यांच्या जागी नियुक्ती झाली आहे, तर श्री. राव आता नवे सहकार आयुक्त असतील.
डॉ. पुलकुंडवार यांनी अल्पावधीत साखर उद्योगासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे साखर उद्योग क्षेत्रात ते लोकप्रिय झाले होते.