आजचे पंचांग आणि दिन विशेष
बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३
युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद ८ शके १९४५
सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५५
चंद्रोदय : १८:३९ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : निज श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – १०:५८ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – २०:४७ पर्यंत
योग : अतिगण्ड – २१:३३ पर्यंत
करण : वणिज – १०:५८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २१:०१ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : मकर – १०:१९ पर्यंत
राहुकाल : १२:३९ ते १४:१३
गुलिक काल : ११:०५ ते १२:३९
यमगण्ड : ०७:५७ ते ०९:३१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१४ ते १३:०४
अमृत काल : ११:४२ ते १३:०६
सन आयलाय गो आयलाय नारलीपुनवेचा
मनी आनंद मावेना कोळय़ांचा दुनियेचा॥
अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पूजेला
हात जोडूनि नारळ सोन्याचा देऊ या दर्याला॥
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
आज रक्षाबंधन आहे.
‘चांफा बोलेना, चांफा चालेना
चांफा खंत करी कांही केल्या फुलेना।
गेले आंब्याच्या बनी
म्हटली मैनांसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून..
- कवी ‘बी’
‘बी’ हे अपूर्व पण मनोहर आणि यथार्थ इंग्रजी नामाभिधान धारण करून ज्यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी’ मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली.
विद्यमान कविवृंदात वयाने व गुणांनी जे वंद्य व आदरणीय कवि समजले जातात त्यांच्यामध्ये कविवर्य ‘बी’ यांचे स्थान निःसंशय थोर आहे. ते नावाने जरी ‘बी’ असले तरी त्यांचे कर्तृत्व ऐ वन दर्जाचे आहे ही गोष्ट एखादा बालकवीहि कबूल करील. म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख व कृतीचा उल्लेख होताच आधुनिक तरुण कवींच्या माना मुजर्यासाठी खाली लवतात. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका’ ही वर्हाडात चिखलदरा येथे ता. १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली.
१९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे’ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. १९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.
१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)
प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग- इ.स. १८६५मध्ये पुढील शिक्षणासाठी काशिनाथजी एल्फिन्स्टन महाविद्यालयात जाऊन लागले. पहिल्याच वर्षी त्यांना ज्युनियर स्कॉलरशिप व त्याच्या पुढच्या वर्षी त्यांना सिनियर स्कॉलरशिप मिळू लागली. इ.स. १८६७मध्ये ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले व इ.स. १८६९मध्ये इंग्रजी व संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाले.
इ.स. १८६८मध्ये काशिनाथ तेलंग एल्फिन्सटन शाळेत संस्कृत शिक्षकाची नोकरी करू लागले. पण त्यांच्या वरिष्ठांनी लवकरच त्यांची नेमणूक एल्फिन्सटन महाविद्यालयात केली. तिथे काम करत असतानाच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलीच्या परीक्षेची तयारी करत होते. इ.स. १८७२मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली.
इ.स. १८७२-७३ साली तेलंग यांचे “रामायण-होमर” व “गीता-बायबल” या विषयांवरील निबंध प्रसिद्ध झाले. इ.स. १८८०मध्ये मुख्य न्यायाधीशांच्या शिफारशीवरून तेलंग यांना ठाणे येथे सह-न्यायाधीशाची जागा देण्यात आली होती पण त्यांनी ती नाकारली.
तेलंग यांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे न्यायालयात वकिली करताना विशेषतः हिंदू कायद्या संदर्भात याचा त्यांना फायदा झाला. इ.स. १८८९मध्ये न्यायाधीश नानाभाई हरिदास यांच्या निधनामुळे न्यायाधीशाचे पद रिक्त झाले व त्या पदावर काशिनाथ तेलंग यांनी नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे ते ३४ वे न्यायाधीश होते. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदू कायद्यात सुधारणा केल्या.
इ.स. १८७०मध्ये तेलंग यांनी वयाच्या विसाव्या वर्षी “शंकराचार्य यांचे चरित्र” हा निबंध लिहून स्टु.लि.सा. सोसायटीमध्ये सादर केला. त्यांनी इ.स. १८७२मध्ये रामायणावर एक अभ्यासपूर्ण निबंध लिहून डॉ. वेबर यांनी रामायण–काळासंबंधीचा मांडलेला सिद्धान्त खोडून काढला. त्याचप्रमाणे तेलंग यांनी भगवतगीतेवर अभ्यासपूर्ण निबंध लिहून लेरिंगेर याचे भगवद्गीते संबंधीचे प्रतिपादन तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढले. इ.स. १८७४साली तेलंग यांनी मुंबई सरकारसाठी भर्तृहरीची “नीति आणि वैराग्य” ही शतके एकत्र करून सटीप पुस्तक लिहिले व त्याला त्यांनी प्रस्तावना दिली. तसेच इ.स. १८८४साली त्यांनी मुंबई सरकारसाठी विशाखदत्त याच्या “मुद्राराक्षस” या संस्कृत नाटकाची सटीप आवृत्ती लिहिली.
इ.स. १८८१मध्ये तेलंग यांची लॉ स्कूलमध्ये हिंदीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. इ.स. १८८९मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यामुळे त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. इ.स. १८७२मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. च्या संस्कृत विषयाच्या परीक्षक म्हणून नेमले गेले. इ.स. १८७७मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या फेलोच्या जागी नेमण्यात आले. इ.स. १८८२मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे सिंडिक झाले. या पदावर ते दहा वर्षे राहिले व इ.स. १८९२ मध्ये त्यांची सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती केली.
१८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)
- घटना :
- १५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.
- १९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
- १९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
- मृत्यू :
१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)
१९८१: शिक्षणतज्ज्ञ, शोधा इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एजुकेशन चे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)
२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)
- जन्म :
- १८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)
- १८८३: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ )
- १९०३: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१)
- १९०४: उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म. ( मृत्यू : ५ मे , १९८९ )
- १९२३: हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)
- १९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ )
- १९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)
- १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.
(संकलन : संजय सोहोनी, पुणे) (सकलन सहकार्य : डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे)