जमनालाल बजाज

सुप्रभात
आज शनिवार, दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर माघ २२, शके १९४४
सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३७
चंद्रोदय : २३:१८ चंद्रास्त : १०:३०
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – ०९:०८ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – ०१:४०, फेब्रुवारी १२ पर्यंत
योग : शूल – १६:२३ पर्यंत
करण : तैतिल – ०९:०८ पर्यंत
द्वितीय करण : गर – २१:३१ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि: कन्या – १३:०३ पर्यंत
राहुकाल : १०:०१ ते ११:२७
गुलिक काल : ०७:०९ ते ०८:३५
यमगण्ड : १४:१९ ते १५:४५
अभिजित मुहूर्त : १२:३० ते १३:१६
दुर्मुहूर्त : ०७:०९ ते ०७:५५
दुर्मुहूर्त : ०७:५५ ते ०८:४१
अमृत काल : १८:५४ ते २०:३५
वर्ज्य : ०८:४५ ते १०:२७
आज जागतिक रुग्णहक्क दिन
भारतीय चित्रपटसृष्टीच्या गेल्या शतकावर आपल्या आशयसंपन्न छायालेखनाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर- बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, लीलाबाई पेंढारकर, प्रभाकर पेंढारकर, व्ही. शांताराम ही चित्रपटांच्या उभारणीच्या कालखंडात अजरामर झालेली उत्तुंग कर्तृत्वाची माणसे. त्यांचाच वारसा संपन्न करणारे त्यागराज. संधी असूनही ते अभिनयाकडे वळले नाहीत.
उंचापुरा आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा हा कलावंत चित्रपटसृष्टीला निश्चितच काहीतरी भरीव असे देऊन गेला असता; पण त्यांनी पडद्याआड काम करायचे ठरवले. कोल्हापूर सोडले, मुंबईत व्ही. शांताराम यांचा स्टुडिओ गाठला. छायालेखनाची वेगळी वाट चोखाळणारे त्यागराज यांचे मोठेपण वेगळे ठरते ते त्यांनी केवळ कॅमेरा हातात घेतला यासाठी नव्हे, तर त्या कॅमेऱ्याची भाषा त्यांनी चित्रपटांबद्दल प्रचंड आकर्षण बाळगून असणाऱ्या प्रेक्षकाच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवली. कॅमेऱ्याचे आणि एकूणच चित्रपटनिर्मितीचे तंत्र बाल्यावस्थेत असताना केवळ आणि केवळ आपल्या दमदार छायालेखनाच्या माध्यमाचा प्रभावी वापर करून त्यांनी सिनेमा जिवंत केला.
कृष्णधवल चित्रपटांच्या निर्मितीचे आव्हान पेललेच; शिवाय नंतरच्या काळात रंगीत चित्रपटांनाही तितक्याच समर्थपणे आपल्या कलेचे कोंदण दिले. साठच्या दशकात गाजलेला आणि आजही रसिकांना मोहिनी घालणारा ‘दो आँखे बारा हाथ’ हा त्यांचा पहिला चित्रपट. एक आव्हान म्हणून त्यांनी तो साकारला आणि या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. कथेबरोबरच तो लक्षात राहतो, त्यातील दृश्ये नजरेसमोरून हटत नाहीत ती त्यागराज यांच्या छायालेखनामुळेच.
१९६० मध्ये त्यांनी ‘नवरंग’ही गाजवला. राजकपूर यांचा ‘दिवाना’, जेमिनीचा ‘समाज को बदल डालो’, दादा कोंडके यांचा ‘आंधळा मारतो डोळा’, ‘राजा शिवछत्रपती’ या चित्रपटांनी त्यागराज पेंढारकर हे नाव चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ठळकपणे नोंदविले गेले. अनेक गुजराती, पंजाबी, कोकणी चित्रपटही त्यांनी यशस्वी केले. ते प्रसिद्धीपासून दूर राहिले.
१९२६ : ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज बाबूराव पेंढारकर ज्येष्ठ छायाचित्रकार यांचा जन्म ( मृत्यू : २८ सप्टेंबर २०१८)
बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज –
तरूणपणीच जमनालाल यांना लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, रवींद्रनाथ टागोर इ. थोर व्यक्तींचा सहवास लाभला. लोकमान्यांचा केसरी ते लहानपणापासून वाचीत. १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परत आल्यावर बजाज त्यांना भेटले.
ते महात्माजींच्या विचारसरणीकडे आकृष्ट झाले. आणि आपणास ‘पाचवा मुलगा’ म्हणून स्वीकारावे, अशी त्यांनी गांधीजींना विनंती केली. (१९२०). बच्छराज यांच्याकडून लाभलेल्या संपत्तीचा त्यांनी अपरिग्रह वृत्तीने केवळ एक विश्वस्त म्हणून सांभाळ केला. १९०८ मध्ये जमनालाल मानसेवी दंडाधिकारी झाले. पुढे त्यांना ‘रायबहादूर’ हा किताब मिळाला (१९१८)
जमनालाल नागपूर येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष झाले (१९२०). काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. १९२० मध्ये त्यांनी असहकार चळवळीत भाग घेऊन आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या ठरावानुसार रायबहादूर या उपाधीचा त्याग त्याच साली केला. १९२३ मध्ये त्यांनी नागपूर येथे राष्ट्रध्वज सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्याबद्दल त्यांना १८ महिन्यांची शिक्षा झाली. त्याच वर्षी गांधीजीचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत ‘गांधी सेवकसंघा’ची त्यांनी स्थापना केली.
१९२४ मध्ये ते नागपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व १९२५ मध्ये चरखा संघाचे खजिनदार होते. त्यांनी समाजसेवेसाठी अनेक संस्था स्थापन केल्या आणि अस्पृश्यतानिवारण, गोवर्धन, शिक्षणसंस्था यांसाठी भरीव आर्थिक मदत केली. अनेक संस्थांचे ते अध्यक्ष व सचिव होते. ‘सस्ता साहित्य मंडळ’ याद्वारे त्यांनी राष्ट्रीय हिंदी साहित्य प्रकाशित केले.
अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९३८). काँग्रेसच्या अस्पृश्यतानिवारण मोहिमेत त्यांनी सचिव या नात्याने पुढाकार घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रचार केला. आणि वर्ध्याचे स्वतःच्या मालकीचे लक्ष्मीनारायण मंदिर हरिजनांना खुले केले (१९२८). विलेपार्ले (मुंबई) येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते(१९३०).
या प्रसंगी त्यांच्या पत्नी जानकीदेवी व मुलगा कमलनयन यांनाही शिक्षा झाल्या.जमनालाल यांनी वर्ध्याजवळील ‘सेगाव’ हे खेडे व तेथील जमीन गांधीना दिली. तेथे गांधीनी ‘सेवाग्राम आश्रम’ स्थापन केला(१९३६). जयपूरच्या संस्थानी प्रजेस राजकीय हक्क मिळावेत, म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. त्यात त्यांना पुन्हा १९३९ मध्ये शिक्षा झाली. दुसऱ्या महायुध्दाकाळात युध्दविरोधी प्रचारांमुळे त्यांना अटक झाली (१९४१). वर्धा येथे ‘गोसेजा संघा’ची स्थापना त्यांनी केली होती.
जमनालाल यांनी स्त्रीशिक्षणास अग्रक्रम देऊन स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता वर्धा येथे त्यांनी मारवाडी शिक्षण मंडळाची स्थापना केली. तसेच गांधींच्या मूलोद्योग शिक्षणावर भर दिला आणि राष्ट्रीयतेची भावना जोपासली व अस्पृश्यतानिवारणाचे महान कार्य अंगीकारले. त्यांनी खिलाफत चळवळीतही भाग घेतला होता.
अखेरच्या दिवसांत सेवाग्राम आणि गोसेवासंघ या कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. गांधीवादी मार्गाने स्वराज्य मिळेल, यावर त्यांची दृढ श्रध्दा होती. म्हणूनच त्यांनी खादी, ग्रामोद्योग व गोसेवा यांचा पुरस्कार केला.
आधुनिक भारताच्या औद्योगिक क्षेत्रातही जमनालाल बजाज यांनी स्पृहणीय कामगिरी केली. त्यांनी १९२६ साली बजाज उद्योगसमूहाचा सुसंघटित पाया घातला आणि त्या उद्योगसमूहातर्फे पहिला साखर कारखाना सुरू केला(१९३१) तथापि एक विश्वस्त म्हणूनच ते बजाज उद्योगसमूहाचे काम पाहत असत.
• १९४२: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
घटना :
६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
१८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.
१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
१९११: हेन्र्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
• मृत्यू :
• १९६८: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
• १९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)
जन्म :
१९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च२००३)
(संकलक : डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे)
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
गोविंदस्वामी आफळे
(जन्म : ११ फेब्रुवारी १९१७; निधन : १ नोव्हेंबर १९८८)
समर्थ संप्रदायी राष्ट्रीय कीर्तनकार. पिढीजात कीर्तनपरंपरा असणाऱ्या आफळे घराण्यात वडील रामचंद्रबुवा आणि आई चिमुताई यांच्या पोटी सात मुलींनंतर जन्माला आलेला मुलगा म्हणजे कीर्तन क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशी ख्याती मिळवणारे कीर्तनकेसरी गोविंदस्वामी आफळे बुवा होत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींचे समाधी मंदीर बांधले, त्यात कीर्तनसेवा करण्याचा मान आफळे घराण्याकडे चालून आला. अंगापूर, जैतापूर, भोस, सांगवी, वडगाव, महागाव, माहुली, सोनगाव या ८ गावांची जहागीर आफळे घराण्याला प्राप्त झाली.
या पिढीजात कीर्तनसेवेकरिता पदरी मुलगा हवाच तो न झाल्यास जहागीरी परत करीन. जावई कीर्तनासाठी पाठवणार नाही हा दृढनिश्चय सांगून गोविंदस्वामींच्या आईने समर्थासमोर नवस केला होता.
रामदास स्वामींचे स्मरण रहावे या करिता ‘स्वामी ‘ हे नाव आफळे घराण्याने जोडले. नवसाने झालेला मुलगा ही त्या घराण्याची श्रद्धा होती. बालवयात तल्लख बुद्धीचे वरदान त्यांना लाभले होते. नकला करणे, पोवाडे गाणी करणे, पोहणे यात ते निपुण होते.
बुवा पाहिल्यापासूनच दणकट शरीरयष्टींचे आणि अफाट ताकद घेऊनच जन्माला आले होते. शिक्षणाकरिता माहुली सोडून प्रथम हायस्कुल साठी सातारा आणि मॅट्रिक परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या गोविंदस्वामींनी घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुण्यात राहून पडतील ती कामे करीत, माधुकरी मागत एम. ए. एल. एल. बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माधुकरी मागून वार लावून शिक्षण पूर्ण करीत असतानाच ते कुस्ती देखील शिकले.
पुण्यात हिंदू महासभेने केसरीमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पोवाडे स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये बुवांनी गायलेल्या पोवाड्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. विजयादशमीच्या दिवशी सावरकरांच्या घरासमोर दादरला पोवाडा सादर करण्याची संधी बुवांना लाभली. याचबरोबर सुभाषबाबूंसमोर सुभाषबाबूंच्या वर्णनाचा पोवाडा केसरीच्या कचेरीत सेनापती बापट यांच्या उपस्थितीत बुवांनी सादर केला.
साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी तो प्रस्तावनेसह प्रसिद्ध केला आहे. बुवांचे पोवाड्यांचे कार्यक्रम गावोगाव गाजले आणि ‘शाहीर आफळे’ या नावाने बुवा प्रसिद्ध झाले.
तब्ब्ल ११ चित्रपटातून बुवांनी भूमिका केल्या. नाटकातही काम केले. प्रभात चित्रपट कंपनीच्या शेजारी या चित्रपटात ‘नईम’ची भूमिका त्यांना मिळाली होती; मात्र आई चिमुताईनी त्यांना या क्षेत्रातून बाहेर पडायला सांगितले. घराण्याच्या परंपरेला जपण्यासाठी कीर्तनच करायला हवे, ‘‘नभी जैसी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील” हा आशीर्वाद आईंनी त्यांना दिला आणि कीर्तन करण्याची आज्ञाच केली.
पहिले राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन हे बुवांचे गुरु. पुण्यातील गोविंदबुवा देव यांच्याकडे कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण झाले. हरीकीर्तनोत्तेजक सभा, पुणे येथील कीर्तन स्पर्धेत हिंसा – अहिंसा -विवेक या विषयावरील कीर्तन करून बुवांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आणि बुवांच्या कीर्तनप्रवासाला सुरुवात झाली.
आईने दिलेला आशीर्वाद खरा ठरला आणि बुवांच्या कीर्तनाला प्रचंड श्रोते जमू लागले. वेळप्रसंगी रस्ते बंद करू कीर्तने होत असत. पुण्यातील शनिवार पेठेत वीर मारुती आणि दक्षिणमुखी मारुतीच्या चौकातील कीर्तने रात्रीची शेवटची बस गेली की रस्ते बंद करून बुवा कीर्तनाला उभे रहात असत.
धोतर – सदरा – डोक्याला भगवा फेटा आणि अंगावर एका खांद्यावरून मागे टाकलेली लांबलचक शाल अशा पेहरावात बुवा कीर्तनाला उभे राहात. कीर्तनकार अंगापिंडाने मजबूत आणि ताकद कमावलेललाच हवा म्हणजे त्याच्या शब्दसारखेच त्याचेही वजन श्रोत्यांवर पडते आणि श्रोते कीर्तनातल्या गोष्टी आचरणात आणतात ही परंपरा बुवांपासूनच सुरु झाली असे म्हटले जाते. बुवांचे कीर्तन थोडेसे मिश्किल आणि त्याचबरोबर ज्वलंत राष्ट्रभक्ती शिकवणारे होते.
तत्कालीन चालू असणाऱ्या सामाजिक – राजकीय परिस्थितीवर बुवांनी कीर्तनातून निर्भीडपणे भाष्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुवांचे दैवतच होते. सावरकरांनी लिहिलॆल्या ‘ने मजसी ने ‘ या गीताची पहिली रेकॉर्ड एच. एम. व्ही कंपनीने बुवांच्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेली आहे. सर्वच वीर हुतात्म्यांची, ऐतिहासिक विरांगनांची कीर्तने चरित्रे कीर्तनातून अतिशय तडफेने मांडण्याची बुवांची हातोटी होती. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री गहिवर दाटेल असा करुणरस तर मिश्किल परंतु मार्मिक कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार बुवांच्या कीर्तनातून होत असे. पारंपरिक पठडीतून बाहेर पडून पुराणकथा असतील, राष्ट्रीय चरित्र असतील क्रांतिकारक, वीरश्री जागवणारी चरित्रे या सगळ्यांचे कथन करताना शुद्ध हिंदुत्ववादी, विज्ञानवादी दृष्टी ठेवून, समकालीन राजकारणाशी त्याचा धागा जोडून, अंधश्रद्धेवर कडक टीका करणारे बुवांचे कीर्तन आबालवृद्धांची, तरुणांची प्रचंड गर्दीचा उच्चांक मोडणारे ठरले. टीव्ही, सिनेमा, रेडिओ मुळे मागे पडत चाललेली कीर्तनकला बुवांमुळे पुन्हा एकदा जनमानसात लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली.
गोविंदस्वामींनी स्वतःच्या काव्यप्रतिभेने सावरकरगाथा हे सावरकर चरित्रावरील महाकाव्य रचले. त्यांनी १५ नाटके लिहिली आहेत. माहुलीची माणसं, महाकवी कालिदास, टाकीचे घाव, बैल गेला नि झोपा केला, शिरपाची शिरमंती , आम्ही आहो बायका, तू बायकोना त्याची ? प्रतापगडचा रणसंग्राम ही त्यांची काही गाजलेली नाटके होते.
या बरोबरीनेच कीर्तनासाठी उपयुक्त अशी अनेक ऐतिहासिक चरित्रांची आख्याने पद्य बुवांनी स्वतः रचली. ज्यांची संख्या तब्ब्ल १४०० इतकी आहे. बुवांचे ओवाळणी आणि संसार तरंग हे दोन कवितासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. पुण्यातील हरिकिर्तनोत्तेजक सभा या संस्थेत बुवांनी खूप काम केले.
पुण्यातील एकमेव असणारे नारद आणि व्यासांचे मंदिर बुवांनी स्वतः बांधले. गरीब विद्यार्थ्यांसाठी व्यास गुरुकुल, समर्थ गुरुकुल चालविले. जवळजवळ १०० विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांच्या पायावर बुवांनी उभे केले.
बुवांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि धाडसीपणामुळे कीर्तनातील अनेक विधानांमुळे त्यांना कारावास, जिल्हाबंदी, कीर्तनावर बंदी या आणि अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. १९५१ मध्ये दासनवमीला सकाळी ९ ते पहाटे ३ पर्यंत एका दिवसात वरळी, माटुंगा, चेंबूर, दादर, गिरगाव आणि लोखंडी जथा अशा ६ कीर्तनांचे बुवांनी रेकॉर्ड केले.
कीर्तनात आपली पत्नी सुधाताई आफळे यांच्या सहकार्याने नारदीय कीर्तनात जुगलबंदी, सवाल जबाब हा प्रकार आफळे बुवांनी आणला. प्रत्येकाने सामर्थ्याची उपासना करायलाच हवी, विशेषतः स्त्रियांनी, मुलींनी स्वसंरक्षणक्षम असायलाच हवे हा बुवांचा आग्रह होता. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांचे आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणाऱ्या बुवांनी भारतभर कीर्तने केली. अमेरिकेत तीन महिने राहूनही बुवांनी कीर्तनपरंपरेची पताका फडकवली. बुवांनी स्वतःची अशी एक वेगळी पठडी निर्माण करून उभी केलेही ही कीर्तनपरंपरा त्यांचे चिरंजीव चारुदत्तबुवा आणि ज्येष्ठ कन्या क्रांतिगीता ताई महाबळ अतिशय समर्थपणे चालवीत आहेत.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
गौरी देशपांडे
(जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; मृत्यू : १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले’. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे गौरीच्या मातोश्री होत.
दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते.
‘समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका. गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबईत, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते.
प्रकाशित साहित्य : गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची विद्या बाळ, गीताली वि. म. , वंदना भागवत संपादित, मौज प्रकाशन गृह प्रकाशित कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, ‘गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.
’ ‘Beetween Births’ या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने गौरी देशपांडे यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहीत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.
गौरी देशपांडे यांनी लिहिलेली/मराठी-इंग्रजीत अनुवादित केलेली पुस्तके : अरेबियन नाइट्स(एक हजार रात्री आणि एक रात्र), (The Arabian Nightsचा १६ खंडी मराठी अनुवाद). आहे हे असं आहे,१९८६उत्खनन,२००२; एकेक पान गळावया, १९८०; गोफ,१९९९; Dread Departure, The (seagull), (इंग्रजी, वर्ष?)तेरुओ आणि कांही दूरपर्यंत, १९८५; ‘दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’,१९८९; निरगाठी’ आणि ‘चंद्रिके ग, सारिके ग!’, १९८७; Between Births (इंग्रजी काव्यसंग्रह), १९६८Beyond The Slaughter House, (इंग्रजी, वर्ष?)मुक्काम,१९९२The Lackadaisical Sweeper : Short Stories, (इंग्रजी, १९७०)Lost love, (इंग्रजी, १९७०). . . and Pine for What Is Not (इंग्जीरीत अनुवाद केले पुस्तक, १९९५)विंचुर्णीचे धडे,१९९६सात युगोस्लाव लघुकथा (अनुवादित)
विविध दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेल्या कथाः दार; मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९४; धरलं तर चावतं; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६; भिजत भिजत कोळी; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३; रोवळी; मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९३; हिशेब; (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१.
गौरी देशपांडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेः गौरी मनातली, २००५कथा गौरीची, २००८महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल), १९९९ – या पुस्तकात मंगला आठल्येकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे, र. धों कर्वे आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री-विषयक कार्याचा आलेख मांडला आहे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
छत्रपती संभाजीराजे
यांचा आज वाढदिवस. (जन्म : ११ फेब्रुवारी १९७१)
छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्याशी ते संबंधित आहेत. त्यांना समाजकारणाचीही आवड आहे. यातूनच त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. अनेक सामाजिक क्षेत्रात ते काम करत आहेत. एम. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या संभाजीराजे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे आहेत.
छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे केवळ नाव घेवून ते थांबत नाहीत तर त्यांच्या कार्याचा वारसा ते पुढे चालवत आहेत.
आज पर्यंत संभाजीराजेंनी उपेक्षित घटकांसाठी भरपूर काम केलेले आहे. उपेक्षित घटकांसाठी सतत काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या जीवनात आशावाद निर्माण करण्यासाठी ते धडपडत असतात. त्यांच्या कार्यातून त्यांचे अष्टपैलुत्वच जाणवते.
संभाजीराजे छत्रपती हे छत्रपती श्री शिवराय व राजर्षी शाहू महाराज यांचा केवळ जन्मानेच नव्हे तर आपल्या कार्याने वारसा चालवणारे युवराज आहेत. तमाम मराठी माणसाच्या जीवनातील सुवर्ण आनंदाचा क्षण म्हणजे रायगड किल्ल्यावर ६ जुन २००८ रोजी घडलेला इतिहास होय. साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा भव्य सिंहासनाधीष्टीत पुतळा तयार करून त्याची भव्य ऐतिहासिक मिरवणूक राज्यातील प्रमुख शहरातून काढण्यात आली. महाराष्ट्रातून हजारो शिवभक़्त रायगड किल्ल्यावर जमा झाले.
शेवटी केंद्र सरकारला याची नोंद घेवून रायगड किल्ल्यावर छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा मेघडंबरीत बसविण्यात परवानगी द्यावी लागली. रायगड किल्ल्यावर घेण्यात आलेला अतिभव्य असा राजसदरेवर छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा बसविण्यात ही ते यशस्वी झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती घराण्याला मोठा मान आहे. विद्यमान श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे सर्व पक्ष आदराने पाहतात. तर, त्यांचे थोरले पुत्र युवराज संभाजीराजे व युवराज मालोजीराजे यांनी आजवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षांबरोबरच आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवलेली होती.
२०१६ मध्ये राष्ट्रपतींनी छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभेवर निवड केली.
जराशीही पूर्वकल्पना न देता थेट राष्ट्रपतींनी अचानक छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभेवर निवड केल्याने महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण ढवळून निघाले. छत्रपती संभाजीराजेंच्या खासदारकीमुळे अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. नंतर राज्यातील शिवकालीन किल्ले व गड यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांची पर्यटन दूत म्हणून निवड करण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे राबवत असलेल्या गढ-किल्ले सुशोभिकरण मोहिमेमुळे तरूणांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले आहेत.
अनेक तरूण या मोहिमेत सक्रिय सहभाग घेहून किल्ले स्वच्छतेसाठी श्रमदान करत आहेत. या मोहिमेमुळे किल्यांचे रूपडे पालटत आहे. शिवाय किल्ला पर्यटनामध्ये वाढही झाली आहे.
(संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
त्यागराज बाबूराव पेंढारकर ज्येष्ठ छायाचित्रकार.
(जन्म : ११ फेब्रुवारी १९२६ कोल्हापूर; निधन : २८ सप्टेंबर २०१८)
ज्येष्ठ अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचे सुपुत्र म्हणून जगाला परिचित असले तरी एक संवेदनशील छायाचित्रकार म्हणून तसेच आज चित्रपटांचा चालता बोलता इतिहास म्हणून ओळखले जाणारे, त्यागराज पेंढारकर चित्रपटसृष्टीला परिचित होते.
घरातूनच कलेचा वारसा लाभलेल्या त्यागराज यांनी इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्ही. जे. टी. आय. इंजिनिअरिंगची परीक्षाही त्यांनी दिली. पण दोनदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून लागलेला छायाचित्रणाचा छंद जोपासण्यासाठी भालजींच्या स्टुडिओत कॅमेरा विभागामध्ये ते दाखल झाले. पण लवकरच व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ स्टुडिओत ‘परछाई’ चित्रपटाच्या वेळी जी. बाळकृष्ण यांना छायालेखनात सहाय्यक झाले .
‘दो आँखे बारह हाथ ‘ या चित्रपटाच्या वेळी जी. बाळकृष्ण आजारी पडल्याने त्यागराज यांना छायालेखनाची संधी मिळाली. यानंतर ‘मौसी ‘ आणि टेक्निकलर ‘नवरंग ‘नंतर ‘राजकमल’ सोडून ते मुक्त छायालेखक-छायाचित्रकार म्हणून काम करू लागले.
‘जेमिनी’चा ‘पैसा या प्यार ‘ व अन्य चित्रपट, काही गुजराती चित्रपट याबरोबरच दादा कोंडकेंचा ‘आली अंगावर’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘यशोदा’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘चव्हाटा’, ‘बाल शिवाजी’, ‘आघात’, ‘अभिलाषा’ इ. मराठी चित्रपटही केले.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीची घडी बसवून देण्यापासून मास्टर विनायक या गुणी कलाकार दिग्दर्शकास निर्माता म्हणून उभे करणाऱ्या नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचे छायालेखक त्यागराज पेंढारकर उर्फ राजादादा हे चिरंजीव. एका नटश्रेष्ठाच्या पोटी जन्म घेतलेल्या त्यागराज यांनी छान उंची असताना अभिनयाचा मार्ग न धरता सुरुवातीला दिग्दर्शन विभाग व नंतर थेट मुंबई गाठून चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत जावून छाया लेखनाचे धडे गिरवणे सुरु केले. आभाळाएवढा बाप पाठीशी.
भालजी पेंढारकरांसारखे काकागुरु आणि व्ही शांतारामांची चाणक्ष नजर. सिनेमात फक्त संधी मिळणं महत्त्वाचे असते. जो त्या संधीचे सोनं करतो, जीवाचं रान करतो, ही संधी पुन्हा नाही हे ज्याला कळते तोच खरा कलाकार तंत्रज्ञ. १९५८ साली व्ही. शांताराम यांची जगभर गाजलेला ‘दो आँखे बारा हाथ’ हा त्यागराज यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या आयुष्याचे सोनं करुन गेला. आजही जेलरची दाढी करत असताना कैद्याचे थरथरणारे हात, तो आरशातला क्लोज. .
. मोठे जेलर बाबूराव पेंढारकरांचे, पायाचे, बुटाचे थरकाप उडवणारे शॉट या साऱ्यांत कॅमेरामन त्यागराज यांचे कसब दिसून आले.
१९६० मध्ये त्यांनी ‘नवरंग’ही गाजवला. ‘नवरंग’ने त्यागराज यांना छायालेखक म्हणून खूप प्रसिद्धी आणि यश मिळविले. पुढे त्यांनी अनेक चित्रपट केले. राजकपूर यांचा ‘दिवाना,’ जेमिनीचा ‘समाज को बदल डालो’ १९७३ चा दादा कोंडके यांचा ‘आंधळा मारतो डोळा’ १९७४ चा रंगीत ‘राजा शिवछत्रपती,’ त्यानंतर अनेक गुजराती, पंजाबी, कोकणी चित्रपटही त्यांनी यशस्वी केले. ते प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यागराज पेंढारकर यांचे ‘पडद्यामागचा माणूस ‘ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार.
(जन्म : ११ फेब्रुवारी १८९६; निधन : २३ एप्रिल १९४०)
रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे जन्मलेल्या सरपोतदारांची घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले.
तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजीमध्ये छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना! नटश्रेष्ठ गणपतराव जोशींच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले.
महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या पहिल्या चित्रपटाचे लेखक नानासाहेब सरपोतदारच होते. नाना स्त्री कलाकारांच्या भूमिकाही हुबेहूब वठवत. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी नानांनी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शह’ आदी चित्रपट लिहिले. काही चित्रपटांत भूमिकाही केल्या.
इथल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी दिग्दर्शनातील बारकावेही शिकून घेतले. छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन नानासाहेबांनी केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता. पुढे तेलगिरीची पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली.
नानासाहेबांनी या संस्थेसाठी दोन वर्षात ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ चित्रपट दिग्दर्शित केले. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी असा संवेदनशील सामाजिक विषय हाताळला होता.
अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते. १९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला.
पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले. नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते.
‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. या चित्रपटाची जाहिरात त्यांनी मोठया कल्पकतेने केली होती. त्यानंतर मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या १९२८ साली ‘आर्य महिला’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ललिता पवार नायिका तर ‘भारतमाता थिएटर’चे मालक भोपटकर नायक होते. या चित्रपट निर्मितीसाठी नानासाहेबांचा ‘बालगंधर्व’ व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
‘आर्यन कंपनी’चा १९२८ सालचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवारचा यांचा पहिला मूकपट होता.
१९२८ ते १९३० या काळात नानानी, ‘मराठयाची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उणाडटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी, तलवार’ आदी चोवीस मूकपटांची निर्मिते व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.
अर्देशीर इराणी यांच्या इम्पिरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ हा बोलपट नानांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे,
हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली. स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिश्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांची आवडती मठी बनली.
त्यानंतरही नानासाहेबांनी १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या बोलपटाला जातो. ‘आर्यन फिल्म’साठी नानासाहेब त्याची निर्मिती करणार होते.
त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार आदी कलाकारांची निवडही करण्यात आली होती. तशी ज्ञानप्रकाशमध्ये जाहिरातही आली होती, परंतु त्यांच्या भागीदारांना ही कल्पना रुचली नाही, म्हणून त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने हेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला.
मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ (सध्याचे नाझ) थिएटरमध्ये तो सत्तावीस आठवडे चालला. नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ नाटके लिहिली. ‘मौज’मध्ये ते परखड लेख लिहिले. शाहू मोडक, ललिता पवार, राजा सँडो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली. पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते. नानासाहेबांचा हा यशस्वी वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालवला.
त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत सरपोतदार यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पुना गेस्ट हाउसचा कारभार चारुदत्त सरपोतदार सांभाळत असत. विश्वास सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला.
चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शनही करत असत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करत असत.