‘स्वाभिमानी’चे २५ नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राज्याच्या मंत्र्यांना कार्यकर्ते जाब विचारणार


टीम शुगरटुडे
कोल्हापूर : सरकार कोणाचेही असो, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.

२५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली येथील पत्रकार परिषदेत केली. १०० खोके घालूनही सरकार येऊ देणार नाही, असा गर्भित इशाराही शेट्टी यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावरही आंदोलन केले जाणार आहे. पुणे-बंगळूर महामार्ग आणि अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवू, महाराष्ट्रभर सर्व प्रमुख रस्ते बंद करू, असेही ते म्हणाले.

दरम्यान शनिवार (१९ नोव्हेंबर) पासून राज्यात जिथे म्हणून मंत्री कार्यक्रमाला जातील त्या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून या मंत्र्यांना जाब विचारला जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील हंगामात तुटलेल्या ऊसाला एफ आर पी व्यतिरिक्त 200 रुपये द्यावेत आणि यंदाच्या उसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी दोन दिवस लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन याप्रश्नी माहिती दिली.

शेट्टी म्हणाले, सध्याचे राज्यातील सरकार सर्वात असंवेदनशील आहे. आमच्या आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी आमची भावना आहे. अनेक कारखान्यांनी रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांना फसवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. वाहतुकीचा खर्च भरमसाठ दाखवून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे.’

काटामारी करून शेतकऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यावर नियंत्रण आणण्याचे काम सरकारचे आहे. सरकारला कोणत्याही जादा भुर्दंड पडेल अशा मागण्या करत नाही. आमच्या साध्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आमचा नाइलाज आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद काय आहे हे आम्ही सरकारला दाखवून देऊ. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही येत्या २५ रोजी राज्यव्यापी रास्ता रोको करणार आहोत. त्यानंतर पुढच्या आंदोलनाची घोषणाही त्याच वेळी करण्यात येईल. असे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »