बळीराजा कारखान्यात सहा कर्मचाऱ्यांच्या घरांवर धाडसी चोरी

तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
पूर्णा : कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना परिसरात शनिवारी रात्री मोठी चोरी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी सहा कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची कुलुपे तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड मिळून तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
कारखान्यात शेकडो क्वार्टर्स असून, यापैकी काही घरे बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी ही कारवाई केली. परमेश्वर उत्तमराव होंडाळे यांच्या घरातून सोन्याच्या अंगठ्या, एकदाणी आणि चांदीच्या बेड्या मिळून सुमारे २.७५ लाखांचा ऐवज चोरीला गेला. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय रामलिंग नंदे, गणेश जाधव, साईनाथ ढोणे आणि अभिमन्यू गव्हाणे यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. ठसेतज्ञ, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून पुढील तपास फौजदार श्रीनिवास पडलवार करीत आहेत.
या घटनेमुळे कारखाना परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.





