ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणार
ट्वेंटीवन शुगर्स कारखानाचे सरव्यवस्थापक सुभाष सुरवसे यांचे आश्वासन
लोहा : तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर हा कारखाना भविष्यात अधिकाधिक कार्यक्षमतेने, निर्धोक पद्धतीने चालवला जाईल. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्यासोबतच परिसरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. कारखाना परिसरात तरुणाच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल, त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण व प्रशिक्षणचे विविध उपक्रमही राबवले जातील. आरोग्यशिक्षण आणि प्राथमिक आरोग्य उपचारासाठीची शिबिरे आयोजित करण्याचे कारखान्याचे नियोजन असल्याचे कारखान्याचे सरव्यवस्थापक सुभाष सुरवसे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निवाड्याच्या संदर्भात ट्वेंटीवन शुगरच्या वतीने सरव्यवस्थापक श्री सुरवसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्देशांचे आम्ही आदरपूर्वक पालन करण्यास बांधील आहोत. ट्वेंटीवन शुगर्स ही साखर कारखानदारी क्षेत्रातील नामांकित कंपनी असून ग्रामीण भागातील अर्थकारण बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवणे हा ट्वेंटीवन शुगर्सचा मुख्य उद्देश आहे. ट्वेंटीवन शुगर्सने आजवर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक साखर कारखाने उभारले असून ते अत्यंत आदर्श पद्धतीने चालवले जात आहेत. लोहा तालुक्यातील शिवनी जामगा येथील सदरील कारखाना मुळात ट्वेंटीवन शुगर्सने उभारलेला नसून तो इतर कंपनीकडून विकत घेतलेला आहे. या कारखान्याची उभारणी व्यंकटेश्वरा अग्रो शुगर प्रॉडक्ट प्रा. लि कंपनीने केलेली असून त्यानंतर धाराशिव येथील डी व्ही पी या उद्योग समूहाने विकत घेतला. त्या कंपनीने हा कारखाना दोन वर्ष चालवल्यानंतर ट्वेंटीवन शुगर्सने तो विकत घेतला.
ट्वेंटीवन शुगरने हा कारखाना विकत घेतल्यापासून मागच्या दोन वर्षात कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, उभारणीतील सर्व दोष दूर करून प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि कार्यक्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याच्या बॉयलर चिमणीमधून बाहेर पडणाऱ्या धुराची गुणवत्ता सुधारण्यासाठी, वेटस्क्रबर बसवण्यात आले आहेत, धुराद्वारे कोणत्याही प्रकारे राख बाहेर जाणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे. कारखान्यातून निघणाऱ्या कंडेसेंट वॉटरवर प्रक्रिया करण्यासाठी सीपीयू युनिट बसवण्याचे काम चालू आहे, आगामी वर्षात म्हणजे २०२५-२६ च्या गळीत हंगामात, या कारखान्यातील सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण पूर्ण झालेले असेल. त्यामुळे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धु-राद्वारे किंवा पाण्याद्वारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची खात्री आहे. आगामी काळात हा कारखाना अत्यंत उत्तम रीतीने चालेल, पर्यावरणाला किंवा परिसरातील शेतकऱ्यांना कारखान्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान तर पोहोचणार नाहीच. उलट परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचे काम केले जाईल, असेही सुरवसे यांनी म्हटले आहे.