ऊसतोड मुकादम अपहरप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

धारूर: तालुक्यातील कासारी बोडखा येथील ऊसतोड मुकादम दादासाहेब श्यामसुंदर बडे यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुकादमाला एका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.
सोनू ऊर्फ रावण धुमाळ, श्रीकृष्ण दराडे, संतोष चौरे, किशोर फड, मनोज घोळवे आणि समाधान मुंडे या सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सोनू घोळवे आणि रमेश मुंडे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धारूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, साखर कारखान्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
अपहरणाची घटना
२६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:३५ च्या सुमारास, दादासाहेब बडे सोनीमोहा येथून दुचाकीवरून जात असताना आंबेतरगात परिसरात पांढऱ्या रंगाच्या जीपने (MH 46 BM 5488) त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने जीपमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले.
कोल्हापूरच्या साखर कारखान्याशी कनेक्शन?
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी समाधान मुंडे याच्या सांगण्यानुसार, मुकादम दादासाहेब बडे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील अथनीशुगर, शाहूवाडीयुनिट येथील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात कारखान्याचे मालक योगेश आणि श्रीनिवास पाटील यांच्यासह शेती अधिकारी व वसुली अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते.






