साखर उद्योगातील ‘नॅचरल’ क्रांतीचे महानायक: वाढदिवस विशेष

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि साखर उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व ‘कृषिरत्न’ बी. बी. ठोंबरे यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या गौरवशाली प्रवासाचा आणि त्यांनी या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचा आढावा घेणारा हा विशेष लेख:

महाराष्ट्राच्या साखर उद्योगात आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा उत्तुंग ठसा उमटवणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे भैरवनाथ भगवानराव (बी. बी.) ठोंबरे. शेती आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून औद्योगिक विकासाचे एक नवीन मॉडेल त्यांनी देशाला दिले आहे. “शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि समाजाला विषमुक्त अन्न व पर्यावरणपूरक विकास प्रदान करणे,” हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास राहिला आहे.

करिअरची सुरुवात

बी. बी. ठोंबरे यांचा जन्म २४ एप्रिल १९५३ रोजी झाला. त्यांच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात ऑक्टोबर १९७६ मध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) मध्ये डेपो अधीक्षक म्हणून झाली. मात्र, त्यांच्या नशिबात साखर उद्योगाचे भवितव्य बदलणे लिहिले होते. त्यांनी अंबाजोगाई, गोदावरी मनार आणि जय जवान जय किसान या सहकारी साखर कारखान्यांत मुख्य लेखाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर, लातूरमधील मांजरा सहकारी साखर कारखान्याचे १३ वर्षे आणि वैद्यनाथ साखर कारखान्याचे ३ वर्षे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. या दोन्ही कारखान्यांनी त्यांच्या काळात उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोच्च पुरस्कार पटकावले.

‘नॅचरल शुगर‘ची स्थापना

१९९८ मध्ये साखर उद्योग परवानामुक्त झाल्यावर, ठोंबरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी, रांजणी येथे ‘नॅचरल शुगर’ या खाजगी क्षेत्रातील पहिल्या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत आणि सर्वात कमी खर्चात (२० कोटी रुपये) हा कारखाना उभारून त्यांनी साखर उद्योगासमोर एक नवा आदर्श ठेवला. तिथे शुगर रिफायनरी, २३ मेगावॅटचा पॉवर प्लांट आणि १ लाख KLPD क्षमतेचा डिस्टिलरी प्लांट कार्यरत आहे.

पर्यावरण संवर्धनाचे ‘ठोंबरे मॉडेल

ठोंबरे यांनी केवळ उत्पादन नव्हे, तर पर्यावरणाकडेही विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या काही प्रमुख कामगिरी खालीलप्रमाणे आहेत:

  • शून्य पाणी गरज (Zero Water Requirement): साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी बाहेरून पाणी न घेता, उसाच्या रसातील पाण्याचा १००% पुनर्वापर करण्याची संकल्पना त्यांनी राबवली. यामुळे दररोज १० लाख लिटर ताज्या पाण्याची बचत होते.
  • शून्य सांडपाणी (Zero Discharge): डिस्टिलरीमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर हरित ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो.
  • वायू प्रदूषण नियंत्रण: किण्वन प्रक्रियेत तयार होणारा CO2 वायू संकुचित करून तो विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो, ज्यामुळे १००% वायू प्रदूषण रोखले जाते.
  • देशातील पहिला सीबीजी पंप: बायोगॅसपासून सीबीजी (CBG) उत्पादन करून त्याचे वितरण करण्यासाठी त्यांनी देशातील पहिला सीबीजी पंप सुरू केला.

सामाजिक जबाबदारी (CSR):

ठोंबरे यांनी उद्योगासोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे:

  • शिक्षण आणि आरोग्य: रांजणी येथे ‘साई सर्वांगीण विकास प्रतिष्ठान’द्वारे शाळा, महाविद्यालय आणि ‘एन. साई ग्रामीण रुग्णालय’ सुरू करून गरीबांना स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून दिली.
  • नॅचरल पाल्य पेन्शन योजना: आपल्या कर्मचाऱ्यांच्या वृद्ध पालकांसाठी त्यांनी एक अनोखी योजना सुरू केली, ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील १०% रक्कम थेट त्यांच्या पालकांच्या खात्यावर जमा केली जाते.
  • जलसंधारण: दुष्काळावर मात करण्यासाठी १५ गावांमध्ये नाले खोलीकरण आणि सिमेंट बंधारे बांधण्याचे काम त्यांनी केले आहे.

विविध पदांवरील जबाबदाऱ्या: बी. बी. ठोंबरे हे सध्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) चे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA), साखर दर नियंत्रण समिती आणि विविध विद्यापीठांच्या समित्यांवर सक्रिय सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

साखर विश्वात सातत्याने नवे बदल घडवून आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अशा या लोकनेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने हार्दिक शुभेच्छा! .

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »