बारामती ॲग्रोवर सूडभावनेतून कारवाई – गुळवे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो साखर कारखान्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. केवळ राजकीय सूड भावनेतून कारखान्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा खुलासा करताना ‘यापुढील काळात देखील आम्ही चांगले काम करतच राहू’, असे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले.

आमदार रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती अॅग्रो साखर कारखान्यावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाळप परवानगी अगोदर पाच दिवस कारखाना सुरू करण्यात आला. कारखान्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती.

गुळवे म्हणाले, ‘बारामती अॅग्रो साखर कारखाना सर्व नियमांचे पालन करत चालविला जात आहे. तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी कारखान्याची पाहणी करून क्लिन चीट दिलेली आहे. मात्र, केवळ राजकीय सत्तेचा दुरुपयोग करत कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचा कोणताही परिणाम कारखान्यावर होणार नाही.’

ऊसतोडीसाठी आमच्या शेतकऱ्यांना आता कोणाच्याही दारामध्ये जावे लागत नाही. हे सहन न झाल्याने केवळ राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून आ. शिंदे यांनी ही कारवाई करण्यासाठी भाग पाडले आहे, असे गुळवे म्हणाले.

आमदार शिंदेंचे सहकार्य नाही
करमाळा तालुक्यातील कारखान्याकडे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची उसाचे पैसे थकले त्यावेळी आ. शिंदे यांच्याकडे बारा खात्याच्या मंत्रीपदाचा कारभार होता. त्यावेळी त्यांनी थकीत पैसे मिळविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कोणतेही सहकार्य केले नाही. आ. पवार यांनी समन्वयातून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले. शेतकऱ्यांची आडलेली आणि होत असलेली विकासकामे सहन होत नसल्याने सूड भावनेतून आणि केवळ शेतकऱ्यांना विरोध करण्यासाठी खोट्या तक्रारी करून सत्तेचा गैरवापर करत हे गुन्हे दाखल केल्याचे गुळवे यांनी सांगितले.

विकासकामांत खोडा घालण्याचे काम
ज्यांना कधी साधे उसाचे गुऱ्हाळ सुरू करता आले नाही, त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात जात केवळ त्रास देण्याचे हेतूने अशा तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी शेतकऱ्यांच्या हिताच्या नाहीत. केवळ चांगल्या आणि विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम आ. शिंदे करत आहेत, असा आरोपही गुळवे यांनी केला.

आधीचे वृत्त
‘बारामती ॲग्रो’ कारखान्याची चौकशी : सहकारमंत्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »