यंदा साखर उत्पादन २४ लाख टनांनी घटणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यात सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीस एकूण साखर उत्पादन अंदाज 130 लाख टन एवढा वर्तविण्यात आला होता. मात्र साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या सुधारित अंदाजानुसार, 106 लाख टन उत्पादन होणार आहे.

हा हंगामात जवळजवळ संपला आहे. 205 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, उर्वरित 5 कारखानेही आठवडाभरात बंद होतील. या कारखान्यांमध्ये सिद्धेश्वर (सोलापूर), नॅचरल शुगर (उस्मानाबाद), समर्थ युनिट 2 (जालना), सुंदरराव सोळंके (बीड) आणि अजिंक्यतारा (सातारा) यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत 10 कोटी 51 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले. 9.98 टक्के सरासरी उतारा मिळाला. तर सुमारे 105 लाख टनाइतके साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच काळात 11.87 कोटी टन ऊस गाळपातून सरासरी 10.42 टक्के उतार्‍यानुसार 123 लाख टनांइतके साखर उत्पादन तयार झाले होते.

15 मार्चच्या अहवालानुसार ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची 24 हजार 469 कोटी रुपयांपैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 23 हजार 116 कोटी रुपये (95 टक्के) जमा करण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

तर 210 पैकी 84 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे. बदलत्या हवामानाचा ऊस पिकास बसलेला फटका, खोडवा उसाचे असलेले अधिक प्रमाण आणि उतार्‍यातील घट यामुळे साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम बंद होण्याच्या मार्गावर असताना सुमारे 95 टक्के एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना देण्यात आली आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘शुगरटुडे’ला सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »