भास्कर घुले यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचा २५ ला पुण्यात सन्मान सोहळा
पुणे : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना (महाराष्ट्र) च्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी २०२५ च्या पुरस्कारांची घोषणा केली. उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भास्कर घुले यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २५ मे रोजी पुण्यातील जे. डब्ल्यू. मेरिऑट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रक़ांतदादा पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा होणार असून, हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे, अशी माहिती अध्यक्ष माने यांनी दिली.
DMEJ चा पहिला सन्मान सोहळा मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात पार पडला होता. तर दुसरा सोहळा महाबळेश्वरमध्ये आणि तिसरा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये झाला. कोल्हापुरात याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकट मुलाखत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी घेतली होती. ती खूपच गाजली.
भास्कर घुले हे गेल्या साडेतीन दशकांपासून साखर उद्योगात कार्यरत आहेत. रोजंदारी कामगार ते एमडी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. साखर उद्योग क्षेत्रात त्यांनी अनेक मानदंड निर्माण केले आहेत. तसेच साखर कामगारांसाठीचे त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे. .
श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घुले यांनी कारखान्यामध्ये आणि कार्यक्षेत्रात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत.