पुण्यात डीएसटीएच्या परिषदेत होणार साखर उद्योगावर दोन दिवस मंथन

२२ आणि २३ सप्टेंबरला ७० वी ऐतिहासिक परिषद आणि शुगर एक्सपो
पुणे: साखर उद्योगातील तंत्रज्ञांची अग्रगण्य संस्था, दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’ने ७० वी वार्षिक परिषद आणि भव्य साखर उद्योग प्रदर्शन (70th Annual Convention & Sugar Expo 2025) आयोजित केले आहे. हा दोन दिवसीय कार्यक्रम २२ आणि २३ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील सेनापती बापट रोड येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि भविष्यातील दिशा यावर सखोल विचारमंथन केले जाणार आहे.
या परिषदेसाठी देशभरातून, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथून १००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये साखर उद्योगातील प्रमुख धोरणकर्ते, कारखानदार, तंत्रज्ञ, कृषी तज्ज्ञ आणि प्रगतीशील ऊस उत्पादकांचा समावेश असेल. साखर उद्योगातील हे सर्व दिग्गज ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करून उद्योगाच्या विकासाला नवी चालना देतील, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
परिषदेची प्रमुख आकर्षणे आणि कार्यक्रम
शुगर एक्सपो २०२५: या परिषदेचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘शुगर एक्सपो २०२५’. या प्रदर्शनात साखर आणि संलग्न उद्योगांसाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे, नवीन उत्पादने आणि सेवा सादर केल्या जातील. हे प्रदर्शन उद्योजकांना नवीन व्यावसायिक संबंध जोडण्यासाठी आणि आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
ज्ञान आणि संशोधनाचे आदान-प्रदान: परिषदेच्या दोन दिवसांच्या सत्रांमध्ये साखर, सह-उत्पादने, अभियांत्रिकी आणि कृषी यांसारख्या विविध विभागांमधील नवीन शोधनिबंध सादर केले जातील आणि त्यावर तज्ज्ञांमध्ये चर्चासत्रे आयोजित केली जातील. या वर्षीच्या परिषदेत दोन महत्त्वपूर्ण स्मृती व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत:
- स्व. एस. एन. गुंडुराव स्मृती व्याख्यान: हे व्याख्यान श्री. बी. बी. ठोंबरे देणार असून, त्यांचा विषय ‘जैव-ऊर्जा आणि ऊर्जा’ (Bio Energy & Power) हा असेल.
- स्व. जे. पी. मुखर्जी स्मृती व्याख्यान: हे व्याख्यान डॉ. श्रीमती सीमा परोहा देणार असून, त्या ‘भारतातील साखर उद्योगाच्या आर्थिक विकासासाठी कमी कार्बन उत्सर्जन मार्ग’ (Low carbon pathways for economic growth of sugar industry in India) या विषयावर मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, २२ सप्टेंबर रोजी, प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार, तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण केले जाईल. दुसऱ्या दिवशी, २३ सप्टेंबर रोजी, अभियांत्रिकी, उत्पादन आणि कृषी या विषयांवर समांतर तांत्रिक सत्रे होतील.
पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आणि प्रत्यक्ष परिषदेला १० वाजता सुरुवात होईल. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते परिषदेचे आणि एक्स्पोचे उद्घाटन होईल.
डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष आणि परिषदेचे अध्यक्ष एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एम. के. पटेल (गुजरात) आणि एस. डी. बोखारे (तांत्रिक) यांनी साखर उद्योगाशी संबंधित सर्वांना या महत्त्वपूर्ण परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.