उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) रस्ता आहे.

केंद्र सरकारने रस्ते बांधणीसाठी पेट्रोलियम-आधारित बिटुमेनमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत लिग्निन मिसळण्यास परवानगी दिली आहे. बिटुमेन हा कच्च्या तेलाच्या ऊर्ध्वपतनातून तयार होणारा काळा पदार्थ आहे. त्याचा वापर रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. बायो-बिटुमेन हे जैव-आधारित बाइंडर आहे, जे भाजीपाला, झाडाचे खोड, शेवाळ, लिग्निन (लाकडाचा एक घटक) किंवा प्राण्यांची विष्ठा यांसारख्या अक्षय स्रोतांपासून बनविण्यात येते. पेट्रोलियम बिटुमेनला स्थानिक पर्याय म्हणून बायो-बिटुमेन विकसित करण्यात आले आहे. याचा वापर रस्ते बांधण्यासाठी केल्यास प्रदूषण कमी होणार आहे. मनसरजवळील नवा रस्ता बनविण्यासाठी लिग्निन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे.

BITUMEN ROAD

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वरील १ किलोमीटरचा पट्टा या तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कमी खर्चात डांबरी रस्ते तयार करता येतील. मुख्य म्हणजे, या स्वरूपाचा रस्ता हा नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा ४० टक्के अधिक मजबूत असेल. या मार्गाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.
यावेळी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अतुल मुळे, एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी, उपाध्यक्ष डॉ. तुषार पाटील, प्रधान वैज्ञानिक डॉ. सिध्दार्थ पाल, सीएसआयआर सीआरआरआयच्या प्रधान वैज्ञानिक डॉ. अंबिका बहल, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव कमलेश चतुर्वेदी आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

‘देशाला सध्या रस्ते बांधणीसाठी ४० लाख टन डांबर लागते. त्यातील ४५ हजार टन डांबर रिफायनरीमधून येते. बाहेरून येणाऱ्या ४५ हजार टनासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च होतो. बायो-बिटुमेनचा उपयोग केल्यास रस्ते निर्मितीची किंमत कमी होऊन मोठा फायदा होणार आहे. तसेच इंधनेदेखील आता पेट्रोलऐवजी सीएनजीवर आणण्यात येत आहे. रामटेक, मनसर या भागात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होते. धान काढल्यानंतर जमिनीत उरणारे तणस, पराळी (राइस स्ट्रॉ) जाळण्याऐवजी त्यापासून अन्य पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान देशात तयार झाले आहे. तुमसर देव्हाडाच्या साखर कारखान्यात सीएनजी उत्पादन सुरू होत आहे. आता वाहने पेट्रोलवरून सीएनजी वर गेल्यास इंधनाचा मासिक खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होणार आहे. भविष्यात सीएनजीचा वाढणारा उपयोग लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होणार आहे,’ असा विश्वास यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »