जयप्रकाश दांडेगावकर यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’
नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यात आला.
जगभरातील देशांचा विकास त्यांच्या संशोधनामुळे झाला आहे. शिक्षण हे संशोधनाचा पाया आहे. शिक्षण आणि संशोधनामुळे देशाचा विकास घडतो, असे मत माजी मंत्री दांडेगावकर यांनी यावेळी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माजी पोलिस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा, आमदार राजू नवघरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. उद्धव भोसले व मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन दांडेगावकर यांचा सन्मान करण्यात आला, पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. दांडेगावकर म्हणाले, ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे एक ‘डायनामिक’ विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. खासगी कोचिंग क्लासेस हे विद्यापीठ आणि महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान आहे. यावर सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे.’
दांडेगावकर यांनी यावेळी पुरस्काराच्या तीन पट रक्कम विद्यापीठाला शैक्षणिक उपयोगासाठी जाहीर केली.
जातीपातीच्या विचारांत अडकून न पडता देशाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन डॉ. पसरिचा यांनी केले. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी. विठ्ठल यांनी आभार मानले.