सीबीजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळा : शरद पवार

पुणे : साखर कारखान्यांनी यापुढे इथेनॉलबरोबरच सीबीजी (कॉम्र्पेस्ड बायोगॅस) आणि हायड्रोजन उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ वी सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात खा. शरद पवार बोलत होते.
भविष्यात साखर कारखान्यांना सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरिक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. सध्या देशात साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादित केली जात आहे. त्यामुळे साखरेला किफायतीश दर मिळत नाही, याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागतो.
कारखान्यांनी सीबीजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, असा सल्ला शरद पवारांनी साखर कारखानदारांना दिला. ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या जातीचं बियाणं वापरावं अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीकडे करावा, असेही शरद पवार म्हणाले.
साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रमाणेच सीबीजी आणि हायड्रोजन वापराकडे लक्ष द्यायला हवं. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीची वाहनं अधिक मायलेज देतात. त्यामुळे हे प्रभावी इंधन ठरत आहे. म्हणून साखर कारखान्यांनी याचा विचार करायला हवा असे शरद पवार म्हणाले.
यंदाचा गळीत हंगाम १९१ दश लक्ष टन होईल असा अंदाज असल्याचे पवार म्हणाले. हा जागतिक उच्चांक होणार आहे. मागील वर्षी १८५ दशलक्ष टन ऊसाचं गाळप झाल्याचे शरद पवार म्हणाले. मागील वर्षी महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन केलं आहे. महाराष्ट्रने साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे शरद पवार म्हणाले.
राज्यातील सगळ्या भागात ऊसाचं उत्पादन घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्र उभं करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सध्या जालना जिल्ह्यात एक केंद्र झाले आहे. लवकरच नागपूर आणि अमरावतीत देखील VSI केंद्र उभारणार आहोत. तसेच पुढच्या काळात खानदेशात देखील VSI चे केंद्र उभारण्याचा उद्देश असल्याची माहिती पवार यांनी दिली.
संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा