कार्बन उर्त्सजनाबाबत साखर कारखान्यांकडून मागवली माहिती
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र
पुणे : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्रे पाठवून कार्बन उर्त्सनाबाबत माहिती मागवली आहे. मात्र त्यासाठी खूपच कमी कालावधी दिल्याने कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ जून २०२४ रोजी सर्व कारखान्यांना पत्रे पाठवली आणि आठ दिवसांच्या आत माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. आपल्या कारखान्यातील आणि कारखान्याशी संबंधित सर्व घटक गृहित धरून, एकूण कार्बन उर्त्सजन किती होते याची सविस्तर आकडेवारी सादर करावी, असे पत्रात म्हटले आहे.
या मुद्यावर नुकतीच महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाची बैठक झाली आणि सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. ‘शुगरटुडे’ने साखर कारखान्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पत्राचे स्वागत केले; मात्र मंडळाने दिलेला कालावधी अपुरा आहे, असे सांगितले.
कार्बन उर्त्सजनाचे अचूक प्रमाण काढण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मंडळाने कालावधी वाढवून द्यावा. किमान सहा महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी साखर कारखान्यांनी केली आहे.
भारताला ‘कार्बन न्यूट्रल’ (नेट झिरो इमिशन) करण्यासाठी २०७० ची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. त्यादिशेने सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ‘क्लायमेट चेंज’ समितीने जगातील कार्बन उर्त्सजन कमी करण्यासाठी उद्दिष्टे निश्चित केली आहेत.