माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी
कोल्हापूर : साखर कारखानदारांची लॉबी माझ्या विरोधात उमेदवार उभे करत आहे. यामागे मोठे षड्यंत्र आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
ते शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे संकल्प मेळाव्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना हजारो कोटी नुकसानीत घातले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शेट्टी म्हणाले की, ‘माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला बैलगाडीतून जाऊन भरणार आहे. शिवसेनेने पक्षात येण्याची अट घातली होती. गेली ३० वर्षे मला जनतेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. असे असताना मी गद्दारी करून शिवसेनेत कसा प्रवेश करू.
लोकसभा निवडणुकीत आमच्या विरुद्ध कारखानदार अशीच लढत होणार आहे. साखर कारखानदारांना माझ्या आंदोलनामुळे ६०० कोटी रूपये शेतकऱ्यांना जादा द्यावे लागले. त्याचा राग साखर कारखानदार लोकसभेच्या निवडणुकीत काढत आहेत. सत्यजीत पाटलांची उमेदवारी हे त्यांचेच षडयंत्र आहे. शेतकरी जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कशाची भीती नाही, असेही शेट्टी म्हणाले.
प्रस्थापितांना जनता धडा शिकवून क्रांती घडेल, शक्तिपीठ महामार्गातून शेतकर्यांची २७ हजार हेक्टर जमीन संपादीत करून त्यांना देशोधडीला सरकार लावत असेल तर मी हे सहन करणार नाही. जनता माझ्याच पाठिशी आहे. सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे हस्तक आहेत. शेतकरी त्यांना निवडणुकीत धडा शिकवतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.