खासगीकरणाचा वाढता प्रभाव, सहकारी कारखान्यांपुढे आव्हान – शरद पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या गंभीर आव्हानाकडे लक्ष वेधले आहे. शनिवारी (दिनांक १६ ऑगस्ट, २०२५ रोजी) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना, उत्तर प्रदेशातील वाढती साखर उत्पादन क्षमता आणि तेथील कामगारांचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, या दोन्ही घटकांमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांपुढे खासगी उद्योगांचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित ‘साखर उद्योग कामगार चळवळ-अनुभव व दृष्टी’ या विषयावरील कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

देशात साखर उत्पादन क्षमतेत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक क्षमतेचे मोठे साखर कारखाने आहेत. त्यामुळे देशात साखर उत्पादनात ते पहिल्या क्रमांकावर असले, तरी तेथील लोक महाराष्ट्रातच येत आहेत. परिणामी, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांपुढे खासगी साखर कारखान्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.”

या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील कामगारांची पिळवणूक होत असून, खासगी कारखाने ‘कमी कामगारांमध्ये सर्वाधिक उत्पन्न’ या सूत्राचा अवलंब करत आहेत, असे गंभीर निरीक्षणही पवार यांनी नोंदवले. कामगार चळवळींना पुन्हा उर्जितावस्था देण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे सांगून, संघर्ष ‘तुटेपर्यंत ताणायचा, की मध्यममार्गावर थांबायचे’ हे ठरवता आले पाहिजे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, किशोर पवार यांच्या कन्या वंदना पवार, साथी किशोर पवार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर आणि उपाध्यक्ष अंकुश काकडे यांचा समावेश होता. याच कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सद्यस्थितीतील तरुण पिढीवर भाष्य केले. “तेव्हाच्या काळातला तरुण डाव्या चळवळीत असायचा आणि त्यानंतर काँग्रेसवाला व्हायचा. मात्र, आताच्या तरुणांकडे पाहिले, तर विचार करण्याची वेळ आहे. ही तरुण पिढी धर्मकारणात गुंतली आहे,” असे ते म्हणाले. राज्यघटना आणि लोकशाही पुढे टिकते की नाही, अशी शक्यता निर्माण झाली असून, खूप काम करावे लागणार आहे, अशी चिंताही थोरात यांनी व्यक्त केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »