गौरी पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, सप्टेंबर २२, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद ३१ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३५
चंद्रोदय : १२:४३ चंद्रास्त : २३:४५
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – १३:३५ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – १५:३४ पर्यंत
योग : आयुष्मान् – २३:५३ पर्यंत
करण : वणिज – १३:३५ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०१:०१, सप्टेंबर २३ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृश्चिक – १५:३४ पर्यंत
राहुकाल : ११:०० ते १२:३१
गुलिक काल : ०७:५८ ते ०९:२९
यमगण्ड : १५:३३ ते १७:०४
अभिजितमुहूर्त : १२:०७ ते १२:५५
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : १२:५५ ते १३:४४
अमृत काल : ०६:४७ ते ०८:२३
वर्ज्य : २३:२२ ते ००:५५, सप्टेंबर २३

दक्षिण भारत – भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.
महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो.
प्रांता प्रांतात पूजनाच्या विविध पध्द्ती आहेत.

आज गौरी पूजन आहे

भारतीय स्वातंत्र्य – चळवळीतील एक नेमस्त पुढारी व भारतसेवक समाजाचे नेते. – वलंगईमन शंकरनारायण श्रीनिवास श्रीनिवास शास्त्री. त्यांचा जन्म तमिळनाडूतील कुंभकोणम् – जवळच्या वलंगईमन या खेड्यात. बी.ए. झाल्यानंतर पुढे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून १८९९ पर्यंत नोकरी. शास्त्री यांचे जीवन, कार्य व एकूणच राजकीय- सांस्कृतिक दृष्टिकोण यांवर गोपाळ कृष्ण गोखले यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्याच प्रेरणेने शास्त्रींनी सक्रिय राजकारणात १९०७ नंतर प्रवेश केला. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनानंतर ते भारतसेवक समाजाचे अध्यक्षही झाले (१९१५–१९२७). त्यांनी सर्व्हंट ऑफ इंडिया हे साप्ताहिक सुरू केले (१९१८). तत्कालीन मद्रास इलाख्याच्या विधिमंडळात ते सरकारनियुक्त सदस्य होते (१९१३–१९१६). तसेच व्हाइसरॉयच्या मध्यवर्ती कायदेमंडळातही त्यांनी काही वर्षे काम केले.

वसाहतीच्या स्वराज्याचे ते पुरस्कर्ते होते. महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीला त्यांचा विरोध होता. त्यामुळे ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व राष्ट्रीय उदारमतवादी संघ (नॅशनल लिबरल फेडरेशन) स्थापना करण्यात त्यांनी हिरिरीने भाग घेतला (१९१८). भारतातील ब्रिटिश सरकारच्या वतीने त्यांनी इंग्लंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड वगैरे देशांत विविध कामांसाठी दौरे केले. ब्रिटिश सरकारचे पक्षपाती म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली असली, तरी भारताला स्वराज्य हवे आहे, याचा राष्ट्रीय उदारमतवादी संघाच्या अधिवेशनात (१९२२) स्पष्ट निर्वाळा देऊन त्यांनी आपल्या टीकाकारांना गप्प बसविले.

भारत सरकार व दक्षिण आफ्रिका यांच्यातील गोलमेज परिषदेत त्यांनी भाग घेतला (१९२६). त्यातून केपटाउन करार झाला. आफ्रिकेतील वर्णविद्वेषाविरुद्धही त्यांनी आवाज उठविला. तसेच केनिया व पूर्व आफ्रिकेतील अनिवासी भारतीयांना नागरी हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून दर्बान येथे शास्त्री महाविद्यालय सुरू करण्यात आले.

१९३०-३१ मधील गोलमेज परिषदांना ते सरकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना ब्रिटिश शासनाने के. सी. एस. आय. ही उपाधी दिली; पण ती त्यांनी नाकारली. त्यांनी महंमद अली जिना यांनी मांडलेल्या द्विराष्ट्र सिद्धांताला विरोध केला होता (१९४५). शास्त्री हे एक व्यासंगी विद्वान व प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे खाजगी जीवन अत्यंत साधे होते. भारतातील सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांना त्यांच्याविषयी आदर वाटत असे. मद्रास (सध्याचे चेन्नई) येथे त्यांचे हृद्शूलाने निधन झाले.

१८६९ : कायदेतज्ञ, सूक्ष्म बुद्धीचे राजकारणी , भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही . एस . श्रीनिवास शास्त्री यांचा जन्म ( मृत्यू : १७ एप्रिल, १९४६ )

ख्यातनाम दिग्दर्शक कै. अनंत माने – आपल्या तब्बल ६५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत कै. अनंत माने यांनी सुमारे ६१ मराठी व हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यापैकी ‘सांगत्ये ऐका’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘सुशीला’, ‘रंगपंचमी’, ‘लक्ष्मी’, ‘मानिनी’, ‘अवघाचि संसार’ हे मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ‘मैलाचे दगड’ मानले जातात. त्यांनी जवळपास ३० चित्रपटांच्या कथा—पटकथा लिहिल्या असून त्यापैकी व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा अविस्मरणीय चित्रपट होय. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धाकटी जाऊ’ ‘शाहीर परशुराम’, ‘मानिनी’, ‘पाहुणी’, ‘हळदीकुंकू’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ या मराठी चित्रपटांनी केंद्र व राज्य सरकारचे पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ज्येष्ठ चित्रपट निर्माता-दिग्दर्शक कै. अनंत माने यांचा उल्लेख ‘विक्रमी’ दिग्दर्शक असा करावा लागेल. त्यांनी १९५९ साली निर्माण केलेला ‘सांगत्ये ऐका’ हा अजरामर विक्रमी चित्रपट पुण्याच्या विजयानंद या एकाच चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चालला. हा विक्रम आजही अबाधित असून तो अद्याप कोणत्याही मराठी चित्रपटाला मोडता आलेला नाही.

१९१५ : मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म ( मृत्यू : ९ मे, १९९५ )

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटुंबात झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.

त्यांचे पूर्वज कोल्हापूरजवळील जैन नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.

त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापली.

भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.

१८८७ : थोर शिक्षणतज्ञ डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म ( मृत्यू : ९ मे, १९५९ )

घटना :

१४९९ : बेसचा तह झाल्याने स्वित्झर्लण्ड स्वतंत्र राष्ट्र बनले.
१८८८ : नॅशनल जिऑग्राफी मासिकाचा पहिला अंक प्रकाशित
१९३१ : नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि स्वा. सावरकर यांची भेट झाली
१९६५ : दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्र संघाच्या युद्ध बंदी आदेशांनंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
१९८० : इराकने इराण पादाक्रांत केले
१९९५ : नागरिकांना घरात किंवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
१९९५ : श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे शाळेवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ३४ जण ठार झाले.
२००३ : नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

• मृत्यू :

• १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन.
• १९९१: हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)
• १९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १८९९)
• १९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)
• २०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)

जन्म :
१९०९ : विनोदी लेखक, विडंबनाकर , दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचा जन्म ( मृत्यू : ४ ऑक्टोबर, १९५९ )
१९२३ : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.
(संकलन : संजय सोहोनी, पुणे) (सकलन सहकार्य : डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »