१६ कोटींच्या अपहार प्रकरणी सचिन घायाळांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर – पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवत सचिन घायाळ शुगर्सचे चेअरमन सचिन घायाळ व कारखान्याच्या भागीदारांविरुद्ध ३० कोटीचा आर्थिक घोटाळा करून १६ कोटी ६२ हजार रुपये हडप केल्या प्रकरणी पैठणच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत बुलढाणा अर्बनचेही नाव असून, या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दिली आहे.
याप्रकरणी फिर्यादी सुरेश पंडितराव काकडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की सचिन विक्रमराव घायाळ यांनी कारखान्याच्या आधुनिकिकरण व विस्तारीकरणासाठी कारखान्याची मालमत्ता तारण गहाणखत करुन देऊन कर्ज उचलले. परंतु संबंधित कर्ज हे कारखान्यासाठी न वापरता दिशाभूल करुन अप्रमाणिकपणे कर्ज प्रकरण करतांना जाणीवपूर्वक खोटे व दिशाभूल करणारे कागदपत्रे तयार करुन बॅंकेकडून कर्ज उचल करुन घेतले. तसेच साखर कारखाना व सभासदांचा विश्वासघात करुन फसवणूक केली व कर्ज जमा रक्कमेचा विनियोग इतरत्र करुन १६ कोटी ६२ हजार रुपयाचा अपहार व गैरव्यवहार केल्याचे काकडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता कर्जाची मूळ रक्कम ३० कोटी असून, हा सर्व प्रकार २५ ऑगस्ट २०२१ ते आजपर्यत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे, या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी उशिरा पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे हे करीत आहे. पैठणमधील संत एकनाथ साखर कारखाना महत्त्वाची संस्था आहे.






