साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याचा आहे, त्याचा उतारा १२.६७ आहे.
राज्यात सर्वात कमी उतारा पडलेला कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री गजानन महाराज शुगर आहे. कारखान्याची गाळप क्षमता ३५०० टीसीडी असून, तीन महिन्यात कारखान्याने केवळ ११९६० टन गाळप केले, असे साखर आयुक्तालयाची आकडेवारी सांगते. त्यानुसार, नंदूरबार जिल्ह्यातील आयान मल्टिट्रेड एलएलपी ५.६६ सह सर्वात कमी उतारा असलेला दुसऱ्या क्रमांकाचा कारखाना आहे. तो १०००० टीसीडी क्षमतेचा असून, या हंगामात ६ लाख ३५ हजार ५२३ टन गाळप घेतले आहे.
साखर उताऱ्यामध्ये गतवर्षीप्रमाणेच यंदाही सहकारी साखर कारखान्यांनी बाजी मारली आहे, हंगामात गाळप घेणाऱ्या ९९ सहकारी साखर करखान्यांचा सरासरी उतारा १०.२३ टक्के असून, १०१ खासगी कारखान्यांचा उतारा ८.६४ भरला आहे. बारापेक्षा अधिक साखर उतारा घेणाऱ्या १५ कारखान्यामध्ये १२ सहकारी आणि ३ खासगी आहेत.
राज्यात सध्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि भीमाशंकर सह. साखर कारखाना हे दोनच सहकारी कारखाने आणि नागपूर विभागातील मानस ॲग्रो हे सुरू आहेत. परवाच्या आकडेवारीनुसारर, श्री विघ्नहरने साडेसात लाख टनांपुढे गाळप केलेले आहे, तर श्री भीमाशंकर ११ लाख टनांपुढे गेला आहे. श्री विघ्नहरचा हंगाम आणखी बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे.