आज जागतिक वन दिन
आज मंगळवार, मार्च २१, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ३०, शके १९४४
सूर्योदय : ०६:४२ सूर्यास्त : १८:५०
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १८:३७
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – २२:५२ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – १७:२६ पर्यंत
योग : शुभ – १२:४२ पर्यंत
करण : चतुष्पाद – १२:१७ पर्यंत
द्वितीय करण : नाग – २२:५२ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कुंभ – ११:५७ पर्यंत
राहुकाल : १५:४८ ते १७:१९
गुलिक काल : १२:४६ ते १४:१७
यमगण्ड : ०९:४४ ते ११:१५
अभिजित मुहूर्त : १२:२२ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०९:०८ ते ०९:५६
दुर्मुहूर्त : २३:३४ ते ००:२२, मार्च २२
अमृत काल : १०:१० ते ११:३७
वर्ज्य : ०२:१६, मार्च २२ ते ०३:४५, मार्च २२
आज जागतिक वन दिन, कठपुतळी दिन आहे
बरोब्बर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंग्याने निर्घृण हत्या केली… या अमावास्येला आपण मृत्युंजय अमावस्या म्हणतो.
चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या..
चालताना साधा काटा रुतला तर आई गं म्हणणारे आपण… कसं सोसलं असेल हो त्या सिहांच्या छाव्याने? अंगावरचे केस उपटले गेले, सालटी काढली गेली, त्यावर मीठ टाकलं गेलं, मिरचीची धुरी देण्यात आली, चाबकांचे फटके मारण्यात आले, हाता पायाची नखे उपटण्यात आली, जीभ छाटली गेली, दोन्ही डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळया टाकण्यात आल्या.. हात पाय तोडण्यात आले, आणि शेवटी शिर छाटण्यात आले…रोज एक एक छळ. असे किती दिवस?? तब्बल चाळीस दिवस… किती ही सहनशीलता? किती हे धैर्य? किती हे कठोर मनोबल? कुठून आलं हे सर्व? कोणी बळ दिलं इतकं सोसायला? कोणासाठी? कशासाठी सहन केलं? फक्त आणि फक्त स्वधर्मासाठी…
मृत्युंजय अमावस्येला सर्वांनी जमेल त्या प्रकारे निदान या एका दिवशी तरी वरील पैकी एक पर्याय स्वीकारावा.. शंभू महाराजांच्या बलिदानास आठवावे. त्यांनी सोसलेल्या छळास मनोमन अनुभवावे. त्यांच्या नावाने एक दिवा लावावा. हीच त्यांना खरी सुमनांजली असेल.
आज मृत्युंजय अमावस्या अर्थातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस.
मानवेंद्रनाथ (त्यांचे मूळ नाव नरेन (नरेंद्र) भट्टाचार्य.): – थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक मानले जातात.
हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. १९३४ ला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांतिकार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तरायुष्यात मेक्सिको, रशिया, अफगाणिस्तान, चीन इत्यादी देशांत केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली. यांनी स्थापन केलेला मेक्सिकन साम्यवादी पक्ष हा सोव्हिएत संघाबाहेरील पहिला साम्यवादी पक्ष होता. यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस साम्यवादाचा त्याग करून जहाल मानवतावाद स्विकारला.
१८८७ थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म ( मृत्यू : २५ डिसेंबर, १९५४)
शहनाईवादक बिस्मिल्ला खान- मूळ नाव कमरूद्दिनखाँ. सनईवादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून – खाँसाहेब पैगंबरबक्ष यांच्याकडून – सनईवादनाचे संस्कार लाभले. त्यांनी आपल्या मामांकडे – खाँसाहेब अलिबक्ष यांच्याकडे – वयाच्या सहाव्या वर्षापासून वाराणसी येथे सनईवादनाचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तसेच विलायत हुसेन आणि सादिक अली यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. हळूहळू आपल्या मामांबरोबर, त्यांची साथ करण्यासाठी लग्नासारख्या उत्सवप्रसंगी तसेच संगीत संमेलनांत ते जाऊ लागले. त्यांच्याबरोबर बिस्मिल्लाखाँ यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनई वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला (१९३०). दुसरा कार्यक्रम लखनौ येथे, प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक मिळवले. तद्वतच १९३७ मधील कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी तीन सुवर्णपदके मिळवून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
१९३८ मध्ये लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम सादर केला. येथून पुढे त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकीर्दीला सुरुवात झाली. १९४० साली बिस्मिल्लाखाँ व त्यांचे बंधू खाँसाहेब शमसुद्दीनखाँ यांनी एक संगीत मंडळी स्थापन करून कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. पुढे अल्पावधीतच प्रथम श्रेणीचे सनईवादक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. या दरम्यान कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सनादी अप्पण्णा या चित्रपटासाठी त्यांनी सनईवादन केले. सत्यजित राय यांच्या जलसाघर या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली.
सनईसारख्या वाद्यावर गायकीचे सर्व प्रकार लीलया निर्माण करणारा अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्लाखाँ ख्यातनाम आहेत. गायन-वादनाच्या शैलींचा अपूर्व समन्वय त्यांच्या ठिकाणी दिसून येत असे. मींड, गमकादींचाही त्यात अंतर्भाव होतो. ख्याल, ठुमरी वगैरे संगीतप्रकारांप्रमाणेच कजरी, चैती, पूरबी अशा लोकधुनीही ते कौशल्याने हाताळत असत. सनईच्या फुंकीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांचे वादन अत्यंत भावपूर्ण होत असे. लयीच्या साथीसाठी ते छड्यांनी वाजवले जाणारे खोरदक नावाचे वाद्य घेत असत. ते १९६२ मध्ये अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे गेले आणि १९६४ मध्ये एडिंबरो संगीत महोत्सवात त्यांनी भाग घेतला. १९६७ मध्ये ते अमेरिकेला गेले. तसेच ’इंटरनॅशनल म्यूझिक कौन्सिल’च्या निमंत्रणावरून त्यांनी यूरोपचा दौरा केला (१९६९-७०)
बिस्मिल्लाखाँ यांनी सनईवादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांनी सरोदवादक अमजद अलीखाँ आणि सतारवादक रवी शंकर इत्यादींसोबत जुगलबंदीचे कार्यक्रमही सादर केले आहेत. सनईवादनामध्ये त्यांनी संगीतक्षेत्रात एकमेवाद्वितीय असे स्थान पटकावले. ते शिया मुसलमान असल्यामुळे त्यांच्या समाजातील काही लोकांचा त्यांना सुरुवातीस विरोध होता; पण तरीही त्यांनी नेटाने सनईवादनाची परंपरा कायम राखली व त्यात नवनवीन प्रयोग केले.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी सनईवादनाकरिता बिस्मिल्लाखाँ यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर आमंत्रित केले होते. बिस्मिल्लाखाँ यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी सनईवादनाचे कार्यक्रम केले. त्यांच्या सनईवादनाच्या ध्वनिमुद्रिका भारतात व परदेशांतही अत्यंत लोकप्रिय आहेत. गूंज उठी शहनाई या हिंदी चित्रपटातील त्यांचे सनईवादनही फार लोकप्रिय ठरले (१९५९). स्वदेस (२००४) या हिंदी चित्रपटासाठी देखील त्यांनी सनईवादन केलेले आहे.
बिस्मिल्लाखाँ यांच्या असामान्य कलागुणांमुळे १९५५ मध्ये त्यांना ‘नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन’ या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून ‘अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती’ हा किताब मिळाला. १९५६ मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे सन्मान लाभला आणि १९६१ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ व १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि १९८० मध्ये ‘पद्मविभूषण’ ह्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मध्यप्रदेश शासनाकडून तानसेन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘रॉयल नेपाळ आर्ट अकॅडमी’ तर्फेही त्यांना सर्वोच्च मान लाभला. २००१ मध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीकरिता ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविले.
१९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)
घटना :
१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.
१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
• मृत्यू :
• १९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल , १८९१)
• १९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
• २००३: भारतीय लेखक शिवानी यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर , १९२३)
• २००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर, १९१५)
• २०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २९ मार्च, १९२६)
• २०१७ : लेखक, पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन ( जन्म : : २२ जुलै, १९२५)
जन्म :
१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)
१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)
१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)