श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हॉस्पिटलचे लोकार्पण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संकल्पनेतून सुसज्ज अशा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हॉस्पिटलचे लोकार्पण डॉ.लहू खैरे यांच्या हस्ते बुधवारी झाले.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांचं स्वप्न होतं, एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल कारखाना परिसरात उभं रहावं. त्यांच्या याच भावनेतून आरोग्यरूपी सेवेचा श्रीगणेशा आज कारखाना कार्यस्थळी आम्ही केला आहे, याचा गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केले.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील दवाखान्याचे कारखाना वैद्यकीय कक्ष व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चांगल्या प्रकारे नुतनीकरण करण्यात आले असून, या सुसज्ज अशा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा आज कारखाना कार्यस्थळी सर्वश्री संचालक मंडळ व नारायणगाव येथील सुप्रसिद्ध जीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ.लहू खैरे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

या हॉस्पिटलचे व्यवस्थापन डॉ.लहू खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार असून ते स्वतः दररोज हॉस्पिटलला भेट देणार आहे. त्यांनी इतर डॉक्टर आणि नर्स, स्टाफची या सेवेकामी नियुक्ती केली आहे. कारखान्याचे गळीत हंगाम चालू असताना हे हॉस्पिटल पूर्ण २४ तास सुरू राहणार असून हंगाम बंद असतानाही वैद्यकीय सेवेचे अविरत काम चालू राहणार आहे.

Shri Vighnahar Sugar Hospital

या हॉस्पिटलच्या माध्यमातून कारखाना अधिकारी, कर्मचारी व विघ्नहर ट्रस्टच्या स्टाफसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, औषधे, सलाईन, इन्जेक्शन आदी आवश्यक उपचार पूर्ण मोफत केले जाणार आहेत तसेच कर्मचाऱ्यांना गरजेनुसार ॲडमिट करण्याचीही मोफत सुविधा उपलब्ध असणार आहे. कारखाना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तसेच ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसाठी अल्पदरात तपासणी व औषधोपचार होणार असून कारखान्याव्यतिरिक्त येणाऱ्या बाह्य रुग्णांसाठी डॉक्टरांच्या प्रचलित माफक दरामध्ये औषधोपचार केले जाणार आहेत. विघ्नहर परिवाराच्या सेवेत ही नवी वैद्यकीय व्यवस्था अत्यंत मोलाची ठरेल असा आम्हा संचालक मंडळाला विश्वास असून, अखंड सेवाभावाने कार्य करणाऱ्या डॉ.लहू खैरे व कारखाना वैद्यकीय कक्षाचे रुग्ण सुश्रुषा कार्य अधिकाधिक वृद्धिंगत होत राहो, अशा भावना यावेळी चेअरमन शेरकर यांनी व्यक्त केल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »