राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील
मुंबई- देशभरातील सहकारी साखर कारखानदारीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संघाच्या ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपचा अध्यक्ष बनला आहे. राष्ट्रीय साखर संघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ या दोन्ही संस्थांवर सुरुवातीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वर्चस्व राहिले आहे.
मावळते अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. श्री. पाटील संघाला निश्चित न्याय देतील, असे ते म्हणाले.
सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्न आणि अडचणी केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. सहकारी साखर कारखानदारीने मला ही संधी दिली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असे प्रतिपादन पाटील यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना केले.
हर्षवर्धन पाटील यांची २०१९ मध्ये राष्ट्रीय साखर संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली होती. राज्यात साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे, राज्यातील राजकारण सहकारी कारखान्याच्या माध्यमातून चालते, त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर संघ ही एक महत्वाची संस्था आहे.