मारुती महाराज कारखान्यात डिस्टिलरी प्रकल्प सुरू करणार

औसा : तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने उसाचा पुरवठा त्याच प्रमाणात होणे गरजेचे होते. यासाठी संचालक मंडळाने सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सल्ल्याने २५ हार्वेस्टर उपलब्ध करून घेतले आहेत. त्यामुळे मजूर टंचाईवर मात करून कारखाना अधिक क्षमतेने उसाचे गाळप करीत आहे. पुढील हंगामापासून कारखान्यात डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे कारखान्याचे चेअरमन शाम भोसले यांनी सांगितले.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे बंद असलेला आणि मोडकळीस आलेला मारुती महाराज साखर कारखाना पुन्हा नव्याने झेप घेत आहे. आजघडीला हा कारखाना प्रतिदिन अडीच हजार टन गाळप करीत आहे. दिलीपराव देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या मदतीने तर शासन दरबारी अमित देशमुख व भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी आपले वजन वाढवून दिलीपराव देशमुख आणि बेलकुंड परिसरातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी विलासराव देशमुखांनी उभारलेला हा कारखाना वाचविण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या हंगामात जवळपास एक लाख एक हजार टन उसाचे गाळप करण्यात आला आहे. याची पहिली उचल २ हजार ७०० देण्यात आली होती. तर गुरुवारी आणखी एकशे अकरा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ८११ रुपये अंतिम भाव दिला आहे.