‘कृष्णा’च्या हंगामाची सांगता; १० लाख ६० हजार टन गाळप
इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६३ वा गळीत हंगाम १० लाख ६० हजार ऊस गाळपासह नुकताच पार पडला. आगामी गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन अध्यक्ष अतुल भोसले यांनी यावेळी केले.
प्रारंभी संचालक बाबासाहेब शिंदे व त्यांच्या पत्नी सुमन शिंदे यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष सभासद, जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, जे. डी. मोरे, बाजीराव निकम, बाबासो शिंदे, सयाजी यादव, विलास भंडारे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, सी. एन. देशपांडे, मुकेश पवार, एस. डी. कुलकर्णी, प्रकाश सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
उपाध्यक्ष जगदीश जगताप म्हणाले, या हंगामात नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे गाळप कमी झाले. परंतु, येत्या हंगामात कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करून गळीत हंगाम यशस्वी पार पाडावा लागणार आहे.
मुकेश पवार म्हणाले, कृष्णा कारखान्याने १३० दिवसांमध्ये १० लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गळीत केले असून, ११ लाख ७८ हजार २१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.६१ टक्के इतका राहिला आहे. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.