हे साखर कारखाने कसे बंद पडतील हे पाहू : साखर आयुक्तांचा खणखणीत इशारा

आकांक्षा मानकर / शुगरटुडे SUGARTODAY MAGAZINE
पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला फाटा देणारे राज्यातील काही साखर कारखाने कसे बंद होतील, हे पाहण्याची आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या कारखान्यांना सणसणीत इशारा दिला आहे.
पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात साखर आयुक्त बोलत होते. त्यांनी साखर क्षेत्राची पुढची दिशा काय असू शकते, याचे विश्लेषण करताना, या उद्योगातील अपप्रवत्तीवर कोरडे ओढले.
राज्यातील साखर कारखानदारी हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात जास्तीत जास्त पैसे कसे पडतील हे पाहणे आमचे काम आहे, त्याचवेळी हा उद्योग अधिक मजबूत आणि जागतिक स्पर्धेचा समर्थपणे मुकाबला करणारा कसा होईल याकडेही साखर आयुक्त लक्ष घालत असल्याचे त्यांच्या भूमिकांवरून स्पष्ट होते.
साखर आयुक्त म्हणाले, की आताच्या काळात ऊस हा कल्पवृक्षच आहे. मात्र त्याच्या लागवडीवरील शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी होईल हे पाहणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. मागच्या हंगामात एकूण ४६ हजार कोटींची एफआरपीची रक्कम अदा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा गेला, तर त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि इतर अनेक क्षेत्रांना त्याचा लाभ मिळेल. परंतु महाराष्ट्रात असेही कारखाने आहेत की जे १८०० रुपये ऊस उत्पादकांना देतात आणि १२०० रुपये ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करतात. या शेतकऱ्यांना काय परवडणार आहे, असा सवाल करून ‘हे असे कारखाने बंद पडण्याचीच गरज आहे आणि आम्ही त्याची काळजी घेऊ, असा इशाराच त्यांनी दिला.
साखर आयुक्तांचा हा इशारा त्या सर्व संबंधित कारखान्यांना आहे ज्यांचा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च चार आकड्यांमध्ये आहे. अशा साखर कारखान्यांना धोरण बदलासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो.
राज्यात ऊसतोडणी आणि वाहतूकवरील खर्च तब्बल १० हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. सध्या हे काम साखर कारखान्यांचे आहे. तोडणी आणि वाहतूक शेतकऱ्यांकडे आली तर त्यांना आणखी पैसा मिळू शकणार आहे, ते कसे करता येईल यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
आम्ही सर्व विद्यापीठे आणि तंत्रज्ञान संस्थांना पत्रे लिहून शंभर रुपयांचा कोयता आणि एक कोटींचे हार्वेस्टर मशीन यांच्या मधला पर्याय शेतकऱ्यांना देण्यासाठी आग्रह धरला आहे. बॅटरीवर चालणारा कोयता का बनवू नये. त्यासाठी त्यांनी संशोधन करावे. कोटीचे हार्वेस्टर सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाही, असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले.