‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी प्रणिता खोमणे

पहिल्यांदाच महिलेची निवड
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या पदासाठी प्रणिता खोमणे यांचे नाव जाहीर केले. निवडीनंतर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाच्या हस्ते खोमणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रणिता खोमणे यांचे पती डॉ. मनोज खोमणे हे बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
यापूर्वीचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी ठरलेल्या कालावधीत उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या पदासाठी अनेक संचालक इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी को-हाळे खुर्दच्या माजी सरपंच असलेल्या प्रणिता खोमणे यांना या पदावर काम करण्याची संधी दिली आहे.
एक महिला पदाधिकारी प्रथमच उपाध्यक्ष झाल्याने आणि त्यांना लांबून यावे लागणार असल्याने कारखान्याची गाडी द्यावी, अशी सूचना संचालक अभिजीत काकडे यांनी मांडली यावर सर्व संचालकांनी चर्चा करून संमती दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संग्राम सोरटे, सुनील भगत, अजय कदम, अभिजीत काकडे, तुषार माहूरकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आणि सर्व संचालक व उपस्थित होते. ऋषिकेश गायकवाड यांनी आभार मानले.
Feature photo courtesy – dr. khomane fb wall






