साखर आयुक्त गायकवाड यांना ‘सर सन्मान’ पुरस्कार

सोलापूर : स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचा (सर फाउंडेशन) ‘सर सन्मान’ पुरस्कार राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्राबरोबरच ग्रामविकास, साहित्य, सामाजिक, संशोधन व ग्रासरूट इनोव्हेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्च पदावरील सात व्यक्तींना यंदा ‘सर सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.
पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदाचे ‘सर सन्मान’ पुरस्कार घोषित करण्यात आल्याची माहिती सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे बाळासाहेब वाघ आणि महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे – वाघ यांनी दिली. पुरस्काराचे वितरण ४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव येथे होणार आहे.
साखर आयुक्त गायकवाड यांच्याखेरीज, यंदा बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा संस्था, औरंगाबादचे संचालक डॉ. कलीमोद्दीन शेख, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रशासन अधिकारी डॉ. दीपक माळी, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदाचे प्रा. डॉ. किरण धांडे,
माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे, ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक, वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेचे शिल्पकार दत्तात्रय वारे यांची निवड करण्यात आली आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. कोलकत्ता येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, मुंबई म्हाडा पुनर्विकासचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयकर उपायुक्त स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे..
18