शॉर्टसर्किटमुळे ‘श्री विठ्ठल ‘च्या बगॅसला आग

पंढरपूर : वेणूनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील बगॅसला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या आगीत अन्यही साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.बी. पाटील यांनी दिली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या लगत बगॅस यार्ड आहे. त्या ठिकाणी अनेक वाहने व इतर सामुग्री असते. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि क्षणात याठिकाणी आग लागली. या आगीच्या घटनेत बगॅससह हाताळणी यंत्रणा व इतर सामुग्री जळून खाक झाली. काही वेळातच ही आग फॅक्टरी बिल्डींगमध्येही पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.