डॉ. शिवाजीराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाचा मानाचा पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : विक्रमी नऊ महिन्यात उभारण्यात आलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक आणि भारती विद्यापीठ डीम्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाकडून मानाच्या प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्काराने गुरुवारी गौरवण्यात आले.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू कणबरकर यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार विद्यापीठ आवारातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. कदम यांना शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्र-कुलगुरू प्रमोद पाटील आणि कुलसचिव विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि दीड लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी या पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची भर घालून, एकूण पाच लाख रूपयांचा निधी भाई माधवराव बागल विद्यापीठाला याच कायक्रमात दिला. बागल विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्याचा स्वीकार करत, डॉ. कदम यांचे आभार मानले.

खासदार पाटील यांनीही आपल्या भाषणात, डॉ. कदम यांचे त्याबद्दल कौतुक केले.
मी आणि आमचे बंधू दिवंगत डॉ. पतंगराव कदम दोघेही शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहोत, त्यामुळे विद्यापीठाने त्याच्या विद्यार्थ्याचाच सन्मान केला आहे, अशी माझी भावना आहे, असे उद्‌गार डॉ. शिवाजीराव कदम यांनी काढले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »