ऊसतोड कामगारांची बोलेरो उलटली; १५ जखमी

जळगाव : अहिल्यानगर येथून सेंधवा येथे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप ही चारचाकी गाडी सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली.
ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थ्ाळी धाव घेत या जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
सविस्तर वृत्त असे की, संबंधित २४ ऊसतोड कामगार हे अहिल्यानगर येथून मध्य प्रदेशातील सेंधव्याकडे जाण्यासाठी (एमपी ४६, झेडएफ-१७११) या बोलेरो पिकअपमधून प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास धुळे ते सोलापूर हायवेवरील चाळीसगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल जिव्हाळा समोर ही पिकअप आली असता अचानक उलटली.
यापैकी १५ कामगार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ५ महिला व १० पुरुष कामगारांचा समावेश आहे. दरम्यान, कॉ. केतन सूर्यवंशी, प्रवीण पवार, राहुल नारेकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तर काही कामगारांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घराकडे रवाना करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण समजले नाही. या प्रकरणी शहर पोलिसांत घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.
जखमी कामगारांची नावे
प्रीया सोलंकी (वय २४), नानी जातवा (वय ३०), शांतीलाल पांगिले सैलानी (वय ३५), पप्पू हिरालाल सोलंकी (वय १९), संतोष बळीराम सोलंकी (वय २१), सरीबाई सैलानी (वय ३५), राकेश रघुनाथ सोलंकी (वय १७), लालबाई बलराम सोलंकी (वय ४५), चिमा पटेल (वय ३०), सुरेश सोलंकी (वय २७), बलराम सोलंकी (वय ३०), संगीता बलराम सोलंकी (वय २८), दिनेश सुरेश सोलंकी (वय ३०), हिरालाल सोलंकी (वय २५) व संतोष हुडवे (वय २०) यांचा समावेश आहे. संबंधित जखमी हे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील रहिवाशी आहेत.