शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादनास अखेर परवानगी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास अखेर परवानगी दिली आहे. साखर उद्योगाने यासाठी केंद्राकडे साकडे घातले होते. या निर्णयाचे स्वागत होत आहे.
(Center permits production of ethanol from remaining B heavy)
साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार असून, सुमारे २३०० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. यातून उसबिलापोटीची शेतकऱ्यांची रक्कम देण्यासाठी कारखान्यांना मदत होणार आहे.
देशातील साखरेची उपलब्धता घटेल या शक्यतेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे केंद्र सरकारने ७ डिसेंबरला उसाचा रस, साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी आणली.
याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तातडीने याचे गांभीर्य केंद्र सरकारच्या नजरेस आणून दिले. त्यानुसार केंद्र सरकारने १५ डिसेंबरच्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली. यामुळे १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविता आली.
मात्र, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्र, कर्नाटक ,गुजरात,तामिळनाडू या राज्यांमधील उसाला फायदा होऊन पूर्वीच्या अंदाजापेक्षा २० ते २५ लाख टनांनी साखरेची उपलब्धता वाढली. सुधारित वाढीव साखर उपलब्धतेची आकडेवारी आणि त्या आधारे देशभरातील कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे ७ लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याबाबत महासंघाने केंद्र सरकारला दिले.
बंदीमुळे या मळीचा वापर करता येत नव्हता पर्यायाने कारखाने अडचणीत आले होते. महासंघाच्या पत्रानंतर केंद्र सरकारने या मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यास अखेर परवानगी दिली असून आसवानीनिहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, इस्माचे अध्यक्ष प्रभाकर राव, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आदींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.