आयुक्तांचे फटाके अन् हास्याचे भुईनळे

श्रीरामपूर : अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेल्या ‘आतषबाजी’मुळे प्रचंड गाजला. त्यांच्या मिश्किल कोट्यांमुळे हास्याचे पंचरंगी भुईनळे जोरदार फुलले.
आयुक्त गायकवाड यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत आलेले अनुभव अत्यंत खुमासदार शैलीत मांडले.
आपल्या देशाची माणसे अत्यंत इरसाल, हुशार आहेत. ती विदेशात असतील, तर ट्रम्प यांच्या शेतात म्हसोबा उभा केला असता आणि मार्गारेट थॅचर यांच्या शेतीला कुळ लावले असते. येथे बांध कसा कोरावा व तीन गुंठे जागा तिघांना विकून नऊ गुंठे कशी करता येते याचे प्रशिक्षण द्यावे लागत नाही. आपण साखरेबरोबरच १० माणसे अन्य देशात निर्यात केली असती तर बरं झालं असतं. त्या देशांची आतापर्यंत वाट लागली असती. आपणाला वेगळं काही करायची गरज पडली नसती, असे शब्दांचे फटाके आयुक्तांनी फोडले.

नाशिकला जिल्हाधिकारी असताना आलेले अनुभव सांगताना, आयुक्त म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांतील तीन अपत्य असलेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करणारा कायदा आपल्याकडे आहे. मात्र एका चतुर सरपंचाने अशी काही शक्कल लढवली की त्याला पाच अपत्ये होईपर्यंत आम्हाला वाट पहावी लागली. कारण तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासंदर्भात त्याने मजेशीर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्याच्या पत्नीला झालेले तिसरे आणि चौथे अपत्य आपले नाही, ते नेमके कोणाचे आहे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी शोध घ्यावा, अशी विनंती प्रतिज्ञापत्रात केली होती. हा अडाणी सरपंच, वकील व मलाही काय करायचे हे शिकवत होता. अशी अनेक मजेशीर प्रतिज्ञापत्रे आजही मी जपून ठेवली आहेत.’
‘यशदा’मध्ये एकदा जर्मन नागरिक भेटायला आला होता. तीन गुंठे असलेली जमीन नऊ गुंठ्यात रूपांतरित कशी करता येते हे आपल्याला शिकायचे आहे, असे ते विनोदाने म्हणाला. आम्ही भारतीय लोक तुमच्या देशात येऊन पदवी शिक्षणासाठी वीस लाख रुपये मोजतो. त्याच पद्धतीने जमीन कशी वाढवायची, बांध कसा कोरायचा यासाठी आमच्याकडे वीस लाख फी भरुन प्रवेश घ्यावा लागेल, असे उत्तर मी त्या जर्मन व्यक्तीला दिले. हा अनुभव आयुक्तांनी सांगताच, उपस्थित शेतकऱ्यांनी विकट हास्याने प्रतिसाद दिला.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर सहसंचालक मंगेश तिटकारे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.