मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्याकडेच एफआरपी थकबाकी

आवडल्यास ही बातमी शेअर करा
सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार

पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रू. २१३० कोटी रूपये अद्याप थकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, थकबाकीदारांमध्ये विद्यमान मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि साखर उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या नामवंत मंडळींचा समावेश आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या चोपडा युनिटने शंभर टक्के एफआरपी दिली आहे; मात्र पुणे आणि संभाजीनगर जिल्ह्यांतील कारखान्यांकडे पाच ते अकरा टक्के थकबाकी आहे. राज्यात एकंदरित ११७ कारखान्यांकडे ५ ते ७० टक्के थकबाकी अद्याप आहे.

राज्यात सर्वात कमी एफआरपी (३० टक्के) देणारा साखर कारखाना संत कुर्मदास कारखाना आहे, तर नीरा भीमा कारखाना एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात राज्यात आघाडीवर आहे.

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत-पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री राजेश टोपे, विश्वजित कदम, जयंत पाटील, प्रकाश सोळंके, तानाजी सावंत, दिलीपराव देशमुख, विजयसिंह मोहिते पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील; तसेच आजी-माजी खासदार आणि आमदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, नितीन पाटील आदी नेतेमंडळींशी संबंधित साखर कारखानेदखील थकबाकीदारांच्या यादीत आहेत.

हर्षवर्धन पाटलांपेक्षा पत्नी भाग्यश्री यांचा कारभार उत्तम

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत. ते चेअरमन असलेल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याकडे तब्बल ३९ टक्के थकबाकी आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील चेअरमन असलेल्या नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यातील स्थिती मात्र वेगळी आहे. या कारखान्याने एफआरपीपेक्षा तब्बल ७7.६ कोटीं रूपये शेतकऱ्यांना अधिकचे देऊन राज्यात आघाडी घेतली आहे. आपला कारभार साखरेच्या व्यवसायातील अनुभवी पतींपेक्षा सरस असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. दुसरीकडे कन्या अंकिताताई यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याचे नावही थकबाकीदाराच्या यादीत दिसते.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आहेत. ते अनेक वर्षे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष होते. या कारखान्याच्या चारही युनिटनी यंदा एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊन उत्तम कामगिरी नोंदवली आहे. मात्र मागील हंगामांची सात कोटींची थकबाकी असल्याचे आयुक्तालयाची आकडेवारी सांगते.

‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील नॅचरल शुगरचे दोन युनिट धाराशिव आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे चार आणि दहा टक्के थकबाकी दिसते. सहकारमंत्र्यांच्या कारखान्याकडे दहा टक्के थकबाकी दाखवण्यात आली आहे, तर गडकरी यांच्याशी संबंधित दोन कारखान्यांकडे अत्यल्प म्हणजे प्रत्येकी दोन टक्के थकबाकी आहे.

15 दिवसांत २२ वर कारखान्यांनी थकबाकी भरली

या अहवालातील काही आकडे अत्यंत उत्साहवर्धक आहेत. केवळ 15 दिवसांत — म्हणजे 31 मार्च ते 15 एप्रिल 2026 या काळात — राज्यातील साखर कारखान्यांनी तब्बल 861 कोटींची थकबाकी भरली. वास्तव FRP थकबाकी ₹2,991 कोटींवरून ₹2,130 कोटींवर आली असून वास्तव FRP अदाई टक्केवारी 92.52% वरून 94.72% वर पोचली आहे.


15 दिवसांत काय बदलले?

सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे 100% FRP भरणाऱ्या कारखान्यांची संख्या 70 वरून थेट 92 वर (+22) गेली. 60 टक्क्यांपेक्षा कमी अदाई करणाऱ्या कारखान्यांची संख्या 17 वरून 10 वर आली. एकूण थकबाकी असलेले कारखाने 139 वरून 117 वर कमी झाले.

31 मार्चच्या अहवालात 50% पेक्षाही कमी FRP भरणारे 8 कारखाने होते. त्यापैकी श्री तुळजाभवानी शुगर (परभणी), भीमा ससाका टाकळी सिकंदर (सोलापूर), भैरवनाथ शुगर नरसिंह-इंदापूर (धाराशिव) आणि श्री विठ्ठलसाई ससाका मुरुम (धाराशिव) या चार कारखान्यांनी काही प्रमाणात थकबाकी भरली — हे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.


अजूनही चिंता कायम

श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना (ससाका) (सोलापूर) हा कारखाना 31 मार्चप्रमाणेच केवळ 30% FRP भरून सर्वात मोठा थकबाकीदार आहे — तो अजिबात सुधारला नाही. किसनवीर सातारा ससाका (वाई) 47.62% वर असून ₹7,526 लाखांची थकबाकी कायम आहे. कोल्हापूरचा श्री छत्रपती राजाराम ससाका 52.55% वर असून एकट्या या कारखान्याची थकबाकी ₹7,496 लाख आहे.


उत्कृष्ट कामगिरी — कोण ठरले आदर्श?

बारामती ॲग्रो (पुणे, खाजगी) ₹65,751 लाखांसह एकूण देयक रकमेमध्ये अव्वल स्थानावर आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे ससाका हुप्परी (कोल्हापूर, सहकारी) ₹63,898 लाख देऊन 100% FRP अदाई करणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कारखाना ठरला. दौंड शुगर (पुणे, खाजगी), यशवंतराव मोहिते कृष्णा ससाका (सातारा), आणि श्री तात्यासाहेब कोरे ससाका वारणानगर (कोल्हापूर) यांनीही 100% FRP भरून आदर्श कामगिरी केली. विशेष म्हणजे टॉप 10 पैकी 7 सहकारी व केवळ 3 खाजगी कारखाने आहेत — सहकार क्षेत्राची श्रेष्ठता अधोरेखित होते.


एकूण चित्र

31 मार्च 2026 पर्यंतच्या 1,042.27 LMT ऊस गाळपावर ₹40,327 कोटींचा FRP देय होता. त्यापैकी ₹38,197 कोटी प्रत्यक्ष अदा झाले असून 2,130 कोटी थकबाकी शिल्लक आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असताना उर्वरित थकबाकी पूर्णपणे वसूल करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित राजारामबापू कारखाना आणि विद्यमान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संबंधित सिद्धी शुगर यांच्या कारखान्यांसह इतर काही नेत्यांच्या कारखान्यांकडे मागील हंगामांचीही आहे, ती एकत्रित थकबाकी ₹242.71 कोटी (₹24,270.90 लाख) कायम असून हा जुना बोजा अद्यापही कायम आहे.

सार्वजनिेक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पर्यटनमंत्री शंभूराज भोसले यांच्याशी संबंधित अनुक्रमे अजिंक्यतारा आणि बाळासाहेब देसाई कारखानेदेखील जुने थकबाकीदार आहेत, असे साखर आयुक्तालयाच्या अहवालावरून स्पष्ट होते. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ कारखानाही जुना थकबाकीदार आहे. हा कारखाना यावर्षी ओंकार ग्रुपला विकण्यात आला आहे. त्याच्याकडेही यंदाच्या हंगामाची थकबाकी आहे.

माहिती स्रोत : साखर आयुक्तालय अहवाल

(टॉप थकबाकीरांची सविस्तर आकडेवारी लवकरच)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »