साखर कारखान्यांना चार हजार कोटींची मदत : मुरलीधर मोहोळ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना मोदी सरकारकडून आतापर्यंत थेट चार हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य विविध स्वरूपात करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. लोकसभेत खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला ते शुक्रवारी उत्तर देत होते.

महाराष्ट्रात सहकाराचे स्वरूप व्यापक आहे, ६० ते ७० टक्के जनतेचा सहकार क्षेत्राशी संबंध येतो. या क्षेत्राला, विशेषत: सहकारी साखर कारखान्यांना भरघोस मदत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. एनसीडीच्या माध्यमातून आजवर तब्बल चार हजार कोटींचे अर्थसाह्य करण्यात आले आहे. ही मदत करताना, राजकारणविरहित दृष्टिकोन असतो. कारखाना कोणत्यी पक्षाच्या नेत्याशी संबंधित असला, तरी मदत केली जाते, असे मोहोळ म्हणाले. लोकसभा सदस्य सुप्रियाताईंनी ज्या कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याबद्दल चौकशी करून निश्चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

सुळे यांच्याकडून ‘घोडगंगा’चा प्रश्न उपस्थित
केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मदत केली जाते. मात्र काही राज्यांमध्ये तेथील सरकारच्या धोरणामुळे सबंधित कारखान्याला अर्थसाह्य केंद्राकडून मंजूर होऊनदेखील मिळत नाही. महाराष्ट्रातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातून अर्थसाह्य मंजूर करण्यात आले होते. मात्र ते कारखान्याला मिळालेच नाही, असा मुद्दा उपस्थित करत खा. सुळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर आक्षेप घेतला होता.

शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रावसाहेबदादा पवार घोडगंगा आणि राजगड सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा कळीचा ठरला. हा कारखाना बंद राहिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक पवार यांना जबाबदार धरले आणि सत्ता आल्यानंतर आम्ही कारखाना सुरू करू, असे आश्वासन दिले होते. अशोक पवार यांनी मात्र, केंद्राने मंजूर केलेला निधी अजितदादांमुळेच कारखान्याला मिळू शकला नाही, असा आरोप केला होता. अटीतटीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) उमेदवार माऊली कटके यांनी मोठ्या मतांनी पराभव केला.

प्रश्नोत्तराचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टिचकी मारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »